महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने विविध मागण्यांसाठी निदर्शने

 महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने विविध मागण्यांसाठी निदर्शने


   वेब टीम नगर - अखिल भारतीय महात्मा समात परिषदेच्यावतीने ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन निवेदन देण्यात आले.  याप्रसंगी पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, उपाध्यक्ष शरद कोके, सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, सावता परिषद जिल्हाध्यक्ष निखिल शेलार आदि उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रमाणात महाज्योती संस्थेकरीता निधी उपलब्ध करुन द्यावा. राज्य मागासवर्ग आयोगावर ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी. शासकीय कर्मचार्‍यांच्या प्रलंबित पदोन्नत्ती बाबत निर्णय घ्यावा. इमाव,विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असून, ती मिळावी. इतर मागासवर्ग विकास महामंडळास वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावा. महामंडळामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांसाठी भागभांडवालात वाढ करण्यात यावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक वसतीगृहे सुरु करावीत. त्याचप्रमाणे इंग्रजी शाळेत प्रवेशाबाबत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. राज्यात सावित्रीबाई फुले घरकुल योजना प्रभावीपणे राबवावी. तसेच अर्थसंकल्पात ओबीसींच्या प्रमाणात तरतूद करण्यात यावी. स्वतंत्र्य जनगणना व्हावी, शासकीय सेवेतील अनुशेष तातडीने भरण्यात यावा. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करु नये. शासनाच्यावतीने भरती प्रक्रिया सुरु ठेवावी. वसतिगृहाचा लाभ न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार निधी देण्यात यावा, आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

     याप्रसंगी मच्छिंद्र गुलदगड म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे ओबीसींच्या विविध मागण्या प्रलंबित असून, परंतु सरकार त्याबाबत निर्णय घेत नाही. त्यामुळे ओबीसी समाजात मोठा असंतोष आहे. तरी शासनाने वरील मागण्यांबाबत लवकर निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात तीव्र स्वरुपात राज्यभर आंदोलने करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Post a Comment

0 Comments