नगरटुडे बुलेटिन 11-02-2021

नगरटुडे बुलेटिन 11-02-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सहा. पो.नि. प्रवीण पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करुन कायमचे निलंबन करावे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी : अन्यथा उपोषणाचा इशारा

वेब टीम नगर : खुनाच्या गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबीत झालेले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. प्रवीण पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करुन, गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल व्हावा व त्यांचे कायमचे निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष नईम शेख, शहर उपाध्यक्ष जावेदअली सय्यद, संतोष पाडळे आदी उपस्थित होते.

भिंगार येथे रमेश उर्फ रमाकांत काळे या इसमाचा २०१७ साली खून झाला. या प्रकरणात काळे हे भटक्या विमुक्त समाजातील असल्याने त्यांना न्याय मिळाला नाही. प्रवीण पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी हे प्रकरण आर्थिक आमिषाला बळी पडून दडपण्याचा प्रयत्न केला. सहा. पो.नि. पाटील हे जातीयवादी प्रवृत्तीचे असल्याने ते नेहमीच दीन-दुबळ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

सहा. पो.नि. पाटील यांच्या कार्यकाळात असे अनेक प्रकार घडले असून, त्यांची खातेनिहाय सखोल चौकशी होण्याची गरज आहे. भिंगार कॅम्पला कार्यरत असताना सहा. पो.नि. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती कमवली असून, पाटील व त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, काळे खून प्रकरणात हलगर्जीपणा करुन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल व्हावा व त्यांचे कायमचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चर्मकार समाजाने जनमानसात बंधुभाव जोपासण्याचे कार्य केले

खासदार लोखंडे :  समाजाच्या प्रश्‍नांचे विचारमंथन ,युवकांना विकासात्मक वाटचालीस तज्ञांकडून मार्गदर्शन

वेब टीम नगर : चर्मकार समाजाने विविध उद्योग व्यवसायासह विकास करताना जनमानसात बंधुभाव जोपासण्याचे कार्य केले. समाज संत रविदास महाराजांच्या विचार घेऊन पुढे जात असल्याचे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

चर्मकार विकास संघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर नुकतेच शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे पार पडले. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार लोखंडे बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करुन व संत रविदास महाराज यांच्या आरतीने शिबीराचे उद्घाटन झाले. या शिबीरात राज्यातून पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

खासदार लोखंडे पुढे म्हणाले की, संजय खामकर यांच्या नेतृत्वाखाली चर्मकार विकास संघाने राज्यस्तरीय पदाधिकारी यांचे शिबिर आयोजित करून कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे कार्य केले आहे. विविध विषयांचे तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो व कार्यकर्त्यांमधून नेता घडत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चर्मकार समाजातील बांधवांचे प्रश्‍न शासनस्तरावर सोडविण्यासाठी कटिबध्द असून, मुंबईत चर्मकार समाजाचे वसतीगृह व प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अखिल भारतीय रविदास इय धर्म संघटन भारत तिसरी धर्म स्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवजी महाराज यांनी संत रविदास महाराज यांनी समाजातील विषमता, अंधश्रंध्दा, कर्मकांड दूर करण्यासाठी जनजागृतीचे कार्य केले. त्यांचे विचार व कार्य सर्व समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्याते विठ्ठल बुलबुले यांनी माहितीच्या अधिकारा विषयी उपस्थित युवकांना सविस्तर मार्गदर्शन करून, माहितीचा अधिकार कसा व कधी वापरावा? या विषयी माहिती दिली. कॉ. अनंत लोखंडे यांनी शाहु, फुले, आंबेडकर विचारांनी कार्यकर्त्यांनी अचारसंहिता व अनुशासन पाळून समाज हिताचे कार्य करण्याचे आवाहन केले. कायदेविषयक मार्गदर्शन करताना अ‍ॅड. नारायण गायकवाड यांनी दलित समाजावर होणार्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी तरुण युवकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. तर अनुसूचित जाती अंतर्गत कायदा व संरक्षण हक्क कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अ‍ॅड. विजयकुमार सरोदे यांनी वाहन संरक्षण व अपघात विषयी कायद्याची माहिती दिली.

चर्मकार विकास संघाचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी समाजाने एकत्रीतपणे येऊन विकास, न्यायहक्क व सन्मानासाठी लढण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. तर कोरोना महामारीत समाजातील दानशूर व्यक्तीमत्वामुळे टाळेबंदीत दहा हजारपेक्षा जास्त गरजू कुटुंबांना संघटनेच्या माध्यमातून मदत करुन आधार दिल्याचे सांगितले. मुंबई विभाग प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे यांनी प्रास्ताविकात संघटनेची माहिती दिली. प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी अभिनेते काळुराम ढोबळे, रामदास सोनवणे, कारभारी देव्हारे, हरिभाऊ बावस्कर, दिनेश देवरे, स्वाती सौदागर, प्रतिभा खामकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश माने (मुंबई), अध्यक्ष प्रियांका गजरे (पुणे), कार्याध्यक्ष महेंद्र साळवे, निलेश झरेकर, सयाजी पवार, संतोष कांबळे, अमर झिंजुर्डे, शिवाजी पाचोरे, वैभव खैरे, निलेश आंबेडकर, संजय गुजर, अमोल डोळस, संदीप डोळस, सिमोन जगताप, अ‍ॅड. शेजवळ, निलेश साबळे यांनी शिबीराचे व्यवस्थापन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ खामकर, अशोक बोर्हाडे, संगिता वाकचौरे, वंदना  कांबळे-गोरख वाघमारे, किरण घनदाट, संतोष लोहकरे, विनायक कानडे, संतोष खैरे, वैभव खैरे, आण्णा खैरे, दत्तात्रय खामकर, विशाल पोटे, रंगनाथ कानडे, विवेक झरेकर, अमोल वाघमारे, रविंद्र सातपुते, संजय बनसोड, दत्तात्रय ढवळे,अनुराधा पाचरणे, सचिन उसरे, अशोक वाघमारे, अ‍ॅड. अविनाश शेजवळ आदींनी योगदान दिले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत फिरोदियाच्या विद्यार्थ्यांचे यश

वेब टीम नगर : ऊर्जा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करीत बक्षिसे पटकाविली. ऊर्जा संवर्धन व प्रचाराकरिता शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, प्रश्‍नमंजुषा, घोषवाक्य व चित्रकला आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक संजय पडोळे, पर्यवेक्षक रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य, अभिमन्यू डुबल यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी यांनी बक्षिस पात्र विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शोभा पालवे, अमेय कानडे, योगिनी क्षीरसागर, सतीश गुगळे, प्रमोद रामदिन या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाहतुक कोंडी ,अपघात टाळण्यासाठी निंबळक बायपास चौकात गतीरोधक , सिग्नल बसविण्याची मागणी

अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन करण्याचा निंबळक, इसळक ग्रामस्थांचा इशारा

वेब टीम नगर : बाह्यवळण रस्त्यावरील निंबळक बायपास चौक शिंदे वस्ती येथे वाहतुक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी त्वरीत गतीरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी निंबळक व इसळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधिक्षक अभियंता चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नगर तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, माजी सरपंच विलास लामखडे, सिताराम सकट, समीर पटेल, बाळासाहेब ढवळे, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अशोक पवार, भाऊराव शिंदे, बाबासाहेब पगारे, श्रीकांत शिंदे, राजाराम घोलप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मौजे निंबळक (ता. नगर) बायपास चौक येथे चार रस्ते एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. तर सदरील रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तर काही अपघातामध्ये अनेक ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चौकात वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी गतीरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी निंबळक व इसळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवजयंती दिनी आजीव आंदोलकांचा सुर्यसाक्षी लोकशिव सन्मानाने होणार गौरव

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने : पंतप्रधान मोदी यांच्या त्या वक्तव्याचा निषेध

वेब टीम नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आंदोलनजीवी ही नवी जमात सध्या देशात पैदा झाली असून, त्यांच्यापासून देशाने सावध रहाण्याचे केलेल्या वक्तव्याचा पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी अहमदनगरच्या रेल्वे स्थानक येथे शहरातील आजीव आंदोलकांचा सुर्यसाक्षी लोकशिव सन्मानाने गौरव केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

भाजप सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघाच्या विचाराने चालत आहे. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान नसून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वच देशभक्तांनी व्यवस्थे विरोधात बंड करुन आंदोलकांची भूमिका बजावली. स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेवर आल्यानंतर मोदी प्रणित भाजप सरकार महात्मा गांधीच्या विचारांशी सहमत नसल्याने त्यांना सत्याग्रह, आंदोलन मान्य नाही. महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथूराम गोडसे यांच्या विचाराचे हे सरकार आहे. देशाला स्वातंत्र्य आजीव आंदोलकांच्या सत्याग्रहाने मिळाले आहे. तर स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीत बेलगाम सरकारवर लगाम लावण्यासाठी आंदोलकांचे महत्त्वाचे योगदान ठरत आहे. सरकार हुकुमशाही पध्दतीने वागत असल्याने देशात आंदोलने उभी राहत आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेले वक्तव्य हे आजीव आंदोलकांचा अपमान असून, त्यांची माफी मागण्याचे संघटनांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

देशात आंदोलने बंद केल्यास सर्वसामान्यांना न्याय मिळू शकणार नाही. देशात हुकुमशाही राजवट निर्माण होऊन अनागोंदी माजेल. लोकशाही सत्याग्रह, आंदोलनाने जिवंत आहे. सर्वसामान्य व्यक्ती आपल्या न्याय, हक्कासाठी हे शस्त्र घेऊन लढू शकतात. लोकशाही सदृढतेसाठी आजीव आंदोलक महत्त्वाचे घटक आहे. खुर्ची ताब्यात ठेवण्यासाठी मोदी सरकार निर्माण होणारे जनआंदोलन दडपण्याचे काम करीत आहे. तर न्याय, हक्कासाठी लढणार्‍या आंदोलकांना देशविरोधी कृत्याची उपमा देऊन जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केला आहे.

संघटनेच्या वतीने नगर-पुणे ट्विन सिटी होण्यासाठी चळवळ चालविण्यात येत असून, पुणे-नगर-शिर्डी ही शटल रेल्वेसेवा सुरु होण्यासाठी प्रयत्न चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती दिनी दि.१९ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे होणार्‍या सत्याग्राहात शहराच्या व देशाच्या विकासात आंदोलनाच्या माध्यमातून योगदान देणारे आंदोलक कार्यकर्ते कॉ. बाबा आढाव, हरजितसिंह वधवा, सुहास मुळे, अर्शद शेख यांचा सुर्यसाक्षी लोकशिव सन्मानाने गौरव केला जाणार आहे. यासाठी अ‍ॅड. गवळी, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, महेबुब सय्यद, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, अशोक भोसले, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

13 फेब्रुवारी रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,नेत्र,दंत , आरोग्य तपासणी, औषधे वाटप शिबीर

      वेब टीम  नगर : एकदंत गणेश मंदिराच्यावतीने  शनिवार दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी स. १० ते दु.२ या वेळेत दातरंगे मळा, एकदंत कॉलनी, अ.नगर  येथे मोफत नेत्र,दंत व आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषधे वाटप  शिबीराचे आयोजन करण्यात आले.

      आज संगणक, टीव्ही व प्रदुषणमुळे डोळ्यांवर  व आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. काही शहरी व ग्रामीण भागात डोळ्यांची व आरोग्याची निगा राखण्यामध्ये जनतेचे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यातच मोतीबिंदू सारख्या सुमारे १० ते १२ हजार रुपयांच्या शस्त्रक्रिया सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असतात. म्हणून आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे.

     आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या सहकार्याने हे शिबीर होणार आहे. नेत्रतपासणीपासून ते मोतीबिंदू पर्यंतचे सर्व सोपास्कार मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये रुग्णांचा भोजन, निवास व काळा चष्मा आदि बाबींचा समावेश आहे. शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीरात रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टर्स करणार आहेत. नागरीकांना व रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करुन औषधे वाटप करणार आहेत.  रुग्णांनी  शिधा पत्रिका झेरॉक्स सोबत आणावी, सध्या चालू असलेले औषध व गोळ्याही बरोबर आणाव्यात.

     रुग्णांसाठी नावनोंदणी आवश्यक असून जालिंदर बोरुडे मो.९८८१८१०३३३, भिमराज कोडम मो.७७९८८८३९०७ अमर बुरा मो. ८८८८८४३६९०, श्रीनिवास बुरगुल  मो.९५१८९१३०८०, विकास मारपेल्ली मो.८०८७३२१७०६, स्वप्नील सग्गम मो. ९१५६५६११७२ यांच्याशी संपर्क साधावा. तरी रुग्णांनी या मोफत तपासणी शिबीराचा व शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी  केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काळजी घ्या सोन्यासारखा जीव वाचवा

पो.नि.गायकवाड : सोनसाखळी चोरीच्या पार्श्‍वभूमीवर प्रबोधनात्मक फलकाचे अनावरण

      वेब टीम नगर : अनेक घटनांमधून अनेक ठिकाणी सोनसाखळी चोर्‍यांमधून महिलांना जीव गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले आहे. आपला जीव हा सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, तेव्हा महिलांनी सोने घालून फिरतांना काळजी घ्या व आपला सोन्यासारखा जीव वाचवा, असे आवाहन तोफखाना पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल गायकवाड यांनी केले.

     सावेडी भागातील उपनगरात गेल्या अनेक दिवसांपासून सोन साखळ्यांची धूम स्टाईलने चोर्‍या होत आहेत. अहमदनगर पोलिस दलातर्फे दक्ष नागरिक व सुरक्षित परिसर होण्यासाठी प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले. श्रीराम चौकातील फलकाचे अनावरण श्री.गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महिला व नागरिकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

     याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, पोलिस उपनिरिक्षक समाधान सोळंके, सहाय्यक फौजदार आढाव, योगेश पिंपळे, अमित गाडे, निखिल त्र्यंबके, दत्तात्रय कोकाटे, हरिभाऊ संत, अण्णा आदकोटी, संजय लावंड आदिंसह श्रीराम चौकातील कार्यकर्ते उपस्थित होते.

  गायकवाड पुढे म्हणाले, महिलांनी थोडी सावधानता वाळगून सुरक्षितपणे दागिने सांभाळले तर या घटना घडणार नाहीत. गळ्यातील दागिने स्कार्प, ओढणी, पदराने झाकल्यास चोरट्यांना हिसकविता येणार नाही. सहजपणे ओढता येणार नाही. महिलांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे म्हणजे समोरुन येणार्‍या मोटार सायकलस्वाराच्या हाताच्या अंतरपेक्षा जास्त अंतर ठेवून चालावे. कोणी पत्ता विचाराण्यासाठी थांबल्यास अनोळखी व्यक्तीशी बोलणे टाळावे किंवा सुरक्षित अंतर ठेवून बोलावे, असे सांगितले.

     नगरसेवक त्र्यंबके म्हणाले, आपणच आपली काळजी घ्यावी, रात्रीच्यावेळी महिलांनी निर्जनस्थळी एकटे जाणे टाळावे. गर्दीच्या व मोठ्या रस्त्याचा वापर करावा. कोणी अनोळखी, संशयित तरुण वाहन चालवतांना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या, असे सांगून पोलिसांनी प्रबोधन फलक लावून जनजागृती केली. त्यावरील नंबर नागरिकांनी घेऊन कुठे घटना घडल्यास बघ्याची भुमिका न घेता संपर्क करा, असे केले तर या घटना घडणार नाहीत, असे ते म्हणाले.

     चौका-चौकात लावलेल्या या फलकांचे नागरिक वाचन करीत असून, पोलिसांना सहकार्य करण्याची भुमिका घेतील, असा विश्‍वास पो.उपनिरिक्षक समाधान सोळंके यांनी व्यक्त केले .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनपा उपायुक्तांनी केली माळीवाडा परिसरातील भुयारी गटार योजनेची पाहणी

    वेब टीम नगर : माळीवाडा परिसरातील जुना बाजार, पंचपिर चावडी, लोंढे गल्ली, आशा टॉकिज चौक आदि ठिकाणी भुयारी गटार योजनेंतर्गत सुरु असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांनी मनपा उपायुक्त यांच्याकडे केली होती. याबाबत मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांनी संबंधित भागात फिरुन सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी निदर्शनास आणून दिलेल्या कामाची पाहणी करुन संबंधित ठेकेदारांना काम चांगल्या करण्याबाबत सूचना दिल्या, तसेच संबंधित अधिकार्‍यांना या कामाच्या दर्जाची नियमित पाहणी करुन तसा अहवाल सादर करावा, असे सांगितले.

     याबाबत बाळासाहेब बोराटे यांनी अधिकार्‍यांना निदर्शनास आणून दिले की, ज्यावेळी हे काम सुरु झाले त्यावेळी या भागातील खड्डे खोदल्याने  पिण्याच्या पाईपलाईन फुटल्या होत्या, तसेच वीज वितरणाचे वायरिंगही तुटल्या होत्या, तसेच भुयारी गटारीच्या काम करतांना त्यांची लेव्हल, योग्य आंतरावरील ड्रेनेज आऊटलेट काढण्यात आली नव्हती, याबाबत आपण मनपाच्या संबंधितांकडे तक्रार केली. त्यामुळे आज उपायुक्तांनी पहाणी करुन निकृष्ट कामे निदर्शनास आणून दिले आहेत. अधिकार्‍यांनी संबंधितांना सूचना देऊन दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे हे काम चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आत्मनिर्भर योजनेंतर्गत युवकांना प्रोत्साहन 

 योगेश मैद : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मैद यांच्याकडून आढावा

    वेब टीम नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सर्वसामान्यांसाठी विविध लाभाच्या योजना राबवित आहेत. या योजनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. आत्मनिर्भर योजनेंतर्गत युवकांसाठीही अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांसाठी  स्वनिधी योजनांतर्गत १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ही योजना युवकांपर्यंत पोहचविण्याचे त्यांना आत्मनिर्भर करण्याचे युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे. त्याचबरोबर पक्षाची ध्येय-धोरणे युवकांना समजून सांगून पक्षाशी त्यांना जोडावे. यासाठी राज्यभर अभियान राबविण्यात येत आहे. नगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी योगदान द्यावे. पक्ष त्यांच्या कार्याची दखल घेऊन योग्य संधी देईल, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैद यांनी केले.

     भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैद नगरमध्ये आले असता त्यांचा सत्कार  युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक अंकित संचेती, युवा मोर्चा सरचिटणीस आशिष आनेचा, मल्हार गंधे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी महेश तवले यांनी भाजप युवा मोर्चाचे नगरमध्ये सक्रिय काम असून, युवकांना पक्षामध्ये सामावून घेण्यात येत आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्ते पक्षाची कार्यक्रम सर्वसामान्यापर्यंत पोहचवून केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ पदाधिकारी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताकद देत असून, भविष्यात युवा मोर्चाचे कार्यकर्ते पक्षात मोठे योगदान देतील असे सांगून शहरातील युवा मोर्चाचा आढावा सादर केला.

     याप्रसंगी अंकित संचेती यांनी आत्मनिर्भर योजनांची माहिती देऊन पदाधिकार्‍यांनी प्रत्येक मंडलामध्ये युवकांना पक्षाची जोडण्याचे काम करावे, असे आवाहन केले. यावेळी सत्यजित कदम यांनीही जिल्ह्यातील युवा मोर्चाच्या कार्याची माहिती दिली.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद निंबाळकर यांनी केले तर आभार आशिष आनेचा यांनी मानले. याप्रसंगी युवा मोर्चाचे    उपाध्यक्ष राजेंद्र सातपुते, उमेश भालसिंग, उदय शिंदे, किरण जाधव, राकेश भाकरे, विकास झिंजुर्डे, भिंगार युवा मोर्चा अध्यक्ष महेश कटोरे, आकाश सोनवणे, अ‍ॅड.आशिष पोटे, आनंद निंबाळकर, सिद्धार्थ ठाकूर, यश शर्मा, अजित कोतकर, अंकुश भापकर, रमेश भराडिया, कार्तिक तगारे, वैभव झोटिंग, सिद्धेश नाकाडे, हुजेफा शेख, साहिल शेख आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काँग्रेस बळकटीकरण सप्ताहामुळे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जितावस्था

 किरण काळे :  महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस उत्साहात

वेब टीम नगर : महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरामध्ये पक्षाच्यावतीने काँग्रेस बळकटीकरण सप्ताह राबविण्यात आला. सात दिवस शहराच्या विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष लोकांमध्ये जात हा सप्ताह साजरा केला गेला. यातून शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोठी ऊर्जा मिळाल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

ना. थोरात यांचा वाढदिवस काँग्रेस कमिटीमध्ये विशेष कार्यकर्ता संमेलन आयोजित करून तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना केक भरवत संपन्न झाला. यावेळी काळे बोलत होते. यावेळी माजी महापौर दीप चव्हाण, शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, फारुक शेख यांच्यासह शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, विविध फ्रंटल, विभागांचे प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळे यावेळी म्हणाले की, ना.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षानंतर नगर शहरामध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकत शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन पक्ष बळकटीकरणासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमाला नगरकरांनी गर्दी केली. 

सप्ताह दरम्यान नागरिकांनी अनेक प्रश्न आपल्यासमोर मांडले आहेत. नगरकरांशी काँग्रेस पक्षाचा हा संवाद अधिक वाढविण्यासाठी आगामी काळामध्ये विविध उपक्रम शहरात हाती घेतले जातील. ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या माध्यमातून नगरच्या भरीव विकासासाठी काँग्रेस आक्रमकपणे काम करेल, असे यावेळी काळे म्हणाले. 

यावेळी ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की, पक्षनेतृत्वाने किरण काळे यांच्या रूपाने शहरात काँग्रेसला भक्कम आणि सुसंस्कृत नेतृत्व दिले आहे. माजी मंत्री असिर  यांच्या नंतर नगर शहरामध्ये काँग्रेसला नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. काळे यांच्या विकासाचे व्हिजन असणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा त्यासाठी सक्षम होईल, असा विश्वास गुंदेचा यांनी यावेळी व्यक्त केला. 

संमेलनामध्ये शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद यांनी ना. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा कालावधीमध्ये बाजीप्रभू यांची भूमिका वठवत राज्यात पक्ष वाढीसाठी केलेल्या भरीव कामाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला मनोज गुंदेचा यांनी अनुमोदन दिले. शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड यांनी आ. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला फारुख शेख यांनी अनुमोदन दिले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 कविता चंदन : कोल्हाटी समाजाची  पहिली महिला  उखलगावची सरपंच

 उपसरपंचपदी धनंजय पाटील      

    वेब टीम नगर : श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता दत्तू चंदन व उपसरपंचपदी धनंजय लाकूडझोडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. चंदन या कोल्हाटी समाजाच्या पहिल्या सरपंच ठरल्या आहेत.राज्यात ही घटना प्रथमच घडली असून बदलत्या समाजात आज ज्यांना मतदान माहीत नव्हते ते आज आरक्षणामुळे  सरपंच,सभापती,नगराध्यक्ष, महापौर अशा पदांवर विविध उपेक्षित समाजाला न्याय मिळाला आहे.

 बदलत्या समाजाचे हे प्रतिबिंब असून नवनिर्वाचित सरपंच  चंदन आणि सर्व ग्रा.पं सदस्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ग्रामिण भागाचा विकास  " खेड्याकडे चला ...." या म.गाधींच्या संकल्पनेतून व्हावा..त्यादृष्टीने ग्रामिण संघटन आवश्यक आहे .अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.


Post a Comment

0 Comments