शिवाजी महाराजांचे आरमार आणि अहमदनगर

इतिहासाच्या पाऊलखुणा : शिवाजी महाराजांचे आरमार आणि अहमदनगर 

सन १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी वेळ न दवडता मोगली व विजापुरी फौजांना धूळ चारली.  प्रचंड गडकिल्ले स्वराज्यात जोडले काही पेठा  लुटून स्वराज्याला धनाची कमतरता पडू नये याची सोय केली.  किनारपट्टीच्या ठिकाणचे इंग्रज पोर्तुगीज यांचे प्रगत आरमार यांना शह देण्यासाठी आपल्याकडे त्या तोडीचे  किंवा त्यापेक्षा वरचढ असे किनारपट्टीवर आपले आरमार असायला पाहिजे.  त्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी तयारी केली.  याच विचाराने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ नोव्हेंबर १६६४ मध्ये मालवण येथे गेले.  त्या ठिकाणी त्यांना कुरटे नावाचे बेट आढळून आले.  ते थोडे समुद्रात आत  होते.  परंतु ते ठिकाण  शिवाजी महाराजांना खूप आवडले त्यांनी ताबडतोब ते ठिकाण पक्के करून अकरा ब्राह्मणांच्या मंत्र घोषाने सिंधुदुर्ग गडाची पायाभरणी केली व कोनशिला बसवली.  सिंधुदुर्ग हा किल्ला पुढील वाटचालीसाठी खूप महत्त्वाचे काम करणार होता.  त्याची शिवाजी महाराजाना  खात्री होती.  त्यामुळे पश्चिम किनारपट्टीला  पूर्णपणे संरक्षण मिळणार होते.  आणि  मराठ्यांच्या आरमाराची ताकद खूप वाढणार होती.  शिवाजी महाराजांनी आणखीन एक पाऊल पुढे टाकून फ्रेंच, डच, इंग्रज ,पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्याकडे चाकरी करणारे व त्या भागाची माहितगार मंडळी मोपली, कोळी, कहार, भंडारी, प्रभू, मुसलमान व कोकणी मराठी यांना राजांनी भरपूर पगार देऊन स्वराज्याच्या आरमारात  सामिल करून घेतले.  दर्यासारंग, दौलतखानास मालवणच्या बंदरात बोलावून नवीन गलबते, महागिऱ्या , तराडी, शिवडे बनविण्याचे आदेश दिले.  त्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध करून दिला होता.

            किल्ल्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी पाच हजाराची खडी फौज तयार केली होती.  सिंधुदुर्ग या किल्ल्याचे बांधकाम देखरेखीसाठी गोविंद विश्वनाथ प्रभू या बांधकाम माहितगार  माणसाची शिवाजीराजांनी नेमणूक केली.  किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी आसपासच्या गावातील अंदाजे दोन अडीच हजार दवंडी आणि तेवढेच मजूर म्हणजे जवळजवळ पाच ते सहा हजार माणसे दोन वर्षे कष्ट करीत होते गोवेकर फिरंगी यांच्याकडे बांधकामात इंजिनियर आहेत हे समजल्यावर महाराजांनी त्यांना भरपूर पगार देऊन किल्ल्याच्या पायाच्या बांधकामासाठी पाचारण केले व त्यांच्याकडून पायाच्या बांधकामासाठी पाच खंडी शिसे ओतून किल्ल्याचे बांधकाम चालू केले.  एकंदर एक कोटी पेक्षा जास्त खर्च करून किल्ल्याचे मजबुतीकरण केले . या किल्ल्याला कोणत्याही परिस्थितीत धन कमी पडू दिले नाही.  सन १६६४ सालात  महाराजांनी खूप पराक्रम करून स्वराज्याची सीमा वाढवली.  मोगली व विजापुरी फौज नामोहरम करत असतानाच सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग या नव्या दुर्गांची निर्मिती केली.  या साठी त्यांनी हुबळी बंदर लुटून भरपूर लूट मिळविली होती.  त्यामुळे मराठ्यांची आरमाराची  ताकद प्रचंड वाढली.  समुद्रातून प्रवास करतानाही प्रवाश्याना  शिवाजी महाराज यांची परवानगी घ्यावी लागत होती.  सातवाहनांनंतर आरमारी ताकद वाढवणारा हिंदू राजा म्हणून शिवाजीराजांना गणले  जात होते.

 या प्रकारे जलदुर्गाची निर्मिती करण्यासाठी अहमदनगरला निजामशाही राज्य असताना अहमदनगर येथील व्यापारी सधन लोकांनी खारीचा वाटा याप्रमाणे शिवाजीराजांना धनाची मदत केली होती . ही घटना साधारणत: सन १६६४/६५  साली घडली  आहे.  अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खूप धन साठवले व नवीन किल्ले तयार करून ते स्वराज्यात जोडले आणि अहमदनगर या शहरामध्ये शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांच्यापासून असलेले ऋणानुबंध टिकवण्यात यशस्वी झाले.

स्वच्छ सुंदर किनारा, समुद्रातील प्रवाळ असलेल्या  सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड जागतिक पर्यटन स्थळांमध्ये करण्यात आली आहे.  समुद्री जीवनाच्या दर्शनाची सोय उपलब्ध असल्याने तसेच चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे पर्यटन सोपे झाले असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशात पोहोचला आहे.  जागतिक पर्यटनाच्या  यादीत जगातील सर्वात सुंदर आंतरराष्ट्रीय तीस  पर्यटन स्थळांमध्ये भारतातील नऊ ठिकाणांचा समावेश झाला असून या यादीत सिंधुदुर्ग किल्ल्याचा ही समावेश आहे.

 लेखक : नारायण आव्हाड 

मोबाईल :९२७३८५८४५७

संदर्भ : संग्रहालय लायब्ररी अहमदनगर 

Post a Comment

0 Comments