दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करा!
तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागांत तातडीने टँकर सुरू करण्याची नगरसेवक रवींद्र बारस्कर यांची मागणी
पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था निर्माण करून नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्या; महापौर ज्योतीताई गाडे व आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन
अहिल्यानगर : अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर व उपनगरांतील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून ज्या भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, त्या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करून पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी महापौर ज्योतीताई गाडे आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी शहर व उपनगरांतील तीव्र पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले. पाणीटंचाईचा गांभीर्याने विचार करून नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवेदनात म्हटले आहे की, अल्प पर्जन्यमानामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, विविध परिसरांत तीव्र पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने धरणे, तलाव आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. परिणामी, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापराच्या पाण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अहिल्यानगर शहरातदेखील पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असून, विविध भागांतील नागरिकांकडून पुरेशा प्रमाणात आणि नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याची मागणी वाढत असताना उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. पाणीपुरवठा अनियमित झाल्यास सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व प्रभागांतील पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन योग्य नियोजन करावे. ज्या भागांत पाणीटंचाई अधिक आहे, अशा परिसरांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून सर्व भागांना योग्य प्रमाणात पाणी मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी बारस्कर यांनी केली आहे.
पाणीटंचाईवर उपाययोजना करताना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करावी, पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच बंद असलेल्या विहिरी आणि बोअरवेलची पाहणी करून त्यांचा वापर करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय ज्या भागांत नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही, तेथे पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था निर्माण करावी. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे बारस्कर यांनी म्हटले आहे.
अहिल्यानगर शहर व उपनगरांतील सद्यस्थितीतील पाणीटंचाईचा गांभीर्याने विचार करून सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, तीव्र टंचाई असलेल्या भागांत तातडीने टँकर सुरू करावेत आणि नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी केली आहे.





0 Comments