नगरटुडे बुलेटिन 16-02-2021

 नगरटुडे बुलेटिन 16-02-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ.अरूधंती जोशी सरनाईक यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

श्री समर्थ रामदास स्वामीच्या हस्ताक्षरातील वाल्मीकी रामायणाचा मराठी भावानुवाद,  संशोधनपर प्रत तयार करण्याच्या प्रकल्पात महत्वपूर्ण योगदान 

वेब टीम नगर :  श्री समर्थ रामदास स्वामीच्या हस्ताक्षरातील वाल्मीकी रामायणाचा मराठी भावानुवाद, व  संशोधनपर प्रत तयार करण्याच्या प्रकल्पात महत्वपूर्ण योगदान दिल्याबददल पेमराज सारडा कॉलेजच्या सेवानिवृत्त संस्कृत प्राध्यापिका डॉ.अरूधंती सुधाकर जोशी सरनाईक यांचा धुळे येथील श्री समर्थ  वाग्देवता मंदिर या संस्थेच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. हा प्रकल्पही या संस्थेच्या वतीने चालवला जात आहे.

संस्थेच्या रामायणातील किष्किंधाकाण्डम्  या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी हा सन्मान करण्यात आला. मंदिराचे अध्यक्ष शरदराव कुबेर,सज्जनगड संस्थानचे अध्यक्ष विष्णुदास बुवा आदीसह मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते.या  पुरस्काराचे   स्वरूप रोख रक्कम तसेच श्री रामदासाचे शिष्य कल्याण स्वामी यांनी काढलेले मारूतीरायाचे चित्रांची छायांकित प्रत देण्यात आली.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन डॉ.अपर्णा बेडेकर यांनी केले.

डॉ.अरूधंती जोशी सरनाईक यांनी तीन वर्षापुर्वी राज्यपालाच्या हस्ते संस्कृतमधील विशेष योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने मुंबई येथील राजभवनामध्ये सन्मान करण्यात आला होता.तसेच काश्मीरमधील श्रीनगर विदयापीठात शोधनिबंधाचे वाचन केले आहे.संगमनेरमध्ये आंतरराष्टीय संस्कृत परीषदेत महत्वपूर्ण सहभाग होता.जोशी यांना प्रा.डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर, पेमराज सारडा कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. मधुसूदन बोपर्डीकर,प्रा.डॉ.श्रीकांत केळकर तसेच बंधू अशोक सरनाईक आदीचे  मार्गदशन लाभले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वस्तू व सेवा करच्या अधिकारीपदी वर्णी लागल्याबद्दल

निमगाव वाघा येथील श्रध्दा जाधव हिचा गौरव

वेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्रध्दा गणेश जाधव यांची वस्तू व सेवा कर वर्ग दोनच्या अधिकारीपदी वर्णी लागल्याबद्दल स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य पै.नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, लक्ष्मण चौरे, गोरख जाधव, ह.भ.प. बबन महाराज जाधव आदी उपस्थित होते.

गावातील श्रध्दा जाधव हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन वस्तू व सेवा कर वर्ग दोनच्या अधिकारी होण्याचा बहुमान मिळवून गावाचे नांव उंचावले आहे. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून, समाजाच्या विकासात्मक जडण-घडणीत मोलाचे योगदान देत आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने लग्नानंतर मिळवलेले यश कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले. श्रध्दा जाधव हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करताना प्रारंभी अपयश आले. मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने प्रयत्न करुन यश संपादन केले. मुलींनी लग्नानंतर देखील शिक्षण बंद न करता आपली गुणवत्ता व क्षमता स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून सिध्द करण्याचे आवाहन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वयंसेवी संघटनांच्या वतीने व्हेलनटाईन दिनी  कॉ. बाबा आढाव यांचा सन्मान 

श्रमिक कामगारांसाठी देव माणुस म्हणून कॉ. आढाव यांची ओळख 

अविनाश घुले : दि ग्रेट लॉरिस्टर ऑफ इंडियन वर्किंग क्लास हा सन्मानाने मानवंदना

वेब टीम नगर : वंचित, दुबळे व श्रमिक कामगारांना न्याय मिळण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे कॉ. बाबा आढाव यांना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने व्हेलनटाईन डे च्या दिवशी हुतात्मा स्मारकात दि ग्रेट लॉरिस्टर ऑफ इंडियन वर्किंग क्लास हा सन्मानाची मानवंदना देण्यात आली. कॉ. आढाव यांनी वंचित, दुबळे व श्रमिकांप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल स्वयंसेवी संघटनेच्या वतीने वर्चुअल पध्दतीने हा सन्मान सोहळा पार पडला. 

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हमाल, मापाडी व कामगार चळवळीचे नेते स्व.शंकरराव घुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश घुले, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरुम, अशोक भोसले, पोपट भोसले, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, फरिदा शेख, आशा वडागळे, गोपीनाथ म्हस्के, सुशीला नारायण, गीता डहाळे, शिवाजी वाघमारे, संतोष नांगरे आदि उपस्थित होते.

 अविनाश घुले म्हणाले की, श्रमिक कामगारांसाठी देव माणुस म्हणून कॉ. बाबा आढाव यांची ओळख आहे. त्यांनी कष्टकरी, माथाडी, हमाल आदी असंघटित कामगारांना संघटित करुन चळवळीच्या माध्यमातून न्याय देण्याचे कार्य केले. त्यांनी हमाल माथाडींसाठी कायदा करुन घेतला. वंचित, दुबळ्या लोकांसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्याची गरज होती. सर्वसामान्यांच्या वतीने देण्यात आलेला हा सन्मान देखील मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी अविनाश घुले यांची निवड झाली असता घरकुल वंचितांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर वारुळाचा मारुती परिसरातील महापालिकेच्या जागेत घरकुल वंचितांसाठी प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात आली. घुले यांनी या भागात असलेल्या उद्यानाचे आरक्षण उठवून घरकुल वंचितांचा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आश्‍वासन दिले.

अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, असंघटित कामगारांचे नेतृत्व कॉ. बाबा आढाव यांनी केले. ते राजकारणात गेले असते, तर त्यांना मोठे पद देखील मिळाले असते. मात्र श्रमिक, कष्टकर्‍यांच्या वेदना व दु:ख कमी करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. स्वार्थी राजकारणापेक्षा निस्वार्थ भावनेने त्यांनी कामगार चळवळ चालवली. त्यांच्या प्रेमापोटी स्वयंसेवी संघटनांनी व्हेलनटाईन डे च्या दिवशी त्यांचा सन्मान केला असल्याचे त्यांनी सांगितले. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे यांचा सत्कार

वेब टीम नगर :  निमगाव वाघा ग्रामपंचायत निवडणुकीत पै. नाना डोंगरे मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने त्यांचा फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांनी सत्कार केला. यावेळी अरुण अंधारे, रामदास पवार, जावेद शेख, संदिप डोंगरे, मुश्ताक शेख, गौरव काळे, देवीदास निकम, अक्षय जाधव आदी उपस्थित होते.

अतुल फलके म्हणाले की, सामाजिक कार्यात योगदान देऊन नाना डोंगरे यांनी गावाचे नांव उंचावले आहे. त्यांची ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विकासात्मक कार्याला गती मिळणार आहे. ग्रामस्थांनी सर्वसामान्य व्यक्तीला निवडून काम करण्याची संधी दिली असल्याचे सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी ग्रामस्थांनी सामाजिक कार्याची दखल घेत ग्रामपंचायतमध्ये सेवा करण्याची संधी दिली असून, या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ न देणार नाही. अविरतपणे गावाच्या विकासासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 शासकीय जमीनी खरेदी-विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी  

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण

वेब टीम नगर - शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घेणार-देणार, साक्षीदार व संबंधीत अधिकारी तसेच या योजनेचा दुबार लाभ घेणार्‍यांवर गुन्हे दाखल होण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या वतीने मार्केड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपोषणाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, पारनेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुणराव रोडे, डॉ.अभिजीत रोहोकले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव हजारे, नगर तालुकाध्यक्ष युवराज हजारे, हरेश्‍वर साळवे, सचिन ठुबे, श्रीरंग रोहोकले, जगदीश आंबेडकर, संतोष भांड, भानुदास साळवे आदी सहभागी झाले होते.

मौजे भाळवणी (ता. पारनेर) येथे एका मागासवर्गीय कुटुंबाने शासनाकडून उदरनिर्वाहासाठी घेतलेली वर्ग दोनची गट नंबर ६५१ या जमिनीची विक्री केली. शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री केल्याप्रकरणी सदर जमीन शासनास जमा करण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत. सदर व्यक्तींनी शासनाची फसवणुक केल्याचे सिध्द झाले आहे. या प्रकरणातील खरेदी देणार, घेणारम साक्षीदार व त्यांना मदत करणारे अधिकारी यांच्यावर फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल व्हावे. तसेच सदर कुटुंबाने एकाच योजनेचा दुबार लाभ घेऊन फसवणुकीने कोट्यावधी रुपयाची जमीन मिळवली आहे. त्यांच्या ताब्यातील  गट नंबर७०१/६ ही सरकारी जमीन शासनाकडे पुन्हा वर्ग करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.  

सरकारने दलित, मागासवर्गीय भूमिहीनांना भोगवटादार म्हणून वर्ग दोनच्या सरकारी जमीन वाटप केले. पण भाळवणी (ता. पारनेर) येथील लँड माफियांनी कवडीमोल किमतीत मागासवर्गीयांच्या दारिद्रयाचा फायदा घेऊन लाभार्थ्यांकडून जमिनी लाटल्या. काही भूमिहीनांना शासनाला अंधारात ठेवून दप्तराच्या नोंदीत खाडाखोड करुन त्याचा दुबार लाभ घेतला. शासनाची फसवणुक करणार्‍या अशा व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी म्हंटले आहे. एक महिन्यात संबंधीतांवर गुन्हे दाखल न झाल्यास विभागीय आयुक्त नाशिक कार्यालया समोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्हॅलेंटाईन डे साजरा

सामाजिक कार्यालाच प्रेमाचे प्रतिक मानून वंचितांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा निर्धार व्यक्त करुन प्रेम दिवस साजरा

वेब टीम नगर : एकमेकांवर प्रेम दर्शविण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना, सामाजिक उपक्रमाने दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करणार्‍या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. वर्षभर सेवाप्रीत फाऊंडेशनशी सामाजिक कार्यासाठी जोडल्या गेलेल्या महिलांनी सामाजिक कार्यालाच प्रेमाचे प्रतिक मानून हा प्रेम दिवस साजरा करुन, वंचितांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा निर्धार व्यक्त केला.

सावेडी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सेवाप्रीतने वर्षभर राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. व्हॅलेंटाईन डे दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुशिला मोडक यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, सविता चड्डा, डॉ.सिमरन वधवा, निशा धुप्पड, कशीश जग्गी, अर्चना खंडेलवाल, अन्नू थापर, गीता नय्यर, अनुभा अ‍ॅबट, रितू वधवा, रुपा पंजाबी, गीता माळवदे या प्रमुख पदाधिकार्यांसह ग्रुपच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सेवाप्रीतच्या सर्व महिला सदस्या वंचितांना वर्षभर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रेम देत असतात. सर्व महिला या ग्रुपच्या माध्यमातून जोडल्या गेल्या असून, हा ग्रुपच सर्वांचा प्रेमाचा प्रतिक बनला आहे. आपण ज्यांच्याशी प्रेम करतो ते व्हॅलेंटाईन असते. सर्व महिला सामाजिक कार्यासाठी सेवाप्रीतशी प्रेम करत असल्याने ग्रुपबरोबर प्रेमदिवस साजरा करण्यात आला असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी सेवाप्रीतच्या वतीने गरजू व दिव्यांग विद्यार्थी, वंचित घटक, गरजू महिला यांच्यासाठी राबविलेले सामाजिक उपक्रम तसेच टाळेबंदीत महिलांनी मोठ्या धाडसाने घराबाहेर पडून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सरपंचांनी आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावे 

पद्मश्री पोपट पवार : साई संजीवनी प्रतिष्ठान नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पवार व आ.  लंके यांचा जाहीर सत्कार

वेब टीम नगर : गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना व योग्य दिशा मिळते. राजकारणात बदल घडत असतात. नव्याने नेतृत्व उदयास येऊन नवीन कार्यकर्ते घडत असतात. मात्र गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. सरपंचांनी आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावे. ग्रामपंचायतच्या निवडणुका संपल्या असून, सर्व हेवेदावे सोडून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.

नेप्ती (ता. नगर) येथे साई संजीवनी प्रतिष्ठान व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री पोपट पवार व आमदार निलेश लंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात पद्मश्री पवार बोलत होते. बबनराव फुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी पंचायत समिती सदस्य देवा (किसन) होले, सरपंच सुधाकर कदम, माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच संभाजी गडाख, वसंतराव पवार, शिवाजी होळकर, दिलीप होळकर, राजेंद्र होळकर, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.

पुढे पद्मश्री पवार म्हणाले की, नेप्ती व हिवरेबाजारचे सलोख्याचे संबंध असून, एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे. गावासाठी अनेक विकासात्मक योजना असून, या योजना कार्यान्वीत करुन त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. नुकतेच गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून चांगला अनुभव मिळाला. या निवडणुकीचा उत्साह व ग्रामस्थांचे प्रेम पाहून अनेक कटकटी टळल्या. एक रुपयाही खर्च न करता गावात 90 टक्के मतदान झाले. निवडणुकीत बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त झाल्या, तर आत्मविश्‍वास देखील वाढला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात बंडू जपकर यांनी गावाच्या सर्वांगीन विकासासाठी साई संजीवनी प्रतिष्ठान देत असलेले सहयोग व सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तर कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य गरजू घटकांना केलेली मदत, मोफत आरोग्य शिबीर, प्रतिष्ठानच्या सर्व युवकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा केलेला संकल्प, गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचा आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत रघुनाथ होळकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सिताराम जपकर यांनी करुन दिला. यावेळी पद्मश्री पवार व आमदार लंके यांच्या हस्ते गावातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक, सेवानिवृत्त सैनिक व शिक्षकांचा तसेच गावात आरोग्य चळवळ चालविणार्‍या सपना वेलनेस सेंटरच्या टिमचा सन्मान करण्यात आला. तर दैठणे गुंजाळचे सरपंच बंटी गुंजाळ व टाकळी ढोकेश्‍वरचे सरपंच अरुणा खिलारी यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार निलेश लंके म्हणाले की, असंतुष्ट आत्मे व त्यांच्या व्यक्तीदोषामुळे राळेगण व हिवरेबाजार सारख्या गावात निवडणुका लागल्या. ज्या गावांनी देशाला दिशा देण्याचे कार्य केले असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपट पवार यांचे कार्य व ख्याती देशभर आहे. त्यांच्या कार्यातून सर्वच गावातील युवकांना दिशा मिळत आहे. पारनेर मतदार संघात असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पद्मश्री पोपट पवार ही बलस्थाने असून, त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. साई संजीवनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन नेप्ती मधील रस्ते तसेच प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ होले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, उपाध्यक्ष छबुराव फुले, एकनाथ होले, बंडू जपकर, सिताराम जपकर, शांताराम साळवे, बबन कांडेकर, छभुराव जपकर, राजू भुजबळ, दादू चौघुले, गजानन होळकर, बाबासाहेब भोर, तानाजी सप्रे, पोपट कोल्हे, विठ्ठल चौरे, मल्हारी कांडेकर, रामदास फुले, बाबासाहेब होळकर आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

सुशिला मोडक म्हणाल्या की, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून सामाजिक जबाबदारी पेळविणार्‍या महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे. प्रेमाचा दिवस सामाजिक संस्थेबरोबर साजरा करणे हा आगळा-वेगळा उपक्रम प्रेरणादायी आहे. अनेक महिलांनी क्रांती घडविल्याचा इतिहास असून, महिला सामाजिक कार्यात सक्रीय झाल्यास परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. सिमरन वधवा यांनी महिलांसाठी मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेतल्या. विजेत्या महिलांना ग्रुपच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार्‍या महिलांनी एकत्र येत धमाल केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जनतेने शेतकरी आंदोलनात देशातील सैनिकांप्रमाणेच सक्रीय होऊन 'जय जवान, जय किसान' ही घोषणा प्रत्यक्षात आणावी !

वीरसैनिक धोंडीराम कर्पे  : 'पुलवामा हल्ला शहीद जवान व दिल्ली आंदोलन शहीद किसान' स्मतीनिमित्त 'कँडल मार्च'चे आयोजन!

वेब टीम नगर : आम्ही सैनिक देशासाठी लढायचे काम करतो आम्हाला भाषण देता येत नाही. पण आम्ही इकडे आल्यावर घरची शेती करतो, ती उत्तम येते. शेतकरी आणि सैनिक या दोघांच्याही हातात देशाचे भले करण्याचे काम आहे. म्हणूनच आपले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' ही घोषणा दिली होती. आम्ही १९६५ आणि १९७१ च्या युध्दात भाग घेतला त्यामुळे देशप्रेम हे आम्हाला कुणी शिकवू नये. घरी आल्यावर शेती करून देशातील माणसांना अन्नधान्य उपलब्ध करून देतो. हेच सर्वात मोठे देशप्रेमाचे काम आहे. सध्या शेतकरी संकटात आहे त्याला देशातील जनतेने सैनिकाप्रमाणे सक्रिय साथ देऊन 'जय जवान, जय किसान' ही घोषणा प्रत्यक्षात आणावी. असे आवाहन बांग्लादेश मुक्ती संग्रामातील वीरसैनिक धोंडीराम कर्पे यांनी केले. नुकतीच त्यांच्या सावेडी येथील निवासस्थानी '१९७१ च्या युध्दाच्या ५० वर्षानिमित्त सुवर्ण ज्योत मशाल' देशाच्या सैन्यदलाच्या वतीने सैनिक व अधिका-यांसह येऊन गौरव केला होता.

येथील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे 'पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान आणि दिल्ली शेतकरी आंदोलनातील शहीद किसान' यांना अभिवादन कार्यक्रमात त्यांनी वरील उद्गार काढले.

सुरूवातीला सर्वांनी सिध्दार्थनगर येथील कॉम्रेड अण्णा भाऊ साठे स्मारक येथे अभिवादन केले. पुतळ्यास समृध्दी वाकळे, अक्षता वडवणीकर, शिवानी कर्पे, हर्षदिप मेढे, अनुराधा कर्पे, मयुरी कांबळे या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे स्मारक ते हुतात्मा चौथे शिवाजी महाराज स्मारक असे 'कँडल मार्च'चे आयोजन करण्यात आले होते.

वीरसैनिक कर्पे यांनी प्रत्यक्षात १९७१ च्या युध्दात सहभाग घेतलेला असल्याने त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी अहमदनगरकर उपस्थित होते.

हुतात्मा चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधीस कर्पे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस त्यांचा रहेमत सुलतान फौंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर यांच्या हस्ते फेटा बांधुन आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा जमलेल्या अहमदनगरकरांनी 'जय जवान, जय किसान' 'इन्कलाब जिंदाबाद' या घोषणा दिल्या.

भ्रष्टाचार निर्मुलनचे अशोक सब्बन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हे आंदोलन शेतकऱ्यांच्या बांधावर नेले पाहिजे आणि हे कायदे शेतकरी हिताचे नसून अदानी अंबानी यांच्या हिताचे आहेत हे जनतेच्या निदर्शनास वेळीच आणून दिले पाहिजे. येणारा हा धोका फक्त शेतक-यांसच नाही तर उद्या सर्व जनता यामधे भरडली जाणार आहे.

विडीकामगार संघटनेचे खजिनदार कॉ.अंबादास दौंड म्हणाले करार शेतीमुळे शेतकरी जमिनीवरून हुसकावला जाणार आहे. नवे कृषी कायदे म्हणजे किमान हमी भाव मोडीत काढून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना युनुसभाई तांबटकर म्हणाले या सरकारने सारासार विचार न करता निर्णय घेण्याची परंपरा नव्या कृषी कायद्यातही पाळली आहे. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांसोबतच सामान्य जनतेने संघर्ष केला पाहिजे.

सुत्रसंचालन कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद यांनी केले. त्यांनी २६ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या शेतकरी संघर्षाची माहिती सांगितली. तसेच आगामी आंदोलनाची माहिती दिली.

कॉ.भैरवनाथ वाकळे यांनी आजच्या देशव्यापी कार्यक्रमाचा परिचय करून दिला.

या कार्यक्रमास एम. एस.एम.आर.ए. युनियन चे कॉ.राजू कांबळे, महापालिका कामगार युनियन चे कॉ. अनंत लोखंडे, पीस फौंडेशनचे आर्किटेक्ट अर्शद शेख, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष असिफखान दुलेखान, रोहित वाळके, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे शहराध्यक्ष फिरोज चांद शेख, मराठा सेवा संघाचे अमोल लहारे, स्मायलिंग अस्मिता शेतकरी विद्यार्थी संघटनेचे यशवंत तोडमल, कामगार संघटना महासंघाचे योगेश महाजन, रावसाहेब कर्पे, किशोर खाडे, वैभव कदम, प्रशांत चांदगुडे, विद्यार्थी हर्षदीप मेढे, मयुरी कांबळे, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या समृद्धी वाकळे, अनुराधा कर्पे, अक्षता वडवणीकर, अभिषेक कर्पे, शिवानी कर्पे, अमित जरे, आदित्य कर्पे, सतीश दारकुंडे, केशव हराळ, आयु. एल.बी.जाधव, ऍड. कारभारी गवळी, गोपाळ ढोकणे मामा आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

येणारा काळ सर्वांसाठी सुख, समृद्धी व आरोग्यदायी जावो : किशोर डागवाले

    वेब टीम  नगर : कोरोनामुळे गेल्या १० महिन्यांपासून सर्व सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव साजरे केले जात नव्हते. मात्र श्री गणेशाच्या आशिर्वादाने सर्वकाही सुरळीत झाले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. येणारा काळही सर्वांसाठी सुख,समृद्धी व आरोग्यदायी जाण्याचे साकडे श्री गणेशाच्या चरणी घालत आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी केले.

     शिववरद प्रतिष्ठानच्यावतीने श्री गणेश जयंतीनिमित्त पटवर्धन चौकातील शिववरद गणपती मंदिरात विधीवत महाअभिषेक, आरती करुन भाविकांना प्रसादाचे वाटप प्रसंगी किशोर डागवाले बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन डागवाले, अ‍ॅड.सुनिल सूर्यवंशी, अनिल शिंदे, सुभाष दारवेकर, शहाजी डफळ, बाबा वैद्य, राऊफ खान, सय्यद हुसेन, आशिष रासने, योगेश गणगले, बाळासाहेब डागवाले, अ‍ॅड.मंदार पळसकर, बाळासाहेब लोढा, रोहन डागवाले, विकास आव्हाड, संदिप नामदास, सुरम थापा, सागर गोरे, सचिन सप्रे, पिंटू डागवाले, तपन घारु, दिपक पिलगर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

     मंडळाचे कार्यकर्ते राकेश मिसाळ व नंदीनी मिसाळ यांच्या हस्ते शिववरद गणेशास अभिषेक करण्यात आला. पोपट देवा कुलकर्णी व भोपे गुरुजी यांनी पुजेचे पौरोहित्य केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गणेश जयंतीनिमित्त श्री एकदंत गणेश मंडळाच्या 112 युवकांचे रक्तदान

    वेब टीम  नगर : सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोज करण्यात आले. या शिबीराचे  उद्घाटन टेक्स्टाईल आर्टिस्ट अमरजीत दिकोंडा व स्वाती दिकोंडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदऋषीजी ब्लड बँकेचे विश्वस्त गणेश कांकरिया, अशोक कोठारी, डॉ.सुनिल महानोर, अ.भा.राष्ट्र सेवा दलाचे विश्‍वस्त शिवाजी नाईकवाडी आदी उपस्थित होते.  यंदा रक्तदान शिबीरात श्री एकदंत गणेश मंडळाच्या ११२ युवकांनी उत्सर्फुतपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबीरात दातरंगे मळा परिसरातील नागरीकांसह नगर शहर परिसरातील युवकांनी सहभाग घेतला.         

     यावेळी टेक्स्टाईल आर्टिस्ट अमरजीत दिकोंडा म्हणाले कि, एकदंत कॉलनीतील बहुसंख्य समाज हा पद्मशाली समाज असून हा समाज अतिशय प्रामाणिक, कष्टकरी, होतकरु व मेहनती आहे. अतिशय गरिबीतून काम, शिक्षण पूर्ण करुन आज या समाजाची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात ही कार्यरत आहे. आज गणेश जयंती निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक काम मंडळाच्या वतीने राबवून समाजासाठी आदर्शवत काम करत आहेत. कोरोना या महामारीच्या संकटामुळे आज रक्ताचा तुटवडा पडला आहे, मंडळाच्यावतीने आज हे शिबीर घेवून चांगली सेवा घडवून आणली असून त्या माध्यमातून कित्येक जणांचे प्राण वाचविण्याचे काम मंंडळाकडून होत आहे, हि कौतुकास्पद बाब आहे,असे त्यांनी सांगितले.

     यावेळी डॉ.सुनिल महानोर म्हणाले कि, १७ वर्षापासून मंडळाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन आज श्री एकदंत गणेश मंडळाने नगर शहरात नाव कमावले आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. रक्त कुठे ही तयार होत नाही, माणसालाच रक्तदान करावे लागते. त्यामुळे आपल्याकडून होईल तितक्या प्रमाणात रक्तदान शिबीर भरवावे, जेणे करुन येणार्‍या संकटाला सामोरे जाताना रक्तदानाची अडचण निर्णाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

      रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपण कोणाला तरी जीवनदान देतो, याचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकांने वर्षातुन एकदा करावे. रक्त हे कोणत्या फॅक्ट्रीत तयार होत नाही. गरज भासल्यास कोणी तरी रक्तदान करावेच लागते, या उद्देशानेच मंडळाच्यावतीने गेल्या १७ वर्षापासून रक्तदान शिबीर भरविण्यात येत आहे, असे मंडळाच्यावतीने यावेळी सांगण्यात आले. 

     धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मंडळाने सामाजिक कार्यक्रमही घेतले आहेत. यावेळी १५० महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.  या शिबीरासाठी आनंदऋषीजी ब्लड बँकेचे संदिप भोसले, पुनम दस्तुरकर, सुरेखा पालवे, निशांत शेख यांचे सहकार्य लाभले.   

     या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी एकदंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व एकदंत महिला मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा कोडम यांनी केले. तर आभार अमोल गाजेंगी यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चांगली तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेवरील विश्‍वास वाढत आहे

 अनिलराव झोडगे : भिंगार बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात 

    वेब टीम  नगर : भिंगार बँकेला 100 वर्षांहून अधिक अशी परंपरा आहे, यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. यात स्व.गोपाळराव झोडगे यांनी बँकेची धुरा अनेक वर्ष सांभाळून बँकेला प्रतिष्ठा मिळवून दिली. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा विश्‍वास आणि संचालक मंडळाचे सहकार्य यामुळे आज बँक प्रगतीपथावर आहे. बँकेने काळानुरुप बदलून अत्याधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्याने बँकेच्या सेवेत भर पडत आहे. त्यामुळे ग्राहकांनाही चांगली तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेवरील विश्‍वास वाढत आहे. बँकिक क्षेत्रातील प्रचंड स्पर्धा सातत्याने घडणारे बदल आणि सभासद खातेदारांच्या वाढत्या अपेक्षा या पार्श्‍वभुमीवर बँकेने अहवाल वर्षात भरीव नेत्रदिपक प्रगती साध्य केली असल्याचे प्रतिपादन भिंगार अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष  अनिलराव झोडगे यांनी केले.

     भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष  अनिलराव झोडगे बोलत होते. याप्रसंगी  उपाध्यक्ष  किसनराव चौधरी, संचालक रमेश परभाने, नाथाजी राऊत, राजेंद्र पतके, कैलास खरपुडे, संदेश झोडगे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, नामदेव लंगोटे, कांताबाई फुलसौंदर, तिलोत्तमा करांडे, तज्ञ संचालक आर.डी.मंत्री, राजेंद्र बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग हजारे आदि उपस्थित होते.

     यावेळी उपाध्यक्ष  किसनराव चौधरी म्हणाले, मध्यंतरी कोरोनाच्या काळात बँकेचे कामकाज विस्कळीत झाले होते.  बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना चांगली सेवा देण्याचा बँकेने सातत्याने प्रयत्न केला आहे. सर्वांच्या सहकार्याने बँकेने आपल्या कामात सातत्य ठेवून लौकिक कायम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी आर.डी.मंत्री म्हणाले, बँकींग क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. आधुनिक सेवा देणार्‍या बँकांना ग्राहकांची पसंत राहत असते. त्यादृष्टीने भिंगार बँकेनेही अत्याधुनिक सुविधा स्वीकारुन सेवा देत आहे. त्यामुळे बँकेच्या प्रगतीत भर पडत आहे.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथाजी राऊत यांनी केले तर आभार पांडूरंग हजारे यांनी मांडले. प्रारंभी बँकेचे अनेक वर्षे चेअरमन राहिलेले स्व.गोपाळराव झोडगे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या गुणवंत व मान्यवरांचा बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आले. यावेळी सहकार विभागाच्यावतीने संचालक व सभासदांसाठीचे प्रशिक्षणही पार पाडले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्री विशाल गणेश मंदिरात गणेशजन्मोत्सव मोठ्या उत्साहात 

    वेब टीम  नगर :  श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे विविध धार्मिक कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी श्री गणेश जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम व सोनाली कदम यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी उद्योजक दिनेश आगरवाल, पराग नवलकर, पुजारी संगमनाथ महाराज, मयुर महाराज, आदिंसह विश्‍वस्त उपस्थित होते.

     जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी अथर्वशिष्य, मंत्रोच्चरात पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.  यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थानाच्यावतीने भाविकांची दर्शनाची मंडप व्यवस्था करण्यात आली होती.

     याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, हरिश्‍चंद्र गिरमे आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या खजिनदारपदी डॉ.प्रीती भोंबे

वेब टीम नगर : भारतीय कम्युनिटी रेडिओ असोसिएशन संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रेडिओ नगर ९०. ४ एफ एम्  केंद्राच्या संचालिका  डॉ.प्रीती भोंबे यांची खजिनदारपदी निवड झाली. हैदराबाद संघटनेची  वार्षिक सभा झाली .त्यात  पुढील २वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी डॉ. भोंबे यांच्यासह निवडण्यात आली. देशातील  कम्युनिटी रेडिओ केंद्र चालवत असलेल्या १४४ स्वयंसेवी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, विद्यापीठे यांचे प्रतिनिधी,  कार्यकारिणीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.  २०२१ ते२३, या २वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

स्नेहालय संस्थेच्या रेडिओ नगर केंद्राच्या डॉ. भोंबे बिनविरोध निवडून आल्या.  मागील १० वर्षापासून स्नेहालय संचलित रेडिओ नगर ९०. ४ चे व्यवस्थापन पाहत आहेत.  स्नेहालयच्या निधी संकलन आणि प्रतिसाद  विभागाची धूरा त्या सांभाळतात. समाजविकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे देशातील  कम्युनिटी रेडिओ केंद्र, हे आर्थिक स्वयंपूर्ण करण्याचा  संकल्प डॉ. भोंबे यांनी व्यक्त केला. कम्युनिटी रेडिओ असोसिएशन मध्ये जास्तीत जास्त सदस्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

कम्युनिटी रेडिओ चालवत असलेल्या संस्थांना येणाऱ्या अडचणीं शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न नवीन कार्यकारिणी करणार असल्याचे असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष  ब्रजेन्‍द्र पंवर ( हिमाचल प्रदेश) आणि जनरल सेक्रेटरी जयेश जोशी,(उदयपूर ,राजस्थान) यांनी सांगितले आहे. भारतातील कम्युनिटी रेडिओ असोसिएशनचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल येथील कम्युनिटी रेडिओ केंद्राचे संस्थापक भूषण देशमुख, स्नेहालयचे संजय गुगळे,राजीव गुजर,अरुण शेठ, मार्गदर्शक देवाशीश शेडगे, आदींनी डॉ. भोंबे यांचा सन्मान केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments