मुंबईला मागे टाकत दिल्ली बनली कोरोनाची राजधानी

 मुंबईला मागे टाकत दिल्ली बनली कोरोनाची राजधानी 

वेब टीम नवी दिल्ली : देशाची राजधानी आता कोरोनाचीही राजधानी बनत असल्याचं दिसून येत असून या शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्लीमध्ये एकाच दिवशी, मुंबईच्या तुलनेत सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीमध्ये बुधवारी  आणि गुरुवारी प्रत्येकी १७हजारांहून नव्या रुग्णांची भर पडलीय. ही संख्या एखाद्या शहरातील सर्वाधिक संख्या आहे. मुंबईमध्ये या आधी ४ एप्रिलला एकाच दिवशी ११,१६३ नव्या रुग्णाची भर पडली होती.

मुंबईमध्ये गुरुवारी कोरोनाच्या ८,२१७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये ४९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही पाच लाख ५३ हजार १५९ इतकी झाली असून मृतांची एकूण संख्या ही १२,१८९वर पोहोचली आहे. 

दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीत गुरुवारी १७ हजाराच्या जवळपास कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये ११२ जणांना आपला प्राण गमावावा लागला आहे. दिल्लीमध्ये एकूण मृतांची संख्या आता ११,६५२ इतकी झाली आहे.

दिल्लीमध्ये गुरुवारी कोरोना संक्रमणाचा दर हा २०टक्क्यांवर पोहचला आहे, जो आतापर्यंत उच्चतम आहे. बुधवारी  हा दर १६ टक्क्यांच्या जवळपास होता. दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाची एकूण संख्या ही सात लाख ८४ हजार १३७ इतकी झाली असून ७. १८ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दिल्लीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली असून ती ५४,३०९ इतकी झाली आहे. 

दिल्लीतील रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या गरजेनुसार उपलब्ध आहे असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याच कारण नाही असंही त्यांनी म्हटलंय. 

Post a Comment

0 Comments