डॉ. शीतल आमटे यांचा श्वास अडकल्याने मृत्यू

डॉ. शीतल आमटे यांचा श्वास अडकल्याने मृत्यू 

पोलिसांची माहिती

वेब टीम चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.त्यात श्वास अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. पोलिस तपासात घातपाताचा कोणताही पुरावा दिसलेला नाही. अद्याप सायबर व फॉरेन्सिक अहवाल आलेले नाहीत. हे  अहवाल आल्यानंतरच घटनेविषयी अधिक स्पष्टता येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आनंदवनातील आपल्या निवासस्थानी तीस नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. तपासाबाबत अधीक्षक साळवे म्हणाले, डॉ. शीतल या मागील दीड वर्षांपासून नागपूर येथे मानसोपचार तज्ज्ञांकडे औषधोपचार घेत होत्या. जून महिन्यात मानसिक तणावामुळे झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २१ नोव्हेंबर रोजी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टला प्राणघातक इंजेक्शनच्या उपलब्धतेविषयी विचारणा केली होती. घटनास्थळावरून सदर तीन इंजेक्शन, निउक्युरॉन इंजेक्शन फुटलेल्या अवस्थेत व वापरलेले सीरिंज आढळले होते.तपासादरम्यान आजवर २६ साक्षीदारांचे जबाब  नोंदविण्यात आल्याचे साळवे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व वरोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे उपस्थित होते.

घटनास्थळावरून जप्त मुद्देमाल, व्हिसेरा तपासणीसाठी चंद्रपूर व नागपूरच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आला आहे. जप्त तीन मोबाइल, एक लॅपटॉप, टॅब्लेट हे परीक्षणासाठी मुंबईच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबईला पाठविण्यात आले आहेत. या दोन्ही प्रयोगशाळांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते मिळताच योग्य तो तपास करण्यात येईल, असेही साळवे यांनी स्पष्ट केले.


Post a Comment

0 Comments