ऑनलाइन परीक्षेमध्ये सुधारणा करा, विद्यार्थ्यांचा मानसिक छळ थांबवा

ऑनलाइन परीक्षेमध्ये सुधारणा करा, 

 विद्यार्थ्यांचा मानसिक छळ थांबवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रा समोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

वेब टीम नगर - संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या महाविद्यालयीन ऑनलाइन परीक्षेमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ थांबविण्याची मागणी अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रा समोर आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, दादा दरेकर, वैभव म्हस्के, प्रसाद कर्नावट, गौरव नरवडे, यशवंत तोडमल, विशाल म्हस्के, प्रितेश पानमंद, विशाल गागरे, सुमित कुलकर्णी, देविदास टेमकर, केशव नरसाळे आदिंसह विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठ अंतर्गत परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने परीक्षापद्धतीत असलेल्या अनेक त्रुटी, विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी नियोजनशून्यता, मॉक टेस्टचा व कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्विस प्रोव्हायडर हेल्पलाइन केंद्राची अकार्यक्षमता, प्रशासकीय दिरंगाई, एमसीक्यू प्रश्‍न ची प्रश्‍नपेढी न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. ऑनलाईन परीक्षेत प्रश्‍न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक तान सहन करावा लागत आहे. डिवाइस व कनेक्टिव्हिटीचा अभाव असून, तसेच ऑनलाईन पेपरचे लॉगिन होत नाही. लॉगिन झाले की पेपर येत नाही. आणि पेपर आलास तर तो सबमिट देखील होत नाही. असे एक ना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना साईटवर प्रश्‍न दिसत नाही, तर एमसीक्यूचे ऑप्शन येत नाही, वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रॅश होत आहे. वेबसाईट मध्ये अडचणी आल्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नाही. विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत बसावे लागते. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाइन सतत व्यस्त राहते. परीक्षेच्या वेळेवर पेपर ओपन न होता 2 ते 4 तासांनी पेपर सुरू होत आहे. काही विषयाचा पेपर अगदी रात्री उशिरा सुरू होत आहे तर काही वेळेस तो पुढे ढकलावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. सर्व कारणामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परीक्षा घेण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments