बचत गटातील महिलांचे कर्ज माफ करा

बचत गटातील  महिलांचे कर्ज माफ करा 

 जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा

वेब टीम नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. मोर्चामध्ये महिलांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  यामध्ये सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस अनिल चितळे, सहकार सेना जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, अनिता दिघे, देविदास खेडकर, बाबा शिंदे, दत्तू कोते, ज्ञानेश्‍वर गाडे, गजेंद्र राशिनकर, दगडू साळवे, नितीन भुतारे आदी सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील लाखो माता भगिनींनी महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रोफायनान्स या कंपन्यांकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. गेली दहा ते पंधरा वर्षे झाले हे कर्ज घेत असून, ते नियमितपणे परतफेड करत आलेले आहे. हे कर्ज घेत असताना मायक्रो फायनान्स कंपनी प्रत्येक महिलेकडून दिलेल्या कर्जाची सुरक्षा म्हणून दरवर्षी विमा पॉलिसीच्या नावाखाली हजारो रुपये घेतात. परंतु विम्याचे सर्टिफिकेट देत नाही. कोरोनाच्या या संकटामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले आहे. कोणाच्याही हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अनेक लोकं आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहे.

महाराष्ट्रातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे. पण व्यवसायच बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाही. अनेक महिलांनी कर्ज घेऊन लोणचे, शेवया, पापड यासारखे पदार्थ तयार केले होते. परंतू लॉकडाऊनमुळे तो माल विकला गेला नाही. सहा महिन्यात तो माल पूर्णपणे खराब झाला . त्यामुळे त्या महिलेने घेतलेले पूर्ण कर्ज म्हणजे तिचे भांडवल बुडाले आहे. ती महिला पूर्ण संकटात सापडली आहे. मायक्रोफायनान्स चे कर्मचारी रोज महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावत आहे. धमकी देत आहे, घरातील साहित्य उचलून नेत आहेत. पैसे द्या नाहीतर तुमचा टीव्ही, गॅस, भांडी घेऊन जातो अशी धमकी देतात. महिलांना अश्‍लील बोलणे शिवीगाळ करणे त्यांच्या घरात बसून राहणे व शरीर सुखाची मागणी करणे असे मायक्रो फायनान्स चे गुंड करत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील बचत गटाच्या महिलांना असा त्रास दिला जात आहे. वास्तविक कोरोनाच्या संकटामुळे महिलांचा व्यवसाय अडचणीत आला त्यांचे भांडवल बुडाले आहे. व्यवसाय अडचणीत आला भांडवल बुडाले असले तरी विमा कवच आहे. परंतु विम्याचे पैसे घेऊन देखील विमा दिला जात नाही. जर विमा मिळाला तर या सर्व महिलांना दिलासा मिळेल मायक्रो फायनान्सच्या कंपनीकडे वारंवार विम्याची मागणी करून देखील ते विमाचे प्रमाणपत्र देत नाहीत. याचा अर्थ त्यांनी पैसे घेऊन देखील ते विमा कंपनीकडे भरले नाहीत म्हणजे लाखो रुपयांचा घोटाळा या सर्व मायक्रो फायनान्स कंपनी केलेला आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सरकारने मोठमोठ्या उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केली आहेत. महिला बचत गटाची तर खूप छोटे कर्ज आहे ते संपूर्ण माप करण्यात यावे. 

महिला खूप अडचणीत आहेत कसलेही काम नाही त्यांच्या घरच्या पुरुष मंडळींना देखील काम नाही प्रचंड हलाखीचे जीवन त्या जगत आहेत. वरुन रोजच मायक्रोफायनान्स गुंडांचा त्रास यामुळे अनेक महिला निराशेचे जीवन जगत आहे. अशातच पंढरपूर येथील मनीषा निकम या महिलेने या गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. अशा अनेक महिला आत्महत्या करत आहे. त्यामुळे महिलांना होणारा त्रास थांबवण्यासाठी महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments