छत्रपती शिवाजी महाराज कथा सोहळ्याचा शुभारंभ

 छत्रपती शिवाजी महाराज कथा सोहळ्याचा शुभारंभ

आ. संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत  : श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट आयोजित छत्रपती शिवाजी महाराज कथा सोहळ्याचा शानदार शुभारंभ

नगर - येथील श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स मध्ये आयोजित केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचा शुभारंभ आ. संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थित उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आला. कथेचे प्रवक्ते प. पू.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष नंदलालजी मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, कोषाध्यक्ष मगनभाई पटेल आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केल्यानंतर स्वामींना सन्मानित केले. शिव भारत या ग्रंथाचे पूजन आणि शिवरायांची आरती करून कथेस शुभारंभ करण्यात आला. नंदनवन उद्योग समूहाचे संजय जाधव यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने स्वामींचे आणि उपस्थित मान्यवरांसह श्रोतृवृंदांचे स्वागत केले.

श्री रामकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम आणि ढोल पथकाने तालासुरात वादन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

आ.जगताप यांनी श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टने शहरात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. युवकांनी या सोहळ्याचा मोठ्या संख्येने लाभ घेऊन शिवरायांचे गुण आत्मसात केले तर त्यांचा जीवनप्रवास निश्चितच चांगला होईल, असा विश्वास व्यक्त केला.

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष नंदलालजी मणियार यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, धर्म, राष्ट्र आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या स्वामी गोविंददेव गिरीजींची शासनाने अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास साठी महासचिव म्हणून नियुक्ती केल्याबद्दल शासनाचे आणि स्वामींचे अभिनंदन केले. प.पू.डोंगरे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टचा कार्यारंभ झाला आहे. रामकृष्ण परिवार संस्काराची खाण आहे. युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र समजणे काळाची गरज आहे, हे ओळखून कथा सोहळ्याचे आयोजन केले, असे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करत स्वामींनी कथा निरूपणाचा शुभारंभ केला. ते म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील नेवासा येथील कविंद्र परमानंद हे शिवाजी महाराजांसोबत राहिलेले आहेत. त्यांनी लिहिलेला शिवभारत हा ग्रंथ तंजावरच्या ग्रंथालयात उपलब्ध झाला आहे. शिवाजी महाराजांची संमती घेऊन त्यांनी हा ग्रंथ लिहिला, हे विशेष होय. विश्वाचे मांगल्य साकारणारा हिंदू धर्म केवळ शिवरायांमुळे टिकला. पापी यवनांचा नायनाट करत शिवरायांनी हिंदवी साम्राज्य उभे केले. मोगलांचे आक्रमण देशातील संस्कृतीचा संपूर्ण नाश करण्यासाठी होते. हिंदूंनी कधीही कोणावर आक्रमण केले नाही की, कोणालाही शत्रू समजले नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर्वांचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना करणारी भारतीय परंपरा आहे. विश्व मांगल्याचा विचार हा भारत देशाचा स्थायीभाव आहे.

मंदिरे फोडणे, गायींना रस्त्यावर ओढून आणत कापणे, महिलांना पळवणे असा अत्याचार शतकानुशतके आपल्या देशावर चालला. समर्थ रामदास स्वामींनी या काळरात्रीचे यथार्थ वर्णन केले आहे. 

सरदार मालोजीराजे यांचे उत्तम संस्थान होते. त्यांचे सुपुत्र शहाजीराजे यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न उराशी बाळगले म्हणून १९ फेब्रुवारी १६३० या सुदिनी शिवनेरी गडावर शिवबांचा जन्म झाला. जिजाबाईंनी शिवबांवर जे गर्भसंस्कार केले ते शिवरायांना अखंड स्फूर्ती देत राहिले. बाल शिवाजींनी संस्कृत भाषेत प्रकाशित केलेली राजमुद्रा त्यांना संस्कृतचे उत्तम ज्ञान होते, हेच सांगते. जिजाबाईंसह दादोजी कोंडदेव, सोनोपंत डबीर या गुरूंनी बाल शिवाजींना घडविण्यात दिलेले योगदान लक्षवेधी आहे. आक्रमकांनी १६३० साली उद् ध्वस्त केलेले पुणे परत वसवण्यासाठी बाल शिवाजीने वयाच्या सहाव्या वर्षी  सोन्याच्या फाळांनी नांगरत कसबा गणपतीची प्रतिष्ठापना केली. त्यांची आज्ञापत्रे प्रगल्भ अभ्यासाचे दर्शन घडवतात, असे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांनी सांगितले. 

सर्वश्री शरद झंवर, रामेश्वर बिहाणी, हिरालाल पटेल, डॉ. शरद कोलते, विनोद पटेल, पुरूषोत्तम नावंदर, दत्ता जाधव, सौ.मंगल जाधव, सौ.सुवर्णा जाधव आदी मान्यवरांसह शहरातील आणि उपनगरातील हिंदू धर्म प्रेमी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments