स्पर्धात्मक युगात ज्ञान, तंत्रज्ञान, योग्य गुंतवणुकीचा अवलंब आवश्यक

 


स्पर्धात्मक युगात ज्ञान, तंत्रज्ञान, योग्य गुंतवणुकीचा अवलंब आवश्यक


 अविनाश कुलकर्णी : एसा नॉलेज सिरीजमध्ये ‘रेंटल यिल्ड, सोलॅटियम आणि व्यवसाय वृद्धी’ विषयावर मार्गदर्शन



व्यवसाय अधिक सक्षम, फायदेशीर व शाश्वत करण्यासाठी आधुनिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन


अहिल्यानगर : आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (एसा) अहिल्यानगर आणि पोलाद स्टील, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एसा नॉलेज सिरीज’ अंतर्गत संस्थेचे ज्येष्ठ सभासद अविनाश कुलकर्णी यांचे ‘रेंटल यिल्डचे गुंतवणुकीतील महत्त्व, सोलॅटियमचे जमीन गुंतवणुकीतील महत्त्व आणि बांधकाम व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी पूरक बाबी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे सहप्रायोजक पोलाद स्टील होते.

यावेळी मार्गदर्शन करताना अविनाश कुलकर्णी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ अनुभव पुरेसा नसून, सखोल ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला विकसित करण्याची तयारी आवश्यक असल्याचे सांगितले. व्यवसाय अधिक सक्षम, फायदेशीर आणि शाश्वत करण्यासाठी योग्य गुंतवणूक, कायदेशीर माहिती आणि आधुनिक कार्यपद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.


व्याख्यानामध्ये त्यांनी तीन महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

रेंटल यिल्ड आणि ॲप्रिसिएशन यिल्ड या विषयावर बोलताना त्यांनी मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना केवळ मालमत्तेच्या किमतीत होणारी वाढ (ॲप्रिसिएशन) न पाहता, त्यातून मिळणारे नियमित भाडे उत्पन्न (रेंटल यिल्ड) देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गुंतवणूकदारांनी आर्थिक परताव्याचा सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

सोलॅटियम इन लँड ॲक्विझिशन या विषयावर त्यांनी जमीन संपादन प्रक्रियेदरम्यान मिळणाऱ्या भरपाईतील सोलॅटियम म्हणजे काय, त्याचे स्वरूप, त्याचा लाभ कसा मिळतो आणि जमीनधारकांचे कायदेशीर हक्क कोणते आहेत, याविषयी सविस्तर माहिती दिली.

तसेच बांधकाम व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार, नवीन व्यक्तींशी व्यावसायिक संपर्क वाढविणे, बदलत्या बाजारपेठेनुसार कार्यपद्धतीत सुधारणा करणे आणि सातत्याने कौशल्यविकास करणे आवश्यक असल्याचे सांगत विविध उपयुक्त टिप्स त्यांनी उपस्थितांना दिल्या.

वरील तिन्ही विषयांचा थेट संबंध व्यवसाय, गुंतवणूक आणि आर्थिक हिताशी असून, या विषयांचे योग्य ज्ञान प्रत्येक व्यावसायिकासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित देवी यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगात नवीन ज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पोलाद नॉलेज सिरीज ही सभासदांना अद्ययावत ज्ञान मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास पोलाद स्टीलचे सुशांत गव्हाणे, आदेश गूंगे, एसा उपाध्यक्ष प्रदीप तांदळे, सचिव भूषण पांडव, सुनील औटी, संतोष खांडेकर, संजय चांडवले, सुनील जाधव, सचिन डागा, रत्नाकर कुलकर्णी, अन्वर शेख, सुरेश परदेशी, आदिनाथ दहिफळे तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव मांडगे यांनी केले, तर अनमोल जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments