युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने व्यक्त केली दिलगिरी

भाऊ कोरेगावकर यांच्या मध्यस्थीने अखेर "त्या" वादावर पडदा


युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने व्यक्त केली दिलगिरी 

 जातीयवादी वक्तव्यावरुन पडली होती वादाची ठिणगी

वेब टीम नगर - युवा सेनेचे पदाधिकारी रविंद्र वाकळे यांनी शिवसेनेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत असल्याचे लेखी पत्र देऊन, वंजारी समाजामध्ये जातीवाचक शब्द वापरल्याचा गैरसमज दूर करुन या वादावर आखेर पडदा टाकला.

हॉटेल यश ग्रॅण्ड येथे शुक्रवारी (दि.23 ऑक्टोबर) दुपारी शिवसेना, वंजारी समाज, जय भगवान महासंघ व दैवत फाऊंडेशनच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी वाकळे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांच्याकडे दिलगिरीचे लेखी पत्र सुपुर्द करुन सदर प्रकरण समोपचाराने मिटवले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशीकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे शहर प्रमुख विक्रम राठोड, संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, योगीराज गाडे, संजय शेंडगे, डॉ. बारस्कर, गिरीष जाधव, अभिषेक कळमकर, जय भगवान महासंघाचे रमेश सानप, संपर्क प्रमुख श्रीकांत चेमटे, दैवत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अक्षय आंधळे, जिल्हाध्यक्ष विक्रांत पालवे, राज्याध्यक्ष प्रतिक करपे, परम जवरे, सुरज मुंडे, विपुल खांडरे, महेश आंधळे आदि उपस्थित होते.

रविवार दि.18 ऑक्टोबर रोजी सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात शिवसेनेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांना मारण्याची व वंजारी समाजाबद्दल जातीवाचक शब्द वापरल्याने वादाला तोंड फुटले होते. वंजारी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्यावरुन संपुर्ण महाराष्ट्रात समाजबांधवांच्या भावना तीव्र असताना शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी गुरुवारी उपजिल्हाप्रमुख लहामगे यांना मुंबईला बोलावून घेतले व घडलेला प्रकार जाणून घेतला. त्यानंतर स्थानिक पदाधिकार्‍यांना सुचना करुन हा वाद मिटवण्याचे सांगण्यात आले. यानंतर शुक्रवारी बंद खोलीत झालेल्या बैठकित हा वाद समोपचाराने सोडविण्यात आला. रविंद्र वाकळे यांनी सभासद नोंदणी अभियानात शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांच्याशी शाब्दिक वादावादी झाली होती. माझ्याकडून जातीवाचक शब्दाची उच्चारणा झाली नसून, गैरसमजातून दोन समाजामध्ये किंवा शिवसेना पक्षामध्ये जातीय तेढ निर्माण होत असेल तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी लेखी पत्रात म्हंटले आहे.  

माध्यमांशी बोलताना आनंद लहामगे म्हणाले की, गैरसमजातून ही घटना घडली. हा वाद समोपचाराने मिटला आहे. भविष्यात पक्षाचे संघटन गरजेचे आहे. या घटनेतून चुकीचे शब्द गेले होते. त्याबद्दल वाकळे यांनी दिलगीरी व्यक्त करुन या घटनेला पुर्णविराम दिला आहे. हे वाद मिटवून आंम्ही दोघे खांद्याला खांदा लाऊन शिवसेनेच्या पक्ष वाढीसाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर यापुढे पक्षात कोणतेचे वाद होणार नसल्याचे सांगितले. रविंद्र वाकळे यांनी दोघांमध्ये शाब्दिक वाद होते, ते संपले आहे. प्रत्येक पक्षात वाद असतात. मात्र यापुढे दोघे मिळून एक दिलाने सोबत कार्य करणार आहोत. आमचा जात, गोत्र व धर्म शिवसेना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त केल्याने हा वाद समोपचाराने मिटला असल्याचे जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी स्पष्ट केले. विक्रांत पालवे यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन दैवत फाऊंडेशन कार्यरत आहे. मात्र वंजारी समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य झाल्याचे समजताच सर्व पदाधिकारी लहामगे यांच्या पाठिशी उभे राहिले होते. हा वाद मिटवल्याने त्यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments