नगरमधील कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाच्या संख्येत वाढ



नगरमधील कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाच्या संख्येत वाढ  

नवी दिल्लीतील कार्यक्रमात जिल्ह्यातील ३४ जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट

                 यात जिल्ह्यात थांबलेल्या २९ परदेशी नागरिकांचा समावेश                  

             वेब टीम नगर, दि.१ - नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील ३४ जण असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी २९ जण परदेशी नागरिक आहेत. या परदेशी नागरिकांपैकी १४ जणांची स्त्राव चाचणी अहवाल अद्यापपर्यंत आले असून दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत ४३७ जणांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यातील ३०८ जणांचे स्त्राव निगेटीव तर ८ जणांचे स्त्राव पॉझिटिव आले आहेत. सध्या ११२ जणांचे स्त्राव तपासणी अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. या परदेशी व्यकतींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले जात आहे. या परदेशी व्यक्तींना संगमनेर, राहुरी, जामखेड आणि नेवासा येथून ताब्यात घेण्यात आले होते.
            दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हाधिकारी  द्विवेदी यांनी आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयात जाऊन तेथे क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची व्यवस्था, अजून तपासणी साठी व्यक्तीची संख्या वाढली तर करावयाची उपाययोजना आदींबाबत त्यांची चर्चा केली. तसेच, याठिकाणी पाहणी करुन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. बापूसाहेब गाढे, डॉ. घुगे आदींची उपस्थिती होती.
            सध्या जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्या परदेशी व्यक्ती या इंडोनेशिया, घाना, फ्रान्स, टांझानिया, आयव्हरी कोस्ट, जिबुटी, बुरुंडी,  दक्षिण आफ्रिका या देशातील असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक नागरिकांची माहिती घेऊन त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत आहे. सध्या ज्या व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, त्यांना रुग्णालयातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या व्यवस्थेची पाहणीही जिल्हाधिकारी  द्विवेदी यांनी केली.
            तपासणीसाठी येणार्‍या व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यासाठीची व्यवस्था आणखी कोठे करता येईल, याची पाहणी त्यांनी केली. ज्या तालुक्यातील व्यक्ती असतील त्यांना तपासणी अहवाल येईपर्यंत संबंधित तालुक्याच्या ठिकाणी क्वारंटाईन करता येईल का, अशी व्यवस्था तिथे आहे का, याबाबतही माहिती त्यांनी घेतली.
            सध्या ११२ जणांचे स्त्राव नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी असून आज दुपारपर्यंत आणखी ७ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली.   

Post a Comment

0 Comments