स्थलांतरित , मजूरांच्या राहण्या, जेवणाची केली सोय

अल्प कालावधीत गतिमान प्रशासनाचा माणूसकीचा चेहरा

     स्थलांतरित , मजूरांच्या राहण्या, जेवणाची केली सोय    


             वेब टीम नगर, दि. ३० -  स्थलांतरित आणि निराधार, मजूर आदी परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत आहेत तसेच त्यांच्या घराकडे जात असल्यामुळे त्यांना आहे त्याच ठिकाणी थांबवून त्यांची निवास आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात तात्काळ सर्व तालु्क्यांच्या तहसीलदार यांना सूचना देऊन यासंदर्भातील माहिती घेण्याचे आणि या कामगार, स्थलांतरित मजूर, नागरिकांची माहिती मिळविण्याच्या सूचना दिल्या, तात्काळ कार्यवाही होऊन जिल्हा पुरवठा यंत्रणेमार्फत संबंधितांना जेवणाची पाकिटे वितरित करण्यात आली. प्रशासनावर अचानक जबाबदारी येऊन पडली तरी आपत्कालिन परिस्थितीत सर्व यंत्रणेने संबंधितांपर्यंत जेवणाची पाकिटे पोहोच केली आणि प्रशासनातील माणूसकीचे चेहरे आणि कामाप्रतीची निष्ठा दिसून आली.     राज्य सरकारने निर्देश दिल्यानंतर लगेचच जिल्हा प्रशासन गतिमान झाले. जिल्ह्यातील महामार्गावरुन येणार्‍या स्थलांतरित मजूरांना ते जेथे असतील तेथेच थांबविण्यात आले. जवळच्या ठिकाणी जेथे निवारा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली. तालुकास्तरावरुन अशी सर्व माहिती जिल्हास्तरावर गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले. त्यासोबतच एका तालुक्यात किती जण आहेत, कोठे थांबलेत ही माहितीही घेण्यात येत होती. त्यांना निवारा शेडमध्ये पाठविण्यात आले.

            त्यानंतर त्यांना तेथे जेवणाची पाकीटे पोहोच करण्याची व्यवस्था पुरवठा विभाग आणि तहसील कार्यालयामार्फत पोहोच करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामुळे सगळी यंत्रणा सध्या विविध कामांमध्ये गर्क आहे, अशावेळी अचानक उद्भवलेल्या प्रसंगांना तोंड देण्याची जबाबदारीही जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणांवर येत आहे. अचानक या स्थलांतरितांच्या प्रश्नावरही प्रशासनाने तात्काळ सकारात्मक पावले उचलत कार्यवाही केली आणि संबंधितांना मदतीचा हातही दिला.

            एवढेच नाही तर, जिल्हाधिकारी   द्विवेदी यांना समाजमाध्यमातूनही अनेक मेसेज आले. काहींनी ट्विट करुन तर काहींनी व्हॉटस् अॅपद्वारे त्यांच्या भागातील या स्थलांतरितांची  आणि मजुरांची परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली.  द्विवेदी यांनी तात्काळ यासंदर्भात त्या-त्या तालुक्यांच्या तहसीलदारांना अवगत केले. यंत्रणा कार्यरत झाली आणि या संबंधितांपर्यंत मदतही पोहोचली.      

Post a Comment

0 Comments