नगरटुडे बुलेटीन 14-02-2021

 नगरटुडे  बुलेटीन 14-02-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारुन जनतेचे अश्रू पुसण्याची गरज

अ‍ॅड. गवळी : शिवजयंती दिनी अलेक्झांडर सवाई शिवाजी सत्यबोधी सुर्यनाम्याचे आयोजन

वेब टीम नगर : रयतेचे आश्रू पुसणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतुलनीय कार्य व विचारांपासून राजकीय मंडळी व लोकप्रतिनिधींना प्रेरणा देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी रोजी अलेक्झांडर सवाई शिवाजी सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

जग जिंकण्याची आशा बाळगलेला व निम्म्यापेक्षा जग काबिज करणारा अलेक्झांडरपेक्षा शिवाजी महाराज त्यांच्या गुणांमुळे सर्वांना श्रेष्ठ वाटतात. दोन्ही मध्ये तुफानी ऊर्जा ही साम्य गोष्ट होती. मात्र शिवाजी महाराजांमध्ये उन्नतचेतना व लोकभज्ञाक गुण असल्याने ते सर्वसामान्यांना श्रेष्ठ वाटतात. अलेक्झांडरने फक्त राज्य काबीज करण्याच्या हेतूने सत्ता उपभोगली. मात्र शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करुन त्यांचे आश्रू पुसण्याचे कार्य केले. हे गुण आजच्या नेते मंडळी व लोकप्रतिनिधींना दिशादर्शक आहे. अनेक पुढारी व मंत्री भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमवतात व पैश्याच्या जोरावर मत खरेदी करुन पुन्हा निवडून येतात. अशा लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या हिताची अपेक्षा करणे देखील चूकीचे आहे. ते फक्त संपत्ती कमविण्यात गुंतले असून, शिवाजी महाराजांच्या विचारापासून ते लांब आहेत. आजच्या नेते मंडळी, मंत्री व राज्यकार्त्यांनी शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारुन जनतेचे आश्रू पुसण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रात भाजप सरकाचे बहुमत असून देखील त्यांना शेतकरी, घरकुल वंचित व युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न सोडविता आलेला नाही. मंत्री महोदय नगरमध्ये येऊन चित्रपट सृष्टी निर्माण करण्याचे वक्तव्य करतात. मात्र येथील बेघर नागरिकांना हक्काचा निवारा नाही, चांगले रस्ते नाही, अनेक भागात पिण्यासाठी पाणी नाही या सामाजिक विषयावर बोलण्यास कुणी तयार नाही. ज्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍न सोडविण्याची तळमळ व आस्था नसेल अशा राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांचा नांव घेण्याचा देखील अधिकार नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. अलेक्झांडर सवाई शिवाजी सत्यबोधी सुर्यनामा करण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, अर्शद शेख, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, बाबा आरगडे आदी प्रयत्नशील आहेत. 

----------------------------------------------------------------------------------

अहमदनगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

 १६ पदाधिकार्‍यांचा समावेश : १४ क्रीडा प्रकारांसह युवती खेळाडूंना देखील कार्यकारणीत स्थान

वेब टीम नगर : अहमदनगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसची शहर जिल्हा कार्यकारणी राष्ट्रीय खेळाडू तथा क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या मान्यतेने जाहीर केली आहे.कार्यकारणी मध्ये १ - समन्वयक, २ - उपाध्यक्ष, ३ - सरचिटणीस, २ - सचिव, ३ - सहसचिव, १ - खजिनदार, १ संघटक, २ - कार्यकारणी सदस्य तसेच अध्यक्षांसह १६ पदाधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकारणीमध्ये नगर मध्य शहर, सावेडी विभाग, केडगाव विभाग अशा सर्व विभागांना सामावून घेण्यात आले आहे. 

कार्यकारणी करताना फुटबॉल, तायक्वांदो, धनुर्विद्या, स्केटिंग, बॉक्सिंग, योगा, मल्लखांब, कराटे, खो-खो, सायकलिंग, बास्केटबॉल, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, हॉकी अशा विविध १४ खेळांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे. 

राष्ट्रीय स्तरावरती खेळणारे खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांचा देखील कार्यकारणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कार्यकारणीमध्ये १ युवती खेळाडू तसेच १ महिला क्रीडा प्रशिक्षकांना देखील स्थान देण्यात आले आहे. 

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : शहर जिल्हाध्यक्ष - प्रवीण गीते पाटील (कराटे, अथलेटिक्स, बॅडमिंटन), समन्वयक - अभिजीत आनंदा दळवी (धनुर्विद्या), उपाध्यक्ष - प्रदीप पाटोळे (स्केटिंग, बॉक्सिंग), उमेश झोटींग (योगा, मल्लखांब), सरचिटणीस - प्राजक्ता जयवंत नलावडे (सायकलिंग, योगा), हर्षल राजेंद्र शेलोत (बास्केटबॉल), सचिव - मच्छिंद्रनाथ बबन साळुंखे (तायक्वांदो,बॉक्सिंग), शुभांगी सुधाकर रोकडे-दळवी (धनुर्विद्या).

सहसचिव - आदिल सय्यद (कराटे), मुकुंद भगीरथ नेवसे (खो-खो), महेश भाऊसाहेब निकम (स्केटिंग), संघटक - प्रसाद भाऊसाहेब पाटोळे (फुटबॉल), खजिनदार - नारायण संपत कराळे (तायक्वांदो), कार्यकारिणी सदस्य - सुर्यकांत रामू वंगारी (बास्केटबॉल), गणेश तुळशीराम धोटे (बास्केटबॉल,फुटबॉल, हॉकी). 

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी उपनगराध्यक्ष 

 दीप चव्हाण, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष अज्जूभाई शेख, मागासवर्गीय काँग्रेसचे अध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनीफभाई शेख, नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष इंजि. चिरंजीव गाढवे, सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष सौरभ रणदिवे आदींनी अभिनंदन केले आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नरेंद्र फिरोदिया यांना मिळालेल्या पुरस्काराने पूर्ण नगरचा सन्मान 

ब्रिजलाल सारडा : हिंदसेवा मंडळाच्या वतीने सत्कार

वेब टीम नगर : कर्मण्येवाधिकारस्ते या भगवद् गीतेत दिलेल्या संदेशाप्रमाणे कार्य करणाऱ्या नगर मधील फिरोदिया कुटुंब पिढ्यानपिढ्या निस्वार्थपणे सामाजिक काम करत आहे. नरेंद्र फिरोदिया हा वारसा जोपासत योगदान देत आहे. त्यामुळेच टाईम्स सारख्या मोठ्या ग्रुपने नरेंद्र फिरोदिया यांच्या अष्टपैलू कार्याची दखल घेत त्यांना दिलेला टाईम्स मॅन ऑफ द इयर या मानाच्या पुरस्कार देवून केलेला सन्मान हा पूर्ण नगरचा सन्मान आहे, असे गौरोद्गार हिंदसेवा मंडळाचे माजी कर्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी केले.

          सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले नरेंद्र फिरोदिया यांना टाईम्स मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हिंदसेवा मंडळाच्या वतीने पेमराज सारडा महाविद्यालयात विशेष सत्कार सोहळ्यात माजी कर्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विधीज्ञ अशोक कोठारी होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्यध्यक्ष अजित बोरा, कार्याक्रमचे संयोजक सुमतिलाल कोठारी, डॉ.पारस कोठारी, जगदीश झालानी, मधुसूदन सारडा, अशोक उपाध्ये, शामसुंदर सारडा, प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, उपप्राचार्या डॉ.मंगला भोसले आदींसह नगरमधील हिंदसेवा मंडळाच्या सर्व शाळांमधील शिक्षकवृंद उपस्थित होते.

          यावेळी ॲड. अशोक कोठारी म्हणाले, नगरच्या इतिहासात फिरोदिया कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. पद, पदक व पुरस्कार हे कायम चांगल्या कामा मागे पळत असतात. नरेंद्र फिरोदिया यांच्या सारख्या प्रेमळ, दानशूर व हसतमुख चतुरस्त्र व्यक्तिमत्व आजपर्यंत मी पाहिले नाहीये. या सत्कार समारंभां निमित्त त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्याची संधी माल हिंदसेवा मंडळाने दिल्याबद्दल धन्यवाद.

          प्रा. शिरीष मोडक म्हणाले, नरेंद्र फिरोदिया यांच्या सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व माझे माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. हिंदसेवा मंडळाच्या शाळांना, जिल्हा वाचनालयाला त्यांनी कायम मदत केली आहे.

          संजय जोशी म्हणाले, सामाजिक कामात सतत व्यस्त असलेल्या नरेंद्र फिरोदिया यांच्या कडून कोणीही कधीही विन्मुख  जात नाही. त्यामुळे ते आधुनिक काळातील कर्ण आहेत.

          सत्कारास उत्तर देतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले, टाईम्स सारख्या ग्रुपने दिलेला पुरस्कार हा जवाबदारी वाढवणारा आहे. त्यामुळे अधिक जास्त व चांगले काम करावे लागणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल मी सत्कार स्वीकारणार नव्हतो, मात्र हिंदसेवा मंडळासारख्या मोठ्या जुन्या संस्थेस नाही म्हणता आले नाही. करोना नंतर आता डिजिटल शिक्षण सुरु झाले आहे. हिंदसेवा मंडळासारख्या चांगल्या संस्थेमधून सर्वात स्वस्त व दर्जेदार शिक्षण दिले जाता आहे. या डिजिटल माध्यमातून जरपूर्ण जगात कोठेही शिक्षण देण्याचा विचार केल्यास हिंदसेवा मंडळ ही वल्डक्लास एज्युकेशन देणारी संस्था होईल. अशा चांगल्या संस्थेस कायम सहकार्य करू.

          यावेळी अजित बोरा, डॉ.पारस कोठारी यांनीही आपल्या भाषणातून नरेंद्र फिरोदिया यांच्या कार्याचे कौतुक केले. सुमतीलाल कोठारी यांनी प्रास्ताविक नरेंद्र फिरोदिया यांनी संस्थेस केलेल्या मदतीची माहिती दिली.  आभार मधुसूदन सारडा यांनी मानले. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी सहाय्यक सचिव बी.यु.कुलकर्णी, विठ्ठल उरमुडे, सचिन मुळे, पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य डॉ.देशपांडे, पर्यावेक्षक डॉ.सुजय कुमावत आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

धार्मिककार्यात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन म्हणजे खरी गणेश जयंती 

 श्रीकांत बेडेकर : गणेश जयंतीनिमित्त एकदंत गणेश मंदिराच्या विविध धार्मिक, सामाजिक, कार्यक्रमांचा शुभारंभ

    वेब टीम  नगर :  गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंडळाच्यावतीने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करुन त्या माध्यमातून गरजू लोकांच्या गरजा पुर्ण होण्यास मदत होत आहे. विविध आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरे, सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर असे कार्यक्रमांमुळे आज एकदंत गणेश मंडळाचा या नगर शहरात १७ वर्षापासून चांगले नाव आहे. आजच्या धकाधकीच्या युगात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन त्या उत्सवामध्ये सामाजिक उपक्रमांची जोड देत उत्सव साजरा करणे म्हणजे एक कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन श्रीकांत बेडेकर यांनी केले.

     गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंदिराच्या विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ करताना बेडेकर क्लासचे संस्थापक श्रीकांत बेडेकर,राम एजन्सीचे मालक मोनिष मेघानी, महावीर वूलन हाऊस चे मालक ओमप्रकाश बायड, पुष्पा बायड, राष्ट्रीय खेळाडू पै.शुभम दातरंगे आदी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना मोनिष मेघानी म्हणाले कि, एकदंत गणेश मंडळाच्या वतीने  गणेश जयंती उत्सव म्हणजे आता या नगर शहराची एक ओळख बनली आहे. या उत्सवाच्या माध्यमातुन गरजू लोकांना मोठा लाभ होत आहे. धार्मिक उत्सव म्हंटल कि धार्मिक विधी, विविध पुजा-आर्चा, भजन, किर्तन या पलीकडे जाऊन मंडळाने या कार्यक्रमांना आरोग्य शिबीरांची जोड देऊ केल्यामुळे आज अनेकांना याचा लाभ होत आहे.

     प्रास्तविकात  सुरेखा कोडम म्हणाल्या कि, एकदंत गणेश मंडळाच्यावतीने धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. यामध्ये गरजू रुग्णांसाठी मोफत औषध व उपचार शिबीर, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, नेत्र तपासणी शिबीर आणि सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांना व मुलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा मंडळाचा उद्देश आहे. याच सोहळ्यामध्ये आजच्या महागाईच्या काळात लग्न करणे म्हणजे खुप कठीण आहे. त्यामुळे मंडळाच्यावतीने गेल्या १२ वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये आतापर्यंत २९सामुदायिक विवाह झाले आहेत. यावर्षी एक विवाह आहे, असे त्यांनी सांगितले.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश गुडा यांनी केले. तर आभार सौ.विनोदा बेत्ती यांनी मानले. यावेळी नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकंदत गणेश मंडळ व एकदंत परिवार, महिला मंडळ परिश्रम घेत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुणवत्ता सिद्ध केल्यास उज्वल भविष्य निर्माण करु शकता

 शांतराम डोंगरे : प्रगत विद्यालयात कथा वाचन संपन्न

   वेब टीम  नगर : विद्यार्थ्यांनी आपल्या गरीबीचा, दारिद्र्याचा विचार न करता प्रामाणिकपणे अभ्यास करुन आपली गुणवत्ता सिद्ध केल्यास उज्वल भविष्य निर्माण करुन आपला व कुटुंबाचा उत्कर्ष करु शकता.आपल्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपणास हे यश निश्‍चित मिळू शकते. म्हणून शिक्षकांनी अभ्यासाचा कानमंत्र कायम स्मरणात ठेऊन मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन शांताराम डोंगरे यांनी केले.

     नगर येथील प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर संस्थेचे कार्याध्यक्ष शांताराम डोंगरे यांनी ‘शिल्पा कलेक्टर झाली’ या विषयावर साभिनय अत्यंत सुंदर कथा सांगितली. या कथेतून सरांनी विद्यार्थ्यांना भावनाविवश करुन, विद्यार्थ्यांचे डोळ्यात अश्रू आणले. याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुनिल पंडित, याप्रसंगी हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर आदि उपस्थित होते.

        यावेळी प्राचार्य सुनिल पंडित म्हणाले, कथाकथन हे नेमका आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. पुर्वी भारुडा मार्फत कथा सांगितली जात असे.आता मात्र ती कला लोप पावत चालली आहे.प्रत्येक विद्यालयात कथाकथन स्पर्धा व्हाव्यात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्वाचा विकास होऊन, कथाकथन ही कला सर्वांपर्यंत पोहोचविणे शक्य होऊ शकेल.

     याप्रसंगी हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी डोंगरे यांचे कौतुक करून अशा प्रकारचे कथाकथन हे शहरी व ग्रामीण भागातील मुलांना निश्‍चित उपयोगी पडेल व त्यांना कथाकथन कसे करतात याचे ज्ञान प्राप्त होईल असे सांगितले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक  दिलीप रोकडे यांनी केले  केले तर सुनील गाडगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ भिंगारला मिळावा

अ‍ॅड.आर.आर.पिल्ले : नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

   वेब टीम नगर :  भिंगार कॅन्टोमेंट बोर्डच्या कार्यक्षेत्रात अद्यापही राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसून, भिंगारकर नागरिक घरकुल, झोपडपट्टी पुर्णवसन, आरोग्य सुशिक्षित बेकार-बेरोजगारांना अर्थसहाय्य आदि योजनांपासून वंचित आहे. राज्य शासनाच्या या विविध योजनेचा लाभ भिंगारकरांना लागू करावा, असे निवेदन राज्याचे नगर विकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने देण्यात आले आहे. कॅन्टों.बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व भिंगार कॉ.अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर यांनी ना.शिंदे यांना निवेदन देतांना कॅन्टोंमेंटला महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा लभ मिळवेत याबाबत आग्रह धरला.

     स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गतवर्षापर्यंत देशातील ६२ कॅन्टों.बोर्ड कार्यक्षेत्राला केंद्र व राज्य सरकारच्या योजना लागू नव्हत्या, मात्र गतवर्षी २६ ऑगस्ट २०२० रोजी संरक्षण मंत्री ना. राजनाथसिंह यांनी देशातील सर्वच्या सर्व ६२ कॅन्टों.ला केंद्र सरकारच्या योजनाचे लाभ मिळवून देण्याची घोषणा केली. केंद्राप्रमाणे राज्य शासनाच्या योजनांचे लाभ मिळावेत. प्रत्येक नागरिकांसाठी योजना असून, प्रत्यक्षात कॅन्टोंमेंट बोर्ड कार्य क्षेत्रातील नागरिक मात्र योजनेपासून दूर आहेत. त्यांना योजनेचा लाभ देऊन मुख्य प्रवाहात आणणे आणि येथील नागरिकांचा विकास करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

     सन २००६ मध्ये मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना कॅन्टोंमेंटला केंद्र व राज्य सरकारच्या योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी २६ ऑगस्ट २०२० रोजी सुरु झाली. परंतु महाराष्ट्रातील ७ कॅन्टोमेंटला राज्य शासनाच्या योजना लागू नाहीत. शेजारच्या मध्यप्रदेश सरकारने तेथील कॅन्टोमेंटला योजना लागू केल्या आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने कृती करावी, अशी भिंगारकरांची अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

     अ‍ॅड.पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली ना.शिंदे यांना नगरच्या नियोजन भवनात निवेदन दिले. निवेदनावर शामराव वाघस्कर, अनिल परदेशी, रिजवान शेख, अनिल वर्‍हाडे, संतोष धीवर, निजाम पठाण, संजय झोडगे, अ‍ॅड.साहेबराव चौधरी, रमेश त्रिमुखे, सोपान साळूंके, महिला अध्यक्षा मार्गारेट जाधव, किरणताई आळकुटे, संजय खडके, दिपक लोखंडे, संतोष कोलते, नवनाथ वेताळ, जालिंदर आळकुटे, फिरोज खान, संतोष फुलारी, सुभाष त्रिमुखे आदिंच्या सह्या आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भिंगारच्या समस्यांबाबत शिवसेनेच्या कांता बोठे यांचे ना.शिंदें निवेदन

    वेब टीम  नगर : अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रहिवासींना नागरी सुविधा मिळाव्यात, या मागणीचे निवेदन नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना भिंगार शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.कांता बोठे यांनी दिले. यावेळी संघटक स्मिता अष्टेकर उपस्थित होत्या.

     निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर शहरालगत असलेल्या भिंगारमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड अस्तित्वात असून, या भागातील नागरीक बर्‍याच वर्षांपासून मुलभुत सुविधापासून वंचित आहेत. या भागात होणारा पाण्याची समस्या बिकट असून, होणारा पाणी पुरवठा हा आठ दिवसांनी व अपुरा होत असतो. तसेच या कॅन्टोन्मेंट बोर्ड असल्याने या भागात दुमजली इमारतींना परवानगी नसल्याने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ही मोठी समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

     याबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालून येथील नागरिकांना मुलभुत समस्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांची आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समता परिषदेच्या कार्याचे ना.एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक

    वेब टीम  नगर :  संघटनेच्या माध्यमातून समाजात काम करता असतांना वंचित घटकांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून हेच ध्येय सुरु ठेवून सुरु असलेले काम कौतुकास्पद असेच आहे. शासनाच्यावतीनेही सर्वसामान्यांनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेंचा संबंधितांना लाभ मिळवून देण्यासाठी संस्थांनी काम करावे, असे प्रतिपादन नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी केले.

     नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे नगरमध्ये आले असतां त्यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने  महानगर अध्यक्ष दत्ता जाधव व परेश लोखंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

     याप्रसंगी दत्ता जाधव यांनी समता परिषदेच्यावतीने नगरमध्ये सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती ना. एकनाथ शिंदे यांना दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहरातील विविध कामांची मुंबई दक्षता मंडळामार्फत चौकशी करावी

माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन

    वेब टीम नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुरु असलेल्या भुयारी गटार, अमृत योजना व फेज-२ योजनांच्या कामांची मुंबई येथील दक्षता व गुणनियंत्रक मंडळामार्फत सखोल चौकशी करावी, या बाबतचे निवेदन नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी नियोजन भवन येथे दिले.

     ना.एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपामध्ये गेल्या दहा वर्षांपासून नगर शहरात फेज-२ योजना तसेच भुयारी गटार अमृत योजनांची सुमारे ३५० कोटी रुपयांचे कामे चालू असून, सदर कामे अनेक दिवसांपासून रेंगळालेली आहेत. त्यामुळे शहर खड्डेमय झाले असून, धुळीचे सम्राज्यामुळे श्‍वसनाचे विकार व हाडे खिळखिळे झाले आहेत. ढीम प्रशासनातील अधिकारी व नाकर्ते लोकप्रतिनिधी यांचा कर्मचार्‍यांवर कुठलाही वचक नसल्याने जनतेच्या अब्जावधी रुपयांची उधळपट्टी होत आहे.

     तरी याबाबत मुंबई येथील दक्षता व गुणनियंत्रक मंडळामार्फत या सर्व कामांची चौकशी करुन संबंधित ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. तसेच ही प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावून नगरकरांना या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवसेनेचे गीत डायलर टोन म्हणून टेलिकॉम कंपन्यांना अनिवार्य करण्याची मागणी

 शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लहामगे यांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

वेब टीम नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवसापासून शिवसेनेचे गीत डायलर टोन म्हणून टेलिकॉम कंपन्यांना अनिवार्य करण्याच्या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी दिले. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, युवा सेनेचे विक्रम राठोड, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.

मराठी गायक अवधूत गुप्ते व स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरबद्ध केलेले शिवसेना गीत महाराष्ट्रातील सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डायलर टोन म्हणून अनिवार्य केल्यास शिवसैनिक हे डायलर टोन आपल्या मोबाईलवर लावू शकतात. या गीताच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात स्फुर्ती व अभिमान जागणार आहे. तर शिवसैनिक असल्याची ओळख देखील एकप्रकारे निर्माण होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शिवसैनिकांच्या मागणींचा विचार करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवसापासून शिवसेनेचे गीत डायलर टोन म्हणून टेलिकॉम कंपन्यांना अनिवार्य करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी दिले.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------Post a Comment

0 Comments