काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतला उमेदवारी अर्ज
जागा काँग्रेसलाच मिळेल, गुंदेचा यांचा दावा
नगर : विधानसभा निवडणुकीचे अर्ज मिळण्याची व भरण्याची प्रक्रिया मंगळवार (दि.२२) सकाळ पासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज नगर तहसील येथील निवडणूक कार्यालयातून घेतले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शहराची जागा काँग्रेसलाच मिळेल असा दावा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी केला आहे.
२९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. ३० ऑक्टोबर रोजी छाननी तर ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे. काँग्रेसचे काळे यांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मनोज गुंदेचा म्हणाले की, जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. नगर दक्षिणेत सहा पैकी किमान एक जागा ही निश्चितपणे काँग्रेसला मिळणार असल्याचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. नगर शहरामध्ये काँग्रेस नेते किरण काळेंच्या रूपाने सक्षम उमेदवार महाविकास आघाडीकडे आहे. आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे. शहरात मतदारांना बदल हवा आहे. काळे निश्चित निवडून येतील अशी परिस्थिती आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, राज्यातील काँग्रेस पक्षश्रेष्ठी तसेच काँग्रेस हायकमांडने नगर शहराची जागा ही जागा वाटपात काँग्रेसला मिळावी यासाठी तिन्ही पक्षांच्या जागा वाटप समितीमध्ये आग्रह धरलेला आहे. बुधवारपर्यंत या बाबत शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. मविआतर्फे आम्ही शहराची जागा नगरकरांच्या पाठिंब्याने निश्चितपणे जिंकू असे मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.
0 Comments