जंगी विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर कारवाई

 जंगी विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर कारवाई 


वेब टीम कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून आखून दिलेल्या नियमाची पायमल्ली सुरूच आहे. कल्याण पूर्वेत नियमाची पायमल्ली करत बुधवारी संध्याकाळी ७०० लोकांच्या उपस्थितीत रंगलेल्या जंगी विवाह सोहळ्याच्या आयोजकांविरोधात पालिका प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अनलोक काळात लग्नसमारंभाना परवानगी देऊन केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने काहीशी शिथिलता देण्यात आली असली तरी लग्न समारंभात मात्र ५० लोकांनाच परवानगी होती. आता पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही दिखाऊपणा करताना नागरिकांना नियमांचा विसर पडत आहे.

कल्याण पूर्वेतील ६० फुटी रस्त्यालगत असलेल्या गॅस कंपनीशेजारी करण्यात आलेल्या शाही विवाह सोहळ्यात तब्बल ७०० नागरिकांनी उपस्थिती लावली होती. याची माहिती मिळताच ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांच्या पथकाने पाहणी केली असता यात तथ्य आढळल्याने या विवाह सोहळ्याचे आयोजकांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१, तसेच कोविड-१९ उपाययोजना नियम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments