इतिहासाच्या पाऊलखुणा
निजामशाही कालीन खापरी नळ योजना
निजामशाही कालीन अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारी खापरी नळ योजना व त्या नळाच्या नावांची यादी व कोणी बांधले याची माहिती
१) वडगाव नळ- निजामशाहीचा सरदार सलाबतखान यांनी तयार केला. या नळाचे पाणी शहराच्या पश्चिम भागामध्ये व सुलतान यांच्या राजवाड्याला जात होते.इ.स.१६३० मध्ये मलिकअंबरचा मुलगा बाबून याने वडगाव नळाचा नाश केला आणि सुलतानाचा राजवाडा जाळला होता.काही वर्षांनी नवाब फर्खलाज खान सुभेदार असताना मियांमंटूकी या नावाच्या इसमाने एक लाख रुपये खर्च करून दुरुस्त केला. व 'निआकार' नावाचे एक सरोवर होते हे सरोवर कोठे होते याचा काही तपास लागत नाही.
२) कापूरवाडी नळ - इकतीयारखान ,कासिम खान व सिद्धी समशेर खान या सरदारांनी बांधला. काही वर्षांनी तो खराब झाला. परंतु औरंगजेबाचा सरदार सर्जे खान याने तो परत दुरुस्त केला आणि त्याचे पाणी आपल्या वाड्यात नेले. नंतर काही वर्षांनी हा नळ गंजा पर्यंत नेला सुभेदार फर्खलाज खान व किल्लेदार अब्दुल गफूर यांच्या वाड्यात हे पाणी नेले गेले .
३)भिंगार नळ -फराहबाग करिता या नळाची निर्मिती केली गेली. सलाबत खान गुर्जी व न्यामत खान दखनी या सरदारांनी याची निर्मिती केली . बुर्हाणशहास बेहस्तबागेचा वीट आला होता. त्यामुळे या दोन सरदारांनी फराहबक्ष (फराहबाग ) तयार केला व तेथे नळाचे पाणी आणून सोडले.
४) शहापूर नळ - या नळाची ऐतिहासिक माहिती मिळत नाही . या नळाची ऐतिहासिक माहिती संशोधकांनी मिळवली तर खूप चांगले होईल.
५) आनंदी नळ - आनंदराव नावाच्या इसमानेच बांधला त्यांनी चौपाटी कारंजा व आनंदी कारंजे ही दोन कारंजी बांधली व त्या त्या नळाचे पाणी आणून सोडले आनंदराव हा कोण होता माहित नाही परंतु आनंदी बाजार व आनंदी कारंजा ही नावे त्याच्या नावावरून पडली असावी असे वाटते .
६) नागाबाई नळ - अहमदशहाने या काळामध्ये भुईकोट किल्ला बांधला आणि त्याच्या खंदकामध्ये नळाचे पाणी आणून सोडले होते. ब्रिटिश काळामध्ये या नळाचे पाणी शहरात आणले गेले.
७) शेंडी नळ - सलाबतखान गुर्जी यांनी हा नळ बेहस्त बागे करता तयार केला व पुढे त्याचे पाणी लकड महालास पुरवले जात होते.
८) वारूळवाडी नळ - सन१५५२ ते १५६५ या काळात तयार केला गेला आणि तो मुर्तूजा खान तक्ती व फराह खान दखनी यांनी बांधला.
९) नेप्ती नळ - १०) निमगाव नळ - बुऱ्हाण निजामशहा पहिला याच्या कारकीर्दीत त्याने तयार केला व त्याने आपल्या वाड्यात आणून सोडला इ.स.१६३० मध्ये बाबून याने त्याचा नाश केला. हे दोन्ही नळ शेजारी शेजारी आहेत .
११) इमामपूर नळ - या नळाचा पिंपळगाव माळवी पर्यंत तपास लागतो, पुढे लागत नाही.याचा इतिहासाचे प्राध्यापक किंवा संशोधक यांनी तपास केल्यानंतर नवीन माहिती उपलब्ध होईल.
१२)पिंपळगाव नळ - हा नळ सलाबतखानाने शेंडी नळास जोडण्यासाठी तयार केला होता.परंतु त्याचे काम अपूर्ण राहिले .
१३) भंडारा नळ - हा नळ फराहबागे करिता तयार केला होता. त्याची ऐतिहासिक माहिती मिळत नाही.
१४) नागापूर नळ - हां नळ चंगीझ खान या सरदाराने बांधला या नळाने पाणी शहरास येत होते.
१५) भवानी पंतांचा नळ - भवानीपंताच्या वाड्यातील दोन हौदास नगरकर यांच्या वाड्यातील हौदास येत होते. हे भवानीपंत कोण होते याची माहिती मिळत नाही संशोधकांनी याचा तपास करावा जेणेकरून नगरकरांना त्याची माहिती मिळेल.
0 Comments