प्रेमदान चौकातील टँकर अपघातानंतर बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करा!

 प्रेमदान चौकातील टँकर अपघातानंतर बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करा!


आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

युवा क्रिकेटपटू यश जाधवच्या मृत्यूनंतर वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; टँकरची फिटनेस, विमा व कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी

अहिल्यानगर : शहरातील प्रेमदान चौक परिसरात झालेल्या भीषण अपघातात युवा क्रिकेटपटू यश अविनाश जाधव याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर शहरातील बेशिस्त वाहतूक आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संबंधित टँकर चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अवजड वाहनांची आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक स्थिती तपासावी आणि शहरात वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी महापौर ज्योतीताई गाडे, उपसभापती वर्षाताई सानप, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक करण कराळे, प्रकाश भागानगरे, पुष्कर कुलकर्णी, निखिल वारे, मनोज दुल्लम, बाळासाहेब पवार, प्रा. माणिकराव विधाते, महेश लोंढे, सुरेश बनसोडे, संदीप आडोळे, रोहन सानप, मोहित पंजाबी, दत्ता गाडळकर, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

नगरसेवक करण कराळे यांनी निवेदनात म्हटले की, दोन दिवसांपूर्वी झालेल्या टँकरच्या अपघातात युवा क्रिकेटपटू यश अविनाश जाधव याला आपला जीव गमवावा लागला. ट्रॅक्टर चुकीच्या दिशेने येऊन धडकल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरातील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालविण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण कराळे यांनी केली.

नगरसेवक निखिल वारे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना वाहनचालकांकडून, विशेषतः अवजड वाहनांच्या चालकांकडून, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप केला. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने जाणे तसेच नंबर प्लेट नसलेली वाहने रस्त्यावर धावणे, असे प्रकार निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले.

टँकरसारखी अवजड वाहने रस्त्यावर धावत असताना त्यांची आवश्यक कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र आणि विमा वैध आहे की नाही, याची नियमित तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रेमदान चौकातील अपघाताशी संबंधित टँकरची कागदपत्रे आणि तांत्रिक स्थिती तपासण्यात यावी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वाहतूक पोलिसांनी अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी निखिल वारे यांनी केली.

प्रेमदान चौकातील अपघातामुळे शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई, अवजड वाहनांची नियमित तपासणी आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलता येतील, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली.

दरम्यान, या प्रकरणाची संबंधित प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Post a Comment

0 Comments