इस्रायल-पॅलेस्टिनचा संघर्ष ; रॉकेट हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू

इस्रायल-पॅलेस्टिनचा संघर्ष ; रॉकेट हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू

वेब टीम तेल अवीव : इस्रायल आणि पॅलेस्टिनमधील तणाव वाढला असून युद्ध सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूने सातत्याने रॉकेट हल्ले सुरू आहेत. इस्रायलने मंगळवारी गाझा पट्टीवर हवाई हल्ला करत दोन इमारती उद्धवस्त केल्या. या इमारतींमध्ये अतिरेकी लपले असल्याची शंका इस्रायल होती. तर, इस्रायलने केलेल्या कारवाईला पॅलेस्टिनमधील हमास आणि अन्य सशस्त्र गटाने केलेल्या रॉकेट हल्ल्यात एका इस्रायलयमध्ये असलेल्या एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

गाझा पट्टीतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या हल्ल्यात १० लहान मुले आणि एका महिलेसह २८ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. यातील बहुतेकजण हे हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. तर, जवळपास १६ अतिरेकी ठार झाले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

भारतीय महिलेचा मृत्यू

इस्रायलच्या कारवाईला गाझा पट्टीती सशस्त्र गटांनी प्रत्युत्तर दिले. इस्रायलवर डागलेल्या रॉकेट हल्ल्यात केरळच्या एका महिलेचा मृत्यू झाला. अश्केलोन शहरात असलेल्या ३१ वर्षीय सौम्याच्या घरावर हमासने डागलेला रॉकेट पडला. त्यावेळी ती पती संतोषसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. 'पीटीआय'शी बोलताना संतोषचा भाऊ साजीने सांगतिले की, व्हिडिओ कॉल दरम्यान माझ्या भावाने स्फोटाचा मोठा आवाज ऐकला. त्यानंतर अचानक फोन कट झाला. त्यानंतर आम्ही तिथं असलेल्या मल्याळी बांधवांशी संपर्क साधला. त्यांच्या मार्फत आम्हाला या घटनेबाबत समजले असल्याचे साजीने सांगितले.

केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील सौम्या मागील सात वर्षांपासून इस्रायलमध्ये एक घरकाम मदतनीस म्हणून काम करत होती. आतापर्यंत या घटनेला अधिकृतपणे अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला नाही.

भारत-पॅलेस्टाइन भ्रातृभाव मंचाकडून निषेध

इस्रायलकडून पॅलेस्टाइन नागरिकांवर होत असलेल्या दडपशाहीचा भारत-पॅलेस्टाइन भ्रातृभाव मंचाकडून निषेध करण्यात आला आहे. शेख जर्रामधील पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायलकडून लक्ष्य करण्यात येत असल्याचे मंचाने म्हटले आहे. जवळपास १३० नामवंत भारतीयांनी इस्रायलच्या कारवाईचा निषेध केला आहे. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांसाठी पवित्र असणाऱ्या या ठिकाणाचे संरक्षण पॅलेस्टाइन नागरिकांनी केले आहे. मात्र, इस्रायलमधील झिओनिस्ट फॅसिस्ट हा वारसा उद्धवस्त करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments