सरसकट शाळा माहाविद्यालये बंद करू नयेत

सरसकट शाळा माहाविद्यालये बंद करू नयेत 

स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याची पालक ,शिक्षकांची मागणी 

वेब टीम नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय सरसकट बंद करण्याऐवजी स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक प्रशासनाला अधिकार द्यावेत.महाराष्ट्राची भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये प्रचंड तफावत असून सरसकट शाळा महाविद्यालय बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशा प्रकारची मागणी विद्यार्थी पालक शिक्षक वर्गातून होत आहे.

महाराष्ट्रात अनेक खेड्यापाड्यात, डोंगरदऱ्यात, वाड्या पाड्यावर शाळा आहेत तेथे कोरोनाचा कुठलाच प्रादुर्भाव नाही. शिवाय ऑनलाईन शिक्षणाचे वास्तव फार विदारक आहेजगात मागील कोरोनाच्या दोन लाटेत मुलांना कोरोना होण्याचे व त्यात मृत्यू झाल्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. शिवाय आता १५ च्या पुढे अनेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. ज्या शाळेत कोरोना बाधित विद्यार्थी आढळतील तेथील शाळा बंद करणे उचित ठरेल.

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखन वाचनाचा वेग कमी झाला असून शिक्षणापासून मुले दूर जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पोहोचत नाही, तर जेथे पोहोचते तेथील मुलांच्या आरोग्यावर त्याचे दुरगामी परिणाम होताना दिसत आहे.

शाळा बंद केल्याने अनेक ठिकाणी बालमजुरी व बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. वारंवार शाळा बंद होत असल्याने ग्रामीण-शहरी विद्यार्थ्यांमध्ये मोठी दरी निर्माण होत आहे. ग्रामीण व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांमध्ये व पालकांमध्ये न्यूनगंड निर्माण होत आहे. यातून पिढीच्या पिढी बरबाद होण्याची भीती निर्माण झाली आहे.. 

Post a Comment

0 Comments