पंजाबात खुनाचा प्रयत्न करणारा शिर्डित जेरबंद

पंजाबात खुनाचा प्रयत्न करणारा शिर्डित जेरबंद 

वेब टीम शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (ता.राहाता) या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र ठिकाणी जालंधर, पंजाब येथे खूनाचा प्रयत्न करुन पोलिसांना चकवा देत लपलेल्या सराईत गुन्हेगारास पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

पुनित ऊर्फ पिम्पु बलराज सोनी (वय २७, रा. घ.नं. २६२ रोड नंबर -५, शहिद बाबुलालसिंग नगर, जालंधर, राज्य पंजाब) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि दिनकर मुंडे, सपोनि सोमनाथ दिवटे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, दत्ता हिंगडे, विजय वेटेकर, संदीप पवार, पोना भिमराज खर्से, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, पोकाॅ सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव व चापोहेकॉ बबन बेरड, अर्जुन बडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, जालंधर विभाग क्र. २ पोलीस ठाणे, राज्य पंजाब गु.र.नं. ५६/२०२२ भादविक ३०७, १४८, १४९ सह आर्म ॲक्ट २५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी पुनित ऊर्फ पिम्पु बलराज सोनी हा गुन्हा केल्यापासून आपले स्वतःचे अस्तित्व लपवून, वेळोवेळी राहण्याची ठिकाणे बदलून राहत होता. जालंधर, पंजाब पोलीसांनी प्रयत्न करुन तो मिळून येत नव्हता.

पोलीस कमिशनर जालंधर, पंजाब येथील गुन्हे शाखेतील पोनि इंद्रजीतसिंह यांनी पोलीस महासंचालक साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन फरार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत विनंत केल्या. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना आपले घटकामध्ये फरार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. आदेशान्वये जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोनि श्री. कटके यांना स्थागुशाचे विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेत असतांना पोनि श्री. कटके यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयीत शिर्डी येथील हॉटेलमध्ये राहतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पोनि श्री. कटके यांनी दोन विशेष पथकांना घेऊन शिर्डी येथे जाऊन परिसरातील १३३ हॉटेलची तपासणी केली. तपासणी दरम्यान हॉटेल निर्मल इन लॉजमध्ये तपासणी करत असतांना जालंधर पोलीसांकडून प्राप्त शोधपत्रिके प्रमाणे एका संशयीतास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव जसप्रितसिंग भुलाव (रा. जालंधर, पंजाब) असे असल्याचे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी करता त्याने त्याचे खरे नाव पुनित ऊर्फ पिम्पु बलराज सोनी (वय २७, रा. घ.नं. २६२ रोड नंबर -५, शहिद बाबुलालसिंग नगर, जालंधर, राज्य पंजाब ) असे सांगून संशयीताने उपलब्ध केलेल्या कागदपत्राचे आधारे आरोपी हाच आहे. अशी पथकाची खात्री झाल्याने त्याच्याकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तात्काळ त्यास पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले व गुन्हे शाखा, पोलीस कमिशनर जालंधर, राज्य पंजाब यांच्याशी संपर्क करुन आरोपीस ताब्यात घेतल्याबाबत कळविले. त्यांनी आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द पंजाब राज्यामध्ये दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती दिली. त्याच्याकडील विशेष पथक तात्काळ शिडी येथे येऊन आरोपीस पुढील कारवाई करीता जालंधर, राज्य पंजाब येथे घेऊन गेले.

Post a Comment

0 Comments