शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करा
वंचित बहुजन आघाडी प्रणित संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीवेब टीम नगर,दि. ५- शेवगाव नगर परिषदेच्या कामगारांवर विविध प्रकारे अन्याय करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण व आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड . डॉ. अरुण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघे व निवासी जिल्हाधिकारी उदय किसवे यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेवगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील आंदोलन स्थळी ठिय्या आंदोलन केले. कर्मचार्यांनी प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी शेवगाव नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी कामगारांसोबत हुकूमशाही पध्दतीने वागतात. कोणत्याही कामगारांना पूर्वसूचना न देता निलंबित केले जाते. अनुभवी कामगारांना कामावरून काढून त्या ठिकाणी बिगर अनुभवी कामगारांची नियुक्ती केली जाते. कामगारांचे पगार वेळेवर केले जात नाही. अपात्र कर्मचाऱ्यांचे चुकीच्या पध्दतीने समावेशन केले जाते. कर्मचारी सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध केली जात नाही, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र खात्यावर जमा करण्यात यावी, सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके तात्काळ भरण्यात यावीत, सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन निश्चित करण्यात यावे. अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
या मागण्यांची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी प्रणित शेवगाव नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड. अरुण जाधव, प्यारेलालभाई शेख, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात, उपाध्यक्ष सूरज मोहिते, सचिव भानुदास गायकवाड, खजिनदार दिवाकर कसबे, विशाल इंगळे, राजुभाई शेख, दादासाहेब पोकळे, चंद्रकांत साळवे, कडु भारस्कार, प्रमोद गजभिवं, छायाबाई चव्हाण, मिनाबाई सोनवणे, संगीता खरात, पद्माबाई चव्हाण यांच्यासह शेवगाव नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. या निवेदनावर सर्व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
0 Comments