अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : ताहराबादचे संत चरित्रकार संत महिपती महाराज (भाग ३)
महिपती महाराजांना शरीर साथ देईना, वय झाले होते. त्या वेळेला त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना नारायण बुवा आणि विठ्ठल बुवा यांना सांगितले मी घोड्यावर बसून दिंडीला येणार, त्याप्रमाणे त्या दोघांनी त्यांची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी दिंडी टाळ मृदुंगाच्या तालावर वाजत गाजत निघाली पहिला मुक्काम बारागाव नांदूर येथे होता. त्या रात्री महाराजांचे कीर्तन खूप चांगले रंगले . सकाळी दिंडी निघाली महाराजांना भोवळ आली . त्यांनी घोड्यावरून खाली उतरविले. महिपती महाराजांना घेऊन डोली निघाली . महाराजांना माघारी घेऊन गेले ताहराबादला आल्यानंतर महाराजांनी पांडुरंगाला १०८ ओव्यांचे पत्र लिहिले होते केशव बुवांकडे देऊन त्यांना म्हणाले हे पत्र पांडुरंग चरणी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी केशवबुवा दिंडी घेऊन निघाले व आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांनी ते पत्र पांडुरंगाला दिले व देवाला विनंती केली. त्याच क्षणी पांडुरंग प्रगट झाले व म्हणाले माझ्या भक्ताला भेटण्यासाठी मी येतो तेव्हा देवाला पाहुणचारासाठी शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि भाकरीचा बेत केला होता. तो खाऊन पांडुरंग तृप्त झाले त्यांनी महिपती महाराज यांना वचन दिले की मी आषाढ शुद्ध एकादशीला पंढरीत राहील व आषाढी एकादशी ते अमावस्या पर्यंत तुमच्या गावी ताहराबादला येईन .
तिथे दिलेल्या पाहुणचाराचे प्रतीक म्हणून पुरण पोळी बरोबर आजही शेवग्याच्या पाल्याची भाजी भाकरीचा नैवेद्य महिपती महाराजांचे वारस दाखवत असतात. श्रावणातील गोकुळाष्टमी झाल्यावर सोमवार एकादशी असते तो दिवस महिपती महाराजांनी महानिर्वाण दिनासाठी निवडला विठ्ठल कृपेने मी सर्व संतांच्या कथा लिहून ठेवलया आहेत परंतु 'संत विजय' हा ग्रंथ लिहिण्यास बाकी राहिले आहे भविष्यात निर्माण होणारा एखादा तरी पुरुष माझा ग्रंथ पूर्ण करेल, शेवटी तो दिवस उजाडला एकादशीला किर्तन झाले द्वादशीचे पारणे झाले. शेवटचे शब्द महाराज बोलले 'हा भक्तीचा सोहळा असाच चालू ठेवा. हरिनामात आपले मन रमवा संत समागम करा. अतिथींना विष्णू समान मानून त्यांचे आतिथ्य करा. वंशजांनी कुळधर्म समजून वारी चालू ठेवावी. आषाढी वद्य दशमी ते अमावस्या पर्यंत वार्षिक उत्सव चालू ठेवावा' एवढे बोलून महीपति महाराजांनी देह ठेवला.
येवला तालुक्यातील अंदरसुल या गावचे आनंदराव सटवाजी शेकदार हे महाराजांचे परमभक्त होते त्यांना महाराजांना भेटण्याची खूप इच्छा झाली ते घोड्यावर जायला निघाले ते ताहराबाद जवळ पोहोचले व त्यांनी पाहिले महाराजांना भेटण्यासाठी मी निघालो आणि महाराज घोड्यावरून घाट उतरताना दिसत आहेत . महिपती महाराज जवळ आल्यावर एकदा शेकदारांना बोलले तुझी भेट घेण्याची इच्छा होती. तू भेटलास आनंद वाटला तू वाड्यावर जा. वाड्यावर आल्या बरोबर शेकदारांना महाराजां बद्दलची हकीकत कळाली त्यांना फार दुःख झाले. आता इतके लांबून आले तर दोन घास खाऊन पाणी प्या असे महिपती महाराजांच्या घरचे म्हणाले, 'मी महाराजांची भेट झाल्याशिवाय अन्न घेणार नाही.' गुरूला भक्तांची फार काळजी असते. म्हणून महाराजांनी शेकदाराला तेराव्या दिवशी दर्शन दिले शेकदार वाईट वाटून घेऊ नकोस. योग आहे तेथे वियोग आहे. जो आला तो गेलाच पाहिजे ,हा सृष्टीचा नियम आहे. खाऊन घे माझी आज्ञा समज गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून शेकदाराने भोजन केले.
पांडुरंगाने आषाढ वद्य नवमी ते अमावस्येपर्यंत ताराबाद येण्याचे कबुल केल्याप्रमाणे दरवर्षी 'पाऊल घडी' नावाचा कार्यक्रम केला जातो. पांडुरंगाच्या मूर्ती पासून मंदिराच्या गाभार्या पर्यंत हळद कुंकू बुक्का टाकतात. त्यावर पागोटे अंथरून, त्यावर पण हळद कुंकू टाकले जाते. वेदशास्त्रसंपन्न गुरूंकडून पूजा करून देवाला येण्याचे आवाहन केले जाते. रात्रभर भजन केले जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पागोटे अलगद उचलले जाते,तेथे पांडुरंगाची पाऊले उमटलेली दिसतात , त्यालाच पांडुरंग येऊन गेल्याची प्रचिती मानली जाते यालाच 'पाऊल घडी' असे म्हणतात हा कार्यक्रम दरवर्षी आजही ताहराबाद मध्ये होतो मंदिरात हजारो लोकांच्या साक्षीने हा कार्यक्रम होत असल्याने ताहराबादला पांडुरंगाला आणणारे संत महिपती महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम जयश्री महिपती महाराज की जय. (संपूर्ण)
लेखक : नारायण आव्हाड
९८८१९६३६०३
संदर्भ वस्तु संग्रहालय ग्रंथालय ,
सचित्र संत महिपती ताहराबादकर
विजय प्रभाकर नगरकर
बुक मीडिया प्रकाशन पांडेचरी, भारत
0 Comments