प्रेयसीला वाचवण्यासाठी पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न

 प्रेयसीला वाचवण्यासाठी पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न 

वेब टीम नागपूर : 'वाहतूक पोलिसाने कार थांबविण्याचा इशारा केला,मात्र कारमध्ये प्रेयसी होती.मी कार थांबवली असती तर प्रेयसीची ओळख पटली असती', अशी धक्कादायक माहिती आकाश याने पोलिसांना दिली. वाहतूक पोलिसाला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आकाश व त्याची २३ वर्षीय प्रेयसी पल्लवीला अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत नऊ वर्षांपासून आकाश व पल्लवीचे प्रेमसंबंध आहेत. रविवारी आकाश हा पल्लवीला भेटायला आला. तिला एमएच ३१ डीव्ही ३२२२ या क्रमांकाच्या कारमध्ये बसवून फिरायला गेला. सक्करदरा चौकात वाहतूक शाखेचे हेडकॉन्स्टेबल अमोल भोजराज चिदमवार (वय ३९, रा. रामकृष्णनगर, दिघोरी) व महिला पोलिस शारदा यांच्यासह कारला काळी फिल्म असणाऱ्या वाहनचाकांविरुद्ध सक्करदरा चौकात चलन कारवाई करीत होते. अमोल यांना आकाशच्या कारला काळी फिल्म लावली असल्याचे दिसले. त्यांनी आकाश याला कार थांबविण्याचा इशारा केला. कार थांबविल्यास पल्लवीची ओळख पटेल, या भीतीने आकाश याने कारचा वेग वाढविला. अमोल यांना चिरडण्याचा प्रयत्न केला.

अमोल यांनी प्रसंगावधान राखत बोनेटवर उडी घेत कारला घट्ट पकडून ठेवले. आकाश याने सुमारे ५०० फुटापर्यंत आकाश यांना बोनेटवरून फरफटत नेले. आयुर्वेदिक कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर कार थांबविली. अमोल खाली उतरले. परिसरातील नागरिकांनी आकाश याला कारमधून बाहेर काढून चांगलाच चोप दिला. माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी आकाश याची नागरिकांच्या तावडीतून सुटका केली. आकाश व पल्लवीला पोलिस स्टेशनमध्ये आणले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक करून एक दिवसाची पोलिस कोठडी घेतली.

तरुणीच्या कुटुंबीयांनाही धक्का

पल्लवी उच्चशिक्षित आहे. आकाश व तिचे नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. याबाबत तरुणीच्या नातेवाइकांना माहिती नव्हते. मात्र, तरुणीचे नातेवाइक आकाश याला ओळखतात. रविवारी आकाश हा तरुणीच्या घरी आला. सिलेंडर घेण्याच्या बहाण्याने तो तरुणीला सोबत घेऊन गेला. वाहतूक पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात पल्लवीलाही अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच तिच्या नातेवाइकांना धक्का बसला.


Post a Comment

0 Comments