कोपरगावातील कोरोना बाधित ६० वर्षीय महिलेचा मृत्यू

जिल्ह्यातील ६९ स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव

कोपरगावातील कोरोना बाधित ६० वर्षीय महिलेचा मृत्यू


       वेब टीम नगर, दि. १४  -  कोपरगाव शहरातील कोरोना बाधित आढळलेल्या ६० वर्षीय महीलेचा आज पहाटे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या महिलेला श्र्वसनाचा तसेच रक्तदाबाचा त्रास होत होता. तिला काही दिवसापूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने बूथ हॉस्पिटल मधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. यामुळे जिल्ह्यात या महिलेच्या मृत्युमुळे कोरोनाचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. तसेच, कोरोना चाचणी निगेटीव आलेल्या कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील एका ६५ वर्षीय महिलेचा आज पहाटे ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव येथे मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी ६९ स्त्रावांचे अहवाल निगेटीव आले आहेत. यात काल रात्री उशीरा १६ जणांचे तर आज ५३ जणांचे अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले.

            कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सार्वजनिक संपर्क टाळावा आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

             कोपरगाव येथील या महिलेचा अहवाल दि. १० एप्रिल रोजी कोरोना बाधीत असल्याचा अहवाल पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाला होता.  त्यानंतर त्या महिलेला बूथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्याच दिवशी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. तिच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण हे ९० टक्केपेक्षा कमी असल्याकारणाने तिला कोविड-१९ च्या रुग्णांसाठीच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तेथे तिच्यावर औषधोपचार सुरु होते.

            दिनांक १३ रोजी रात्री १०-३० वाजता या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवून गरजेप्रमाणे सर्व औषधोपचार देण्यात आले. मात्र, औषधोपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज दिनांक १४ रोजी या महिलेची प्राणज्योत मालवली.

            याशिवाय, कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील ६५ वर्षीय महिलेचाही आज मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर महिलेची कोविड १९ साठीची चाचणी दिनांक ११ एप्रिल रोजी करण्यात आली होती. त्यात ही चाचणी निगेटीव आल्याने त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथे पहाटे ५ वाजता तिचा मृत्यू झाला. 

            कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता हे संकट जास्त वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कायद्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

Post a Comment

0 Comments