नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई अडकली लग्नबंधनात; बर्मिंगहॅममध्ये केले लग्न

नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई अडकली लग्नबंधनात; बर्मिंगहॅममध्ये केले लग्न

फोटो पोस्ट करत मलालाने पुढील आयुष्याची वाट पाहत आहोत असे म्हटले आहे

वेब टीम बर्मिंघहॅम :  नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाईचे बर्मिंगहॅममध्ये एका छोट्या समारंभात लग्न पार पडले. मलालाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून मलालाने  ही माहिती दिली आहे. फोटो पोस्ट करत मलालाने आम्ही घरी लग्न केले आहे आणि पुढील आयुष्याची वाट पाहत आहोत असे म्हटले आहे.

मलालाने ट्विटरवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. “आजचा दिवस माझ्या आयुष्यातील खूप खास आहे, असर आणि माझे लग्न झाले आहे. आम्ही बर्मिंगहॅम येथील घरी आमच्या कुटुंबियांसोबत निकाह सोहळा पूर्ण केला. कृपया आम्हाला तुमची प्रार्थना द्या. पुढच्या प्रवासात सोबत राहण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे मलालाने म्हटले आहे. मलालाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिचा पती असर, तिचे आई-वडील, झियाउद्दीन युसुफझाई आणि तूर पेकाई युसुफझाई दिसत आहेत.

मुलींच्या शिक्षणाच्या बाजूने आवाज उठवणारी मलाला ही पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातील आहे. नऊ ऑक्टोबर २०१२रोजी मलालाला शाळेच्या बसमधून जात असताना तालिबानने तिच्या डोक्यात गोळी झाडली होती. तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. गंभीर स्थिती पाहून मलालाला उपचारासाठी ब्रिटनला नेण्यात आले. तेथे शस्त्रक्रियेनंतर तिचे प्राण वाचले. तिच्या वडिलांनाही ब्रिटनमधील पाकिस्तानी दूतावासात नोकरी देण्यात आली होती. आय एएम मलाला (I Am Malala) नावाच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकानंतर ती जगप्रसिद्ध झाली.

मलाला युसुफझाईला २०१४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि हा पुरस्कार भारताचे बाल हक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत देण्यात आला. मलालाने गेल्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांत पदवी संपादन केली. मलाला आता २४ वर्षांची आहे आणि मुलींच्या शिक्षणासाठी काम करते. तिच्या मलाला फंडाने अफगाणिस्तानमध्ये दोन दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.

व्होग या प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलालाने लग्नाला अनावश्यक म्हटले होते. ती म्हणाली होती की लोक लग्न का करतात हे मला समजत नाही. जर तुम्हाला जीवनसाथी हवा असेल तर तुम्ही लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या का करता, फक्त भागीदारी का होऊ शकत नाही? मलालाच्या या विधानावर इतका वाद झाला की तिचे वडील झियाउद्दीन युसुफझाई यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.

Post a Comment

0 Comments