कोरोनाचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत
वेब टीम मुंबई,दि. २९ -राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला असून. कोरोनाचा समावेश आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यामुळे या रुग्णांना मोफत उपचार सुविधा मिळणार आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दि.१ एप्रिल पासून राज्यभरात या योजनेअंतर्गत सुमारे १००० रुग्णालयांचा समावेश होणार असून त्या मध्ये कोरोनाचे रुग्ण मोफत उपचार घेऊ शकतील. या योजनेत सहभागी रुग्णालयातील सुमारे दोन हजार व्हेंटिलेटर देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासन करत असलेल्या उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे.शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री टोपे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णया बद्दल दोघांशी चर्चा केली.
राज्यात सुरू असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना अनेक दीर्घ व उपचारांचा खर्च न परवडणारे आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.या योजनेत राज्यभरातील ४९२ खाजगी रुग्णालय सहभागी असून येथे १ एप्रिल पासून यामध्ये दुपटीने वाढ होऊन १००० रुग्णालयांचा समावेश होईल.
राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेकविध उपयोग योजनांपैकी या योजनेमध्ये सहभागी असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या उपचाराची सुविधा जन आरोग्य योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रतेच्या अटी कोरोना बाधित रुग्णांसाठी शिथिल करण्यात आले आहेत.यामुळे कोरोनाग्रस्त कुठलाही रुग्ण योजनेअंतर्गत सहभागी रुग्णालयात उपचार घेऊ शकेल.
योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांच्या सहभागाची संख्या वाढणार असल्याने कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान दोन हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकतात त्याचबरोबर सुमारे एक लाख खाटाही यामधून उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
0 Comments