नाट्य समीक्षण
'ती तिचा दादला आणि मधला' चा संस्मरणीय प्रयोग
नगर : 63 व्या राज्य नाट्य स्पर्धेचा दुसऱ्या दिवशी वात्सल्य प्रतिष्ठानने प्र. ल. मयेकर लिखित 'ती तिचा दादला आणि मधला' हे दोन अंकी विनोदी नाटक सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन नानाभाऊ मोरे यांनी केलं .
एक ट्रक ड्रायव्हर त्याची बायको आणि तिचा प्रियकर यांच्या भोवती हे कथानक फिरतं . ट्रक ड्रायव्हर जालिंदर शिंदे हा अत्यंत रांगड्या स्वभावाचा असल्याने मनस्वी जगण्याकडे त्याचा कल असतो . त्याची पत्नी निलम ही तिचा प्रियकर चंदन याच्याशी लग्न करू इच्छिते ,मात्र या लग्नासाठी तिला तिचा पती जालिंदर यांच्याकडून घरस्फोट मिळवायचा असतो. तिचा प्रियकर चंदन हा नाना क्लुप्त्या करत जालिंदर शिंदे चा काटा काढण्यामागे असतो. मात्र निलमचा जालिंदरचा खून करण्याला विरोध असतो.
एकदा चंदन निलम बरोबर पार्कमध्ये फिरत असताना त्याला त्याचा काका त्याला पार्कमध्ये भेटतो. यावेळी काका त्याच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या बाई बरोबर पार्कमध्ये फिरायला आलेला असतो. चंदनची विचारपूस केल्यानंतर तो चंदनला शब्द देतो की तो नीलमच्या घरी जाऊन चंदन व तिच्या लग्नाबद्दल बोलेल.
एक दिवस खरच चंदनाचा काका नीलम च्या घरी पोहोचतो, घरातच असलेला जालिंदर जेव्हा बाहेर येऊन चौकशी करतो तेव्हा नीलम तिचा तो काका असल्याचा बनाव करते. इतक्यात चंदन तिथे येतो आणि तो काकाला नीलम कडे पाहून अचंबित होतो. इतक्यात पुन्हा जालिंदर तेथे येतो आणि विचारतो हा कोण तेव्हा काका चंदन हा आपला मुलगा असल्याचा सांगतो. त्यावर जालिंदर काका म्हणजे सासरे आणि त्यांचा मुलगा म्हणजे माझा मेव्हणा असे म्हणतो, जालिंदर दोघांचाही चांगला पाहुणचार करतो . काका जालिंदरला सांगतो की चंदनचे एका बाईवर प्रेम आहे, पण त्या बाईचा नवरा तिला घटस्फोट देत नसल्याने चंदनचे लग्न होऊ शकत नाही. तर जालिंदर स्वतःच चंदनचे लग्न त्याच्या प्रेयसी बरोबर लावून देण्यासाठी पुढाकार घेतो . चंदन त्याचा काका आणि जालिंदर या तिघांची चर्चा होते . ते चंदनच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढण्याचे ठरवतात. तिघांच्या चर्चेअंती काका एका मर्डर स्पेशालिस्ट ला नीलमचा मामा बनवून घरात बोलवतो. त्याचं नाव आ. ज. काळसेकर तो नीलम च्या घरात आल्यानंतर ते सर्व मिळून जालिंदरच्या पश्च्यात त्याचा खून करण्यासाठी नाना युक्त्यांचा वापर करतात .
बाजीराव नावाचा एक रिक्षा चालक जालिंदर कडे येतो. त्याची बायको चंपाचं लग्न चंदन बरोबर करण्याचे त्या सर्वांचे चर्चेअंती ठरते. या सगळ्या घडामोडी घडत असताना नीलमला जालिंदर कडून घटस्फोटही नको असतो आणि ती जालिंदरची एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेते. नीलम आणि जालिंदर नुकतेच एका डॉक्टरकडे जाऊन आलेले असतात आणि त्याचा रिपोर्ट येतो की नीलम गरोदर आहे.आ. ज. काळसेकर आणि इतर पात्रांच्या कायीक आणि वाचिक अभिनयातून बरेच विनोद घडतात.
या नाटकात काकाची भूमिका बजावणाऱ्या नाना मोरे यांनी त्यांच्या सहज अभिनयातून आणि संवादफेकीतून इरसाल काका दमदारपणे उभा केला. तर जालिंदर शिंदेच्या भूमिकेतील मोनिश ढाळे यांनी रांगडा ट्रक ड्रायव्हर ताकदीने उभा केला. चंदनची भूमिका अजय लाटे यांनी हलकाफुलका अभिनय करत दमदारपणे साकारली. मात्र मामाच्या म्हणजेच आ. ज. काळसेकर भूमिकेतील शुभम घोडके मात्र त्याच्या कायीक आणि वाचिक अभिनयाने चांगलाच भाव खाऊन गेला . पल्लवी दिवटे यांनी सहज सुंदर अभिनयाने जालिंदरची पत्नी आणि चंदनच्या प्रेयसीची म्हणजेच निलमची भूमिका साकारली .
अंजना मोरे यांनी ट्रक ड्रायव्हरच्या घराला साजेस नेपथ्य उभारले गणेश लिमकर आणि स्वयं दायमा यांनी कथा नका लासाजेशी प्रकाश योजना केली. रंगभूषाकार चंद्रकांत सैंदाणे आणि संगीत शैलेश देशमुख यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडल्या त्यातूनच 'ती तिचा दादला आणि मधला' चा प्रयोग नगरकरांसाठी संस्मरणीय ठरला.
0 Comments