जि. प. गट व गणाच्या ८ हरकतीला आयुक्तांची मंजुरी

जि.प.गट व गणाच्या ८ हरकतीला आयुक्तांची मंजुरी 

वेब टीम नगर : जिल्हा परिषद गट व गणांच्या प्रारूप रचनेवर जिल्हा भरातून दाखल झालेल्या ६५ हरकतीपैकी फक्त ८ हरकतीला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंजूरी दिली असून ५७ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. यातील ७ हरकती नगर तालुक्यातील असून त्यांना मंजुरी मिळाल्याने नगर तालुक्यातील गट आणि गणांच्या प्रभाग रचनेत मोठे फेरबदल होणार आहेत. आता ते बदल नेमके कसे असतील हे दि.२७ जून रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यावरच समजणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी २ जून २०२२ रोजी जिल्ह्यातील ८५ जिल्हा परिषद गट आणि १७० पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द केली. या रचनेवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. या प्रारूप रचनेवर जिल्हाभरातून एकूण ६५ हरकती दाखल झाल्या होत्या. या दाखल हरकतींवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुनावणी घेतली. या हरकतींवर २२ जून २०२२ पर्यंत निर्णय घेऊन अंतिम गट व गणांच्या रचनेस मंजुरी देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त गमे यांनी सुनावणीत ६५ पैकी फक्त ८ हरकतींवरील आक्षेप मान्य केले. त्यानुसार काही गटात दुरूस्ती करून अंतिम रचनेस बुधवारी (दि.२२) मान्यता दिली.

नगर तालुक्यातून सर्वाधिक १२ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी निंबळक येथील समीर पटेल, भोरवाडी येथील रामदास भोर, शिराढोण येथील प्रितेश दरेकर, गुणवडी येथील अक्षय कुटे, निबंळक येथील कानिफनाथ कोतकर, चास येथील राधाकृष्ण वाळूंज व निंबळक येथील डॉ. दिलीप पवार यांच्या ७ हरकती विचारात घेऊन विभागीय आयुक्त गमे यांनी नगर तालुक्यातील गट व गणात फेरफार करीत अंतिम रचना तयार केली आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव बु. येथील नितीन भानुदास औताडे यांनी देखील पोहेगाव गटाबाबत आक्षेप नोंदविला होता. त्यांच्या हरकतीची देखील दखल घेतली गेली आहे. या हरकती मंजूर करत तयार केलेली अंतिम प्रभाग रचना दि.२७ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

Post a Comment

0 Comments