तीन वर्षांत २५ हजार आत्महत्या

तीन वर्षांत २५ हजार आत्महत्या

२०१८ ते २०२० या कालावधीत कर्जबाजारीपणा, बेरोजगारीचा परिणाम

वेब टीम नवी दिल्ली : एकीकडे भविष्यातील विकासाचे चित्र सरकारकडून रंगवून सांगितले जात असताना करोनापूर्व आणि उत्तर काळात आर्थिक अडचणींनी सामान्य नागरिकांचे जिणे किती अवघड झाले होते, याचे चित्रच समोर आलेल्या आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

देशात २०१८ ते २० या तीन वर्षांत बेरोजगारीमुळे ९ हजार १४० तर, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार ९१ अशा २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या आकडेवारीच्या आधारे केंद्राने आत्महत्यांसंदर्भातील माहिती वरिष्ठ सभागृहात मांडली.

केंद्र सरकार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवत असून त्याद्वारे देशातील ६९२  जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाला साह्य करत आहे. मानसिक आरोग्य सुधारणा कार्यक्रम व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून आत्महत्या रोखण्याचा केंद्र प्रयत्न करत असल्याचे राय यांनी  सांगितले.

करोनाकाळात सर्वाधिक आत्महत्या 

बेरोजगारीमुळे आत्महत्यांचे प्रमाण हळूहळू वाढत गेले असून करोनाच्या काळात २०२० मध्ये ते सर्वाधिक म्हणजे ३ हजार ५४८ इतके होते. २०१८ मध्ये २ हजार ७४१ जणांनी तर, २०१९ मध्ये २ हजार ८५१ जणांनी आत्महत्या केली.

कर्जबाजारीपणा वा दिवाळखोरीमुळे २०१८ मध्ये ४ हजार ९७०, २०१९ मध्ये ५ हजार ९०८ जणांनी आत्महत्या केली. २०२०मध्ये ही संख्या ६०० ने कमी झाली. या काळात ५ हजार २१३ जणांनी मृत्यूला कवटाळले.

Post a Comment

0 Comments