जन्मदात्री आईच ठरली मुलीचा काळ .....

 जन्मदात्री आईच ठरली मुलीचा काळ ..... 

 


 वेब टीम बारामती: माळेगाव बुद्रुक येथील चंदननगर भागात राहणाऱ्या अवघ्या सव्वा महिन्याच्या बालिकेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी या बालिकेची आई दीपाली संजय झगडे हिला रविवारी (२९ नोव्हेंबर) रात्री अटक केली. सलग तिसरी मुलगी झाल्याने आणि वंशाला दिवा पाहिजे, या हव्यासातून तिने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

काटेवाडी येथील दीपाली संजय झगडे दोन महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. सव्वा महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. यापूर्वी तिला दोन मुली होत्या. तिसरीही मुलगीच झाल्याने तिला नैराश्य आले होते. त्यातून तिने २५ नोव्हेंबर रोजी मुलगी गायब झाल्याचा बनाव रचला. मुलीला पाळण्यात झोपवून मी फरशीवर झोपले होते. झोपेतून उठल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास मुलगी पाळण्यात नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तत्काळ तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सव्वा महिन्याची मुलगी गायब झाल्याचे सांगितले. तशी माहिती मृत मुलीचे आजोबा संजय जाधव यांना दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी घराजवळील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत बालिकेचा मृतदेह आढळला. पोलिसानी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना या प्रकरणी सुरुवातीपासूनच कुटुंबातील कोणी तरी हा प्रकार केला असावा असा संशय होता. बालिकेच्या खुनानंतर तिची आई दवाखान्यात दाखल झाली होती. पोलिसांना आईचाच संशय आल्याने त्यांनी तिची कसून चौकशी केली. त्या वेळी वंशाला दिवा हवा यासाठी मुलगा होण्याच्या अट्टहासातून तिने हे कृत्य केल्याचे समोर आले.


Post a Comment

0 Comments