पर्यावरणाचा विचार न करता केलेल्या विकासामुळे देशाचे टाऊन प्लॅनिंग कोलमडले - पद्मश्री पोपटराव पवार

 पर्यावरणाचा विचार न करता केलेल्या विकासामुळे देशाचे टाऊन प्लॅनिंग कोलमडले - पद्मश्री पोपटराव पवार

पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शन; १५ हजार वृक्षांच्या संगोपनाचे आवाहन

साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने बैठक संपन्न

अहिल्यानगर : भारताची मूळ परंपरा निसर्गाशी जोडलेली आहे. मात्र, पर्यावरणाचा कोणताही विचार न करता ओढे-नाले यांमध्ये अतिक्रमणे, नद्यांच्या पूररेषेचे उल्लंघन करून बांधकामे आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे आपल्या देशाचे टाऊन प्लॅनिंग पूर्णपणे कोलमडले आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाच्या विषयावर आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, संजय गुगळे, कैलास दिघे, हर्षल आगळे, राजेंद्र पवार, प्रताप काळे, अमोल बागुल, राहुल मुथा आदी उपस्थित होते.

पद्मश्री पोपटराव पवार पुढे म्हणाले की, पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून शहरात आतापर्यंत १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही, तर दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या काळात लावलेली झाडे कशी जगवायची, याचे योग्य नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने लावलेले झाड जतन करून त्याला मुलाप्रमाणे सांभाळले पाहिजे. हेच आपल्या पुढील पिढीचे खरे भविष्य आहे.

आपण मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची स्वप्ने पाहतो. मात्र, पुढील पिढीचे भविष्यच अंधकारमय होणार असेल, तर त्या भविष्याचा विचार करून वृक्षांचे संगोपन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. असे काम केल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिप्रेत असलेले पर्यावरणपूरक कार्य आपल्या हातून घडेल.

पोपटराव पवार यांनी सातबारा संकल्पनेचा संदर्भ देत वृक्षांचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी जमीन महसूल पद्धतीचा अभ्यास केला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जमीन महसूल पद्धत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील पद्धत आणि पेशव्यांच्या काळातील महसूल पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात झाडांना पाण्याइतकेच महत्त्व दिले जात होते. बारा झाडे लावायची, त्यापैकी सात झाडांची फळे जमीन मालकाने घ्यायची आणि पाच झाडांची फळे महसूल म्हणून सरकारला द्यायची, अशी पद्धत होती. या संदर्भातून वृक्षांचे आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आपल्या अहिल्यानगर शहराची ओळख आहे. त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेले पर्यावरणसंतुलित आणि पाणीदार शहर घडविण्यासाठी ॲड. धनंजय जाधव यांनी हाती घेतलेल्या पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. साईबाबांची प्रेरणा समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. त्याच भावनेतून साई द्वारका सेवा ट्रस्टचा हा उपक्रम पुढील पिढीच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे आज जगभरात सामाजिक आणि विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांच्या अनेक कारणांपैकी मोठ्या प्रमाणावरील जंगलतोड हे एक महत्त्वाचे कारण आहे. पर्यावरण हा मतपेटीचा विषय नसून, तो पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण संतुलनासाठी काम करणे आवश्यक आहे.

पुढील काळात निसर्गाचे बदलते स्वरूप आणि चीनसारख्या देशाकडून निर्माण होणाऱ्या मोठ्या धोक्याचाही विचार करावा लागेल. पावसाची अनिश्चितता, वादळे आणि बदलते तापमान यामागे जंगलतोड हे प्रमुख कारण आहे. महाबळेश्वर आणि सिंधुदुर्गसारख्या भागांत दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे, तर ज्या भागांत पूर्वी कमी पाऊस पडत होता, तेथे अवेळी आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे पर्यावरण, निसर्ग आणि मनुष्यजीवनाचे मोठे नुकसान होत असल्याचे पवार यांनी नमूद केले.

यावेळी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत शहरात आतापर्यंत १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. दुष्काळाच्या काळात या वृक्षांचे संगोपन व्हावे, यासाठी पाण्याचे नियोजन आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर पद्मश्री पोपटराव पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

मनुष्याने निसर्गावर प्रेम करणे आवश्यक आहे. वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, दिवसेंदिवस वाढणारे तापमान कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आणि लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन समाजाला प्रेरणा देणारे असून, त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आदर्श घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments