।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।।

 ।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।। 

 अनेक महिलांच्या संसारास  हातभार लावणाऱ्या 'वैशाली 'ची गोष्ट 

आजकाल महिला बचत गटांचे पेव फुटलंय,मात्र बचत गट नेटान चालवणं आणि त्याचे फायदे अनेक स्त्रियांना मिळवून देणे यासाठी एखाद्या महिलेच्या कणखर नेतृत्वाची गरज असते.तसे सर्वसाधारण नेतृत्वगुण आणि घरासाठी काही तरी भरीव कामगिरी करण्याची उमेद प्रत्येक महिलेत असते. मात्र तिला अन्य महिलांची योग्य साथ मिळायला हवी.वैशाली अमोल गाडे ही त्यापैकीच एक,  सध्या ५०० रुपयापासून ते २००० रुपये प्रति महिन्याचे बचत गट चालवते तिच्या जिद्दीची ही गोष्ट.

घरात पाच बहिणींमध्ये ती सर्वात धाकटी त्यामुळे सहाजिकच वडिलांचा तिच्यावर खूप जीव मात्र ती पाचवीत शिकत असताना पितृछत्र हरपले.नाशिक मध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सुरू होतं पुढे ती नगरला आपल्या मोठ्या बहिणीकडे आली नगरमधल्या पार्वतीबाई डहाणूकर विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण झाले.दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिने लगेच एक नोकरी धरली कोर्टाच्या बाहेर चेरीश  झेरॉक्स मध्ये ती झेरॉक्स मशीन ऑपरेटर म्हणून काम करू लागली.  राधाबाई काळे महाविद्यालयात तिचे ११वीचे  शिक्षण सुरू झालं.पुढे अशोक कॉम्प्युटर्समध्ये अकाउंटंट म्हणून नोकरीला लागली शिक्षण संपताच लग्नगाठ बांधली गेली.नवऱ्याची साथ मिळाल्याने पदव्युत्तर शिक्षण सुरू राहिलं मात्र,या दरम्यानच्या काळात महिलांनी एकत्र यावं, काहीतरी करावं, एकमेकांच्या मदतीला धावून जावं असं वाटल्याने परिसरातल्या महिलांना एकत्र केलं,मग श्री स्वामी समर्थ बचत गटाची स्थापना झाली. तिथे सचिव म्हणून काम केल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.मग शक्ती बचत गटाची स्थापना केली, या बचत गटाच्या माध्यमातून चांगला पैसा उभा राहिल्याने बचत गटातील महिलांनाही खूप फायदा झाला.  त्या मिळालेल्या पैशातून कोणी घर बांधलं तर, कोणी स्वतःची गिरणी सुरु केली तर, कोणी स्वतःचे दुकान थाटलं मग पुन्हा नवे नवे बचत गट स्थापन केले ५०० ते २००० रुपये मासिक हप्त्याचे तीन बचत गट सुरू झाल्याने मोठी रक्कम जमा होऊ लागली.त्यातून पुन्हा कर्ज दिले जाते महिलांना त्याचा खूप मोठा फायदा झाला घरासाठी मोठी मदत झाली.कोणाचं दुखलं-खुपलं तर त्याच्या खर्चासाठी नातेवाईकांकडे हात पसरावे लागत,पण कोणी नातेवाईक पैसे मागितले तर ते वाच्यता करतात असा सार्वत्रिक अनुभव येतो, त्यापेक्षा बचत गटातून पैसे वेळेवर उपलब्ध होता. महिलांची निर्णय क्षमता बचतगट पाठीशी असल्याने वाढते असा अनुभव त्या सांगतात.बचत गटाच्या कर्जासाठी बँके पेक्षा कमी कागदपत्र लागतात,प्रोसेसिंग फी लागत नाही,पूर्ण रक्कम हातात पडते शिवाय व्याज दर फक्त  पाच टक्के असल्याने महिलांचे बचत गटातील कर्जाला प्राधान्य असते.


सरकारने गृह उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारावे, निरनिराळे शिबीर आयोजित करावी, जेणेकरून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील महिला घरी बसून खूप काही करूशकतात मी स्वतः नऊ वर्षापासून पापड,चकली, फुटाणे-वाटाणे पॅकिंगचे काम करते जेव्हा मुलगा लहान होता तेव्हा मेस चालवली त्याहीवेळी ५० डबे पोहोचवायची आणि लग्नापूर्वी स्क्रीन प्रिंटिंग ची ही कामे केली.आमच्या दाजींचे साप्ताहिक असल्याने त्यासाठी मुलाखती घेणे, जाहिराती गोळा करणे आदी कामेही केली, त्याशिवाय सुट्टीच्या काळात मंडप शिवायलाही शिकले.काहीतरी काम करत राहायचं रिकामं बसायचं नाही असा शिरस्ताच मी त्यावेळी लावून घेतला होता,असं वैशाली  आवर्जून सांगतात.

लग्नानंतर त्यांनी एम.ए. ची पदवी घेतली त्याचबरोबर जीडीसी अँड ए ची परीक्षाही पास झालेल्या सध्याचा तीन बचत गटांचे काम पाहतात.त्यांच्या सर्व बचत गटात मिळून १२० महिलांच्या कुटुंबाच्या त्या आधारस्तंभ बनल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात बचत गटाच्या माध्यमातून एका सदस्याच्या घरी लग्नकार्यासाठी अडीच लाख रुपयांची आवश्यकता होती त्यावेळी त्या महिलेच्या पाठीशी बचतगट उभा राहिला आणि तातडीने तिला दोन लाखांची मदत करण्यात आली.  आजारपण यासारख्या अन्य तातडीच्या कारणांसाठी पैसे दिले जातात .

त्यांचे बचत गटाचे काम पाहून पुण्यश्लोक आहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन रानबा कुशाबा कसबे यांना उत्तम प्रशासकाची आवश्यकता होती, संस्थेचे संचालक साहेबराव सखाराम कसबे यांनी वैशाली यांच्याकडे आमच्या पतसंस्थेत काम करणार का अशी विचारणा केली आणि त्यांना व्यवस्थापक आणि सचिव पदावर नियुक्ती दिली.त्या माध्यमातूनही त्या महिलांचा आधारस्तंभ बनू पाहताहेत नव्हे त्यांच्या बचत गटातील महिलाच त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहात आहेत.Post a Comment

0 Comments