रक्तदान शिबिरे आयोजक आणि रक्तपेढ्यांसाठी

रक्तदान शिबिरे आयोजक आणि रक्तपेढ्यांसाठी
जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर


           वेब टीम नगर, दि.२९ - जिल्ह्यातील रक्तपेढ्या आणि काही सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात परवानगी मागत आहेत. त्याअनुषंगाने रक्तदान करण्याची व्यवस्था असलेल्या रक्तपेढी वा रुग्णालयांमध्ये रक्तदात्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश जारी केले असून अशी शिबिरे आयोजित करणार्‍यासाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. 

            या आदेशानुसार रक्तदात्यांनी केवळ रक्तपेढी मध्येच रक्तदान करण्यात यावे, रक्तपेढीमध्ये एका वेळी केवळ पाच रक्तदात्यांना प्रवेश द्यावा, रक्तदात्यास मागील ३ आठवड्यात कोणत्याही प्रकारचे संक्रमण झालेले नसावे, रक्तदात्याची मागील एक महिन्यात कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली नसावी, रक्तदात्याने रक्तदानापूर्वी जेवण किंवा अल्पोपहार घेतलेला असावा, रक्तदात्याचे वय शक्यतो १८ ते ६० वर्षादरम्यान आणि वजन किमान ५० किलो असावे, रक्तदात्याच्या मागील रक्तदानापासूनचा कालावधी ३ महिन्यापेक्षा अधिक असावा, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण१२.५ पेक्षा कमी नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

            कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी म्हणून विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, रक्तदान शिबिर आयोजकांनी संबंधित रक्तपेढीकडे  रक्तदात्यांची नाव आणि मोबाईल क्रमांकानुसार यादी सादर करावी. रक्तपेढीद्वारे रक्तदात्यांना पासेसचे वितरण करावे आणि आवश्यकतेनुसार रक्तदात्यांशी संपर्क साधून त्यांना रक्तपेढीतच रक्तदानासाठी बोलवावे. एका वेळेस जास्तीत जास्त पाचच रक्तदात्यांना रक्तदानासाठी बोलवावे. विशेष खबरदारी म्हणून रक्तदात्याने मास्क आणि रुमाल लावून रक्तपेढीत यावे. रक्तपेढीमध्ये हात धुण्याची व्यवस्था करावी आणि रक्तदात्यास हात स्वच्छ धुवून येण्याबाबत सूचना द्याव्यात. रक्तपेढीमध्ये उपस्थित सर्व व्यक्तींमध्ये किमान ६ फूटांचे अंतर असावे. रक्तदाता विदेश प्रवास करुन आलेला नसावा. रक्तदात्यांची कोरोना संबंधित स्त्राव चाचणी झालेली नसावी. तसेच मागील तीन आठवड्यात कोरोनाशी संबंधित लक्षणे नसावीत.

            सर्व रक्तदान शिबिर आयोजक, रक्तपेढ्या आणि रक्तदात्यांनी या नियमावलीची अंमलबजावणी करावी, असे या आदेशात म्हटले आहे.          

Post a Comment

0 Comments