वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीसाठी जिल्हा काँग्रेसची जोरदार तयारी

वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीसाठी

 जिल्हा काँग्रेसची जोरदार तयारी 


सुमारे ६०० पेक्षा अधिक ठिकाणांहून कार्यकर्ते सहभागी होणार  

वेब टीम नगर : काँग्रेस पक्षाच्या वतीने ऐतिहासिक वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. वर्चुअल सभा, फेसबूक, युट्युब या समाज माध्यमांद्वारे यामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार हे सहभागी होणार आहेत. नगर शहर आणि जिल्ह्यात देखील याची प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी कायदे मंजूर केले आहेत. कामगार विरोधी कायदे मंजूर केले आहेत. त्याचा काँग्रेस पक्ष काळे कायदे म्हणून उल्लेख करत समाजामध्ये जनजागृती करत आहे. राज्यभर आंदोलने सुरू आहेत. नगर शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने यासाठी आंदोलने, धरणे, सत्याग्रह करण्यात आला आहे.

त्याचा पुढचा टप्पा म्हणून आता १५ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ४.०० वाजता एकाच वेळी महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यामध्ये वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रॅलीचा प्रमुख कार्यक्रम राज्यातील पाच ठिकाणावरून असणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकमेकांशी इंटरनेट कनेक्ट असून पाच ठिकाणांहून काँग्रेसचे नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एस के पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव खा.राजीव सातव, महाराष्ट्राचे सहप्रभारी बी एम संदीप, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

त्याचबरोबर औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर या ठिकाणी देखील या सभा होणार आहेत. त्या - त्या विभागातील मंत्री त्या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत. 

श्रीरामपूर तालुक्यामध्ये आ लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीरामपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून या  सभा घराघरापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्या कर्जत, जामखेड तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले आहे. 

नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती गण, मोठ्या गावांमध्ये अशा सुमारे शहर आणि जिल्हा मिळून सुमारे  ६०० हून अधिक सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, नगरपंचायत निरीक्षक, तालुका निरीक्षक, विविध सेलचे प्रमुख यशस्वी आयोजनासाठी काम करत असल्याची माहिती जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी दिली आहे.

काँग्रेस कार्यालयातून शहरातील पदाधिकारी होणार सहभागी 

कालिका प्राइड येथील शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे या डिजिटल सभेमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच वेगळ्या प्रभागांमध्ये देखील समाज माध्यमांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती शहर काँग्रेस जिल्हा काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. 


Post a Comment

0 Comments