म्हणून मी मुख्यमंत्र्याना 'ते 'पत्र लिहिले : सरनाईकांचा खुलासा

म्हणून मी मुख्यमंत्र्याना 'ते 'पत्र लिहिले : सरनाईकांचा खुलासा 

 वेब टीम मुंबई : 'भाजपशी पुन्हा जुळवून घ्या' असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आज पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं प्रथमच मीडियासमोर आले. मुख्यमंत्र्यांना आपण ते पत्र का लिहिलं होतं, याचा खुलासाही त्यांनी आज केला. 

महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीवर आरोप करत सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांकडून सतत त्रास दिला जात आहे. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र, तेव्हापासून सरनाईक एकदाही मीडियापुढं आले नव्हते. आज मीडियाशी बोलताना त्या पत्राबाबत खुलासा केला.

'महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाच्या सर्व घडामोडींमध्ये मी आणि माझी दोन्ही मुलं होती. सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू असताना तिन्ही पक्षाच्या आमदारांची व्यवस्था पाहत होतो. सरकार आल्यानंतर ज्या-ज्या वेळी महाविकास आघाडीवर विरोधकांनी आरोप केले, तेव्हा पक्षाचा एक प्रवक्ता म्हणून उत्तरं देण्याचं कामही मी केलं होतं. अर्णव गोस्वामी, कंगना राणावत प्रकरणातही मी आक्रमकपणे सरकारची बाजू मांडत होतो. त्यामुळं मी विरोधकांच्या हिटलिस्टवर आलो. कारण नसताना माझ्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली. अशा वेळी माझ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या मागे राहायला हवं होतं. माझा पक्ष आणि पक्षप्रमुख ठामपणे माझ्या मागे उभा होता. पण सरकार म्हणून महाविकास आघाडी माझ्या मागे नव्हती. मीरा-भाईंदरमध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण मी विधानसभेत लावून धरलं होतं. त्यावरही कारवाई झाली नाही. त्यामुळं उद्विग्न होऊन मी पत्र लिहिलं होतं,' असं सरनाईक म्हणाले. मात्र, आता तो विषय संपला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Post a Comment

0 Comments