अन्य पॅथींसोबत अ‍ॅलोपॅथीचे उपचार करणे ठरणार गुन्हा

अन्य पॅथींसोबत अ‍ॅलोपॅथीचे उपचार करणे ठरणार गुन्हा 

वेब टीम मुंबई : फिजिशियनच्या मालकीचे अ‍ॅलोपॅथी रुग्णालयात अन्य पॅथीचे डॉक्टर सेवा देत असल्यास किंवा साहाय्य करत असल्यास याची जबाबदारी संपूर्णपणे त्या फिजिशियनची असेल,तसेच नोंदणीकृत डॉक्टरांच्या रुग्णालयात अन्य पॅथीचे डॉक्टर सेवा देत असल्यास रुग्णांनी तक्रार केल्यानंतर डॉक्टरांनाच दोषी ठरविले जाऊन कारवाई केली जाईल, असा इशारा एम एम सी च्या वतीने देण्यात आला आहे. आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अन्य पॅथीच्या डॉक्टरांसोबत आधुनिक वैद्यकशास्त्राची सेवा देताना आढळल्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) म्हटले  आहे.

आयुर्वेद किंवा अन्य पॅथीच्या   डॉक्टरांनी  शस्त्रक्रियेसाठी दाखल केलेल्या रुग्णावर अ‍ॅलोपॅथी डॉक्टर शस्त्रक्रिया केल्याचे  निदर्शनास आले आहे. तसेच काही रुग्णालयांमध्येही अन्य पॅथीचे डॉक्टर सेवा देत असल्याच्या तक्रारीही रुग्णांनी केल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये आम्हाला कायदा माहीत नाही, असे अनेकदा डॉक्टरांकडून सांगितले जाते. तसेच रुग्णाला ज्या पॅथीची सेवा घेण्याची इच्छा आहे, ती त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे. अन्यथा रुग्णांची फसवणूक  केल्याप्रमाणे होईल, असेही सांगितले. नोंदणीकृत डॉक्टरांना कायद्यातील बाबी माहीत असाव्यात, या दृष्टीने ही सूचना जाहीर केल्याचे एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.

भारतीय वैद्यकीय परिषद किंवा राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी केलेल्या डॉक्टरांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्राअंतर्गत सेवा देण्याचा किंवा शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार नाही, असे भारतीय वैद्यकीय परिषदेचा १९६५ च्या कायद्याचा दाखला ‘एमएमसी’ने या सूचनेत दिला आहे. तसेच आधुनिक वैद्यकशास्त्राची सेवा देण्याचा अधिकार नसलेल्या होमियोपॅथी, आयुर्वेद किंवा युनानी या अन्य पॅथीच्या डॉक्टरांसोबत अ‍ॅलोपॅथीची सेवा देणेही कायद्याचे उल्लंघन आहे, असे यात नमूद केले आहे.

 परिषदेतील नोंदणीकृत डॉक्टरांनी ते सेवा देत असलेला दवाखाना किंवा रुग्णालयातील फलक, औषधांची चिठ्ठी यावर त्यांच्या पदवीचा स्पष्ट उल्लेख करावा.

परिषदेत नोंदणी न केलेल्या डॉक्टरांसोबत सेवा दिल्यास कायद्याचे उल्लंघन होईल. कायद्याअंतर्गत अ‍ॅलोपॅथी रुग्णालय म्हणून नोंदणी न केलेल्या रुग्णालयात किंवा दवाखान्यात जाऊन या डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथी सेवा दिल्यासही कायद्याने गुन्हा असेल.

 नोंदणीकृत डॉक्टरांनाच अधिकृतपणे अ‍ॅलोपॅथी औषधे लिहून देण्याचा अधिकार असेल असेही एमएमसीने या सूचनेत अधोरेखित केले आहे. 

Post a Comment

0 Comments