आरोग्य देवता धन्वंतरीचे जिल्हा रुग्णालयात पूजन

आरोग्य देवता धन्वंतरीचे जिल्हा रुग्णालयात पूजन

वेब टीम  नगर - राष्ट्रीय धन्वंतरी दिनानिमित्त व दिपावलीच्या धनत्रयोदशीचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयामध्ये धन्वंतरी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी  महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे माजी अध्यक्ष व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ.अजित फुंदे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांच्या हस्ते धन्वंतरी देवतेची पूजा करुन  पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.शौनक मिरिकर यांनी प्रास्तविक केले व धन्वंतरी दिवसाचे महत्व सांगितले.  याप्रसंगी  अहमदनगर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनिल पवार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता डॉ.प्रभाकर पवार, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.विवेक रेगे, उपप्राचार्य डॉ.जयंत शिंदे, पंचकर्म तज्ञ व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ.मंदार भणगे, अतिरिक्त जिल्हा शल्स चिकित्सक डॉ.महावीर कटारिया, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.दादासाहेब साळूंके, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अमोल शिंदे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी डॉ.अजित फुंदे म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून धनत्रयोदशीचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्राची देवता धन्वंतरीचे सर्वत्र पूजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी कोविडमुळे अतिशय छोट्या प्रमाणात मोजक्याच डॉक्टरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे सर्व कोविडचे नियम पाळून प्रयोजन करण्यात आले. सिव्हील हॉस्पिटलमध्ये केंद्र सरकारकडून आणि आयुष हॉस्पिटलची निर्मिती सुरु केलेली असून, सध्या 30 बेडचे हॉस्पिटलसाठी परवानगी मिळाली आहे. निश्‍चितच आयुर्वेदाच्या व होमिओपॅथीच्या या विभागामुळे निश्‍चितच रुग्णांना या सेवेचा फायदा मिळेल. भविष्यामध्ये हेच हॉस्पिटल 100 बेडचे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आयुर्वेद विद्यालयासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे.

     डॉ.प्रभाकर पवार म्हणाले, आयुर्वेद हे फक्त माणसांसाठीच नसून ते सर्व सजीवांसाठी आहे, हे डॉक्टर्स व जनसामान्यांनी विसरु नये. अधिकाधिक प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद उपचाराचा तसेच होमिओपॅथी उपचाराचा फार मोठा फायदा होतो. रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढते व रुग्णाला समृद्ध आरोग्याची प्राप्ती होते. धन्वंतरी दिन हा रुग्णांनी सुखी व आरोग्यदायी व्हावे, यासाठी या दिवसाचे महत्व वेगळे असल्याचे सांगितले.

     डॉ.सुनिल पोखरणा म्हणाले,  धन्वंतरी ही वैद्यकीय क्षेत्राची आरोग्य देवता आहे. त्यामुळे धन्वंतरी दिवस हा वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाचा दिवस आहे. कोविडच्या काळामध्ये निश्‍चितच या सर्व डॉक्टर्सनी स्टाफ व नर्सेसनी आयुर्वेदाबरोबरच होमिओपॅथी व अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीचा वापर केला. त्यात बर्‍याच अंशी यश प्राप्त झाले. भविष्यात आयुषच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवा कार्यासाठी  सर्व सोयी-सुविधा व उपचार उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. यास निश्‍चितच यश मिळेल.



     या कार्यक्रमाचे संयोजन डॉ.शौनक मिरीकर, डॉ.ज्योती तनपुरे, डॉ.जयश्री म्हस्के, डॉ.इरशाद मोमिन, डॉ.सादीक शेख, डॉ.नासिया शेख, डॉ.शोभा धुमाळ, औषध निर्माता माधुरी ठोंबरे, संगीता नन्नवरे, संतोष आरु आदिंनी केले. 

Post a Comment

0 Comments