नगरटुडे बुलेटीन 07-02-2021

नगरटुडे बुलेटीन 07-02-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

किसान पुत्र संघर्ष यात्रा अहमदनगर मध्ये दाखल

मुठभर भांडवलदारांच्या हितासाठी सरकार शेतकर्‍यांप्रति असंवेदनशील 

विराज देवांग : अहमदनगरसह महाराष्ट्रातील युवक शेतकर्‍यांच्या आंदोलनाला खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी दिल्लीला धडकणार

वेब टीम नगर : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेली किसान पुत्र संघर्ष यात्रा अहमदनगर मध्ये दाखल झाली. ऑल इंडिया युथ फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात किसान पुत्र संघर्ष यात्रा सुरु असून, या यात्रेचे हुतात्मा स्मारक येथे स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमातून अहमदनगरसह संपुर्ण महाराष्ट्रातील युवक-युवती शेतकर्‍यांच्या आंदोलनाला खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी दिल्लीला धडकणार आहेत.

हुतात्मा स्मारकात चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करुन व त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सभा घेण्यात आली. यावेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष विराज देवांग, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य सचिव संतोष खोडदे, अविनाश दोंदे, फैजान अन्सारी, दीपक शिरसाठ, कार्तिक पासळकर, कॉ.सुभाष लांडे, भैरवनाथ वाकळे, फिरोज शेख, समृध्दी वाकळे, अरुण थिटे, अमोल चेमटे, राजू नन्न्वरे आदींसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

विराज देवांग म्हणाले की, भांडवलदारांचे सरकार सत्तेवर असल्याने शेतकर्‍यांवर अन्याय, अत्याचार सुरु आहे. मुठभर भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेऊन सरकार शेतकर्‍यांप्रति असंवेदनशीलपणे वागत आहे. शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकर्‍यांना देशोधडीस लावण्याचे काम केले जात आहे. राजकीय पक्षांना भांडवलदार पैसा पुरवित आहे. तर आपल्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडत आहे. नैतिकता विकून सरकार आपले धोरण राबवित आहे. भांडवलदारांना मोकळे रान दिले जात असून, सरकार जनहितासाठी नव्हे तर भांडवलदारांच्या हितासाठी चालवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

संतोष खोडदे म्हणाले की, सर्वसामान्य जनता कोरोनाशी लढत असताना केंद्रातील भाजप सरकारने संधीचा फायदा घेत बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधी काळे कायदे असतित्वात आनले. शेतकर्‍यांनी कोणत्याही प्रकारे कायदे पारीत करण्याची मागणी केलेली नव्हती. तरी देखील केवल भांडवलदारांच्या हितासाठी हे कायदे पारीत करण्यात आले. मोदी सरकार व भांडवलदारांची डील सुरु आहे. भारत सरकार नांव शिल्लक राहिले नसून, हुकुमशाही मोदी सरकार नांव प्रचलित होत आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलनात भाडोत्रीचे गुंड घुसवून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारने केला. या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उधवस्त करणार्‍या तीन काळे कायदे रद्दा करण्याच्या जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर टिका केली. महाराष्ट्रातून निघालेल्या किसान पुत्र संघर्ष यात्रा मुंबईत एकवटणार असून, दि.८ फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी दिल्लीला रवाना होत आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सरकारी कर्मचारी चळवळीचे नेते कर्णिक यांना श्रध्दांजली

वेब टीम नगर : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक व सरकारी कर्मचारी चळवळीचे नेते र.ग. कर्णिक यांचे नुकतेच निधन झाले असता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखा व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कर्णिक यांच्या निधनाने लोकप्रिय कामगार नेता व आधारवड हरपला गेला. कामगारांचा आवाज म्हणून त्यांनी कार्य केले व कामगारांचे अनेक प्रश्‍न शासनस्तरावर सोडवले. त्यांच्या निधनाने चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर व सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेचा 

नगर-पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन

आंदोलकांना अटक : हुकुमशाहीने शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या केंद्र सरकारचा निषेध

वेब टीम नगर : दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोधात जोदराद घोषणाबाजी करुन नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे, वीज बिल विधेयक 2020 तसेच कामगार विरोधी संहिता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, आर्किटेक अर्शद शेख, युनूस तांबटकर, कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, अंबादास दौंड, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, किसान सभेचे धोंडीभाऊ सातपुते, सिंधूबाई त्रिमुखे, बाळासाहेब पवार, विष्णू म्हस्के, संध्या मेढे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, अब्दुल गनी शेख, भाऊसाहेब थोटे, रविंद्र फुलसौंदर, कार्तिक पासळकर, दिपक क्षीरसाठ, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, शाहीर कान्हू सुंबे, दिलीप घुले, शकील शेख आदी विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे म्हणाले की, नव्याने पारीत करण्यात आलेले नवीन कृषी कायदे शेतकर्‍यांना देशोधडीस लावणारे आहे. न्याय, हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचे आंदोलनाला बदनाम करुन केंद्र सरकार दडपशाही करत आहे. रस्त्यावर बॅरिकेट, खिळे तर चक्क भिंत बांधून देशातील शेतकर्‍यांना रोखण्यासाठी एखाद्या सिमेसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. हे हुकुमशाहीचे दर्शन सरकारने घडविले आहे. जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी केंद्र सरकार आडमुठेपणाचे धोरण सोडण्यास तयार नाही. हे आंदोलन कोणत्या जाती, धर्म व पंथाचे नसून, देशातील शेतकर्‍यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉ. महेबुब सय्यद यांनी अनेक शेतकर्‍यांचे बलिदान जाऊन देखील सरकारला जाग आली नसून, देशातील शेतकरी पेटून उठला आहे. केंद्र सरकार मात्र शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहत असल्याचे सांगितले. अविनाश घुले यांनी देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शेतकर्‍यांचा हा उद्रेक आहे. हिंसक आंदोलन होण्यामागे केंद्र सरकारची आडमुठेपणाची भूमिका जबाबदार आहे. देशाच्या पोशिंद्यावर अन्यायाचा अतिरेक झाला असून, शेतकरी या अन्याया विरोधात क्रांती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. अर्शद शेख यांनी अन्याय, अत्याचार विरोधात आवाज उठवले तर सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करते. देशद्रोहाची व्याख्या नेमकी तपासून घ्यावी लागणार आहे. या आंदोलनाने देशाचे सार्वभौमत्व धोक्यात असल्याचे चुकीचे सांगितले जात आहे. या आंदोलनाने देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला नसून, केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीने लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार विरोधात घोषणा देत आंदोलकांनी रस्त्यावर येऊन ठिय्या मांडला. रास्तारोको करणार्‍या आंदोलक नेत्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन रस्ता रहदारीस मोकळा करुन दिला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तपोवन रोडच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन

प्रहार संघटना : चांगल्या दर्जाचे रस्त्याचे काम व्हावे अन्यथा पुर्ण रस्ता जेसीबीने खोदण्याचा इशारा

वेब टीम नगर : शहरात मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत तपोवन रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या निकृष्ट कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन सदर रस्त्याचे काम पुन्हा चांगल्या पध्दतीने करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना देण्यात आले. यावेळी इंजि. भाग्येश शिंदे, संतोष पवार, विनोदसिंग परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, पप्पू येवले, गुरुनाथ क्षेत्रे, चंदू टाके, ऋषी ढवण, रोहन ढवण, अभिषेक गवळी, प्रकाश भोडवे, योगेश्‍वर गागरे, सिध्दार्थ सांगळे, अशोक शिंदे, बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

शहरातील तपोवन रोडचे मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत काम सुरू करण्यात आले होते. सदर कामपुर्तीनंतर कंत्राटदार मार्फत पाच वर्ष देखभाल व दुरुस्ती याची हमी होती. परंतु या रस्त्याचे काम होऊन अवघे आठ दिवस झाल्यानंतर रस्ता ठिकठिकाणी पूर्णपणे उखडले. त्यानंतर पुन्हा खडी टाकून पॅचिंगचे काम करण्यात आले. मात्र सदर रस्त्याची अवस्था पुन्हा खड्डेमय झाली आहे. कोट्यावधी रुपयाचे काम होऊन देखील सर्व पैसे पाण्यात गेले. नागरिकांना नव्याने झालेल्या रस्त्यावर खड्डयांचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी करुन देखील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या निकृष्ट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.  

या निकृष्ट रस्त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, नागरिकांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सुरु झाला आहे. तर धुळीमुळे श्‍वसनाचे आजार जडत आहे. सदर रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन पुन्हा दर्जेदार पध्दतीने काम न केल्यास सदरील रस्ता जेसीबीने खोदून शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देशाच्या उज्वल भवितव्यासाठी मुलांमध्ये समता, बंधूता ही मुल्ये रुजवण्याची गरज

सुशांत म्हस्के : आरपीआयचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

वेब टीम नगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) चे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. आरपीआयच्या वतीने स्नेहालय संचलित लालटाकी येथील बालभवन मधील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहर प्रवक्ता जमीर इनामदार, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, संतोष पडोळे, जावेद सय्यद, ऋषीकेश विधाते, शिवम साठे, आफताब शेख, दिनेश पाडळे, यश चाबुकस्वार, ओम भिंगारदिवे, बबलू भिंगारदिवे, सोहम भिंगारदिवे, विशाल साठे आदींसह बालभवनचे स्वयंसेवक व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, सर्व समाजाला सोबत घेऊन जातीयवादी प्रवृत्तीच्या विरोधात आरपीआय गवई गट संघर्ष करीत आहे. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरु असून, सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून पक्षाचे राजकारण व समाजकारण सुरु आहे. सत्ताधारी भाजप सरकार हुकुमशाही व जातीयवादी प्रवृत्तीने देशाचे नुकसान करीत आहे. आजची मुले उद्याचे भविष्य असून, देशाच्या उज्वल भवितव्यासाठी मुलांमध्ये समता, बंधूता ही मुल्ये रुजवण्याची गरज आहे. गरिबी, बेकारी, शेतकर्‍यांचे प्रश्‍न ज्वलंत असताना सरकारला जातीचे राजकारण करुन आपली पोळी भाजायची आहे. जातीयवादी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 १९७१च्या युद्धातील शस्त्रास्त्रे पाहून मुले हरखून गेली

सविता रमेश फिरोदिया प्रशालेचे विद्यार्थयांची एम.आय.आर.सीला क्षेत्रभेट 

   वेब टीम नगर : सन 1971 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले, यात भारताने ऐतिहासिक विजय मिळविला. या अभिमास्पद घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली. म्हणून एम.आय.आर.सी.मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नगरमधील शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील विद्यार्थी, संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धोंं.कासवा, मुख्याध्यापिका ,योगिता गांधी, विनोद कटारिया आदिंसह शिक्षकवृंद यांनी एमआयआरसीला  भेट दिली.

     या क्षेत्रभेट अंतर्गत या सैनिक कॅम्पला ही भेट देण्यात आली. यावेळी लेफ्टनंट कर्नल नवीन मसीह यांनी  1971 साली झालेल्या युद्धात वापरण्यात आलेल्या रणगाड्यासह मशिनगन, रायफल्स, रडार, लॉन्चर यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना जवानांचे महत्व, देशसेवा, देशप्रेम याविषयी प्रेरणादायक माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना १९७१ मधील युद्धावरील शॉर्ट फिल्मही दाखविण्यात आली. लष्करी बॅण्ड पथकाने देशभक्तीपर गीत वाजवून प्रशालेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. यावेळी सुभेदार मेजर एस.डी. बुरहान उपस्थित होते.

     यावेळी विद्यार्थी प्रत्यक्ष युद्धात वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रे, रणगाडे व युद्ध साहित्य पाहून हरकून गेले. लष्करी जवान व त्यांचे कार्याची महत्वपूर्ण माहिती मिळाल्याने त्यांच्यातील देशप्रेमात आणखी भर पडली. तसेच जवानांविषयी आदर निर्माण झाला.

     यावेळी सचिव र.धों.कासवा म्हणाले, एमआयआरसीचे शिशु संगोपन संस्थेचे अतुट नाते असून, येथील जवानांना शाळेच्या विद्यार्थीनी या रक्षाबंधनानिमित्त राखी बांधत असतात तर येथील जवानांच्यावतीनेही शाळेला शैक्षणिक साहित्याचे मदत दिली जात असते. जवानाविषयी विद्यार्थ्यांना प्रेम व अभिमान वाटावा, असा प्रयत्न संस्थेच्यावतीने करण्यात येत असल्याचे सांगितले.

     या क्षेत्रभेटी संदर्भात एमआयआरसीने केलेल्या सहकार्य व माहितीबद्दल विनोद कटारिया यांनी लष्करी अधिकार्‍यांचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संतांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले 


बालयोगी अमोल महाराज : संत भगवान बाबा व वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहाची सांगता

    वेब टीम  नगर : राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई.  आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत.  विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. तर  वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिध्दपुरुष, साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. या संतांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले, असे अनेक उदाहणातून संतांच्या कार्याचा उल्लेख हभप बालयोगी अमोल महाराज यांनी केले.

     सारसनगर येथे संत भगवान बाबा सेवाभावी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सप्ताहाच्या समारोपप्रसंगी काल्याचे किर्तनात अमोल महाराजांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, हभप झुंबर आव्हाड, रामदास बडे, म्हातारदेव घुले, भगवान ढाकणे, देवराम घुले, बबन घुले, भगवान आव्हाड, मच्छिंद्र दहिफळे, अनिल पालवे, उद्धव ढाकणे, दादा कर्‍हाड, भैरु सानप आदि उपस्थित होते.

     यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, संत भगवान बाबांनी समाजात असलेल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या परंपरा व अंधश्रद्धा बंद करण्याचा उपदेश केला. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेश, कर्नाटकासह उभा महाराष्ट्र पिंजून काढून मोठी जागृती केली. दरवर्षी या भागात होत असलेल्या सप्ताहामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होऊन भाविकांनी ही एक पर्वणीच असते. धार्मिक उपक्रमांमुळे मनुष्याला मन:शांती लाभत असल्याने आयोजकांना कौतुक केले.

     यावेळी झुंबर आव्हाड म्हणाले, गेल्या १३वर्षांपासून संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. यात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार व प्रवचनकार सेवा देत असल्याने भाविकांची अध्यात्मिक भूक भागविली जाते. या सप्ताहासाठी अनेकांचे सहकार्य लाभत असल्याने हा सप्ताह यशस्वी होत आहे. यापुढील काळातही ही सेवा अखंड सुरु ठेवण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील, असे सांगितले.

     यावेळी हभप संजय महाराज महापुरे, हपभ शेंडे महाराज, हभप प्रभाताई भोंग, हभप हांडे महाराज, ज्ञानेश्‍वर खेडकर, नंदकुमार शिकरे, प्रताप घोडके, गाढवे , पवार , झांबरे, सांगळे, शेख मामू, संतोष हरबा आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्रीराम मंदिरासाठी माझी एक वीट असावी हि रामभक्तांची भावना

अनिल रामदासी : सिव्हिल हडको गणेश चौक येथे ''श्रीराम श्रद्धानिधी" संकलन अभियानाचा शुभारंभ  

वेब टीम नगर : ५०० वर्षाच्या  संघर्षानंतर  श्रीराम मंदिर होत आहे.७६ लढाया झाल्या.तीन लाखाहून अधिक कारसेवकांनी बलिदान दिले.मंदिर निर्माण कार्यास प्रांरंभ झाला आहे.सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.   प्रत्येकाला असे वाटते कि राम मंदिरासाठी माझी एक वीट असावी हि रामभक्तांची भावना आहे..श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानास नाकरीक उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत.हि पिढी भाग्यवान आहे.श्रीराम मंदिर निर्माणच्या सुवर्णक्षणाचे आपण साक्षीदार आहोत.असे प्रतिपादन अभियानाचे जिल्हा सहसंयोजक अनिल रामदासी यांनी केले .                                                                                                                             

   सिव्हिल हडको गणेश चौक येथील श्रीराम मंदिरात अयोध्येतील श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र  "श्रद्धानिधी" संकलन अभियानाचा शुभारंभ माजी नगरसेविका  कलावती शेळके यांच्या हस्ते श्रीराम निधीच्या कुपन पावत्यांचे पुजन करून करण्यात आले.यावेळी अभियानाचे जिल्हा सहसंयोजक अनिल रामदासी,काका शेळके,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धि प्रमुख अमोल भांबरकर,मते ,विवेकानंद नगर सहकार्यवाह वैष्णव मोरे,प्रसाद कुलकर्णी,ऋषिकेश जोशी, संजय गटणे,कुलदीप कुलकर्णी,पप्पू शेळके,रवी राऊत,अथर्व बागडे,प्रवीण भांड,संग्राम शेळके,अथर्व गंगावणे,केदार हजारे, गवळी ,अनुराग कचरे,ईशान बल्लाळ,कृष्णा रामदासी आदींसह रामभक्त,स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.या निधी संकलन अभियानास स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती अंगीकारा 

मनोज पाटील : नगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ट्राफिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सोडवणार 

वेब टीम नगर : स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी विशेषत: ग्रामीण भागातील मुलांनी कोणताही न्यूनगंड मनात बाळगू नये  मी स्वतः शालेय अभ्यासात सामान्य गुण मिळविणारा विद्यार्थी होतो. तरी देखील स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवू शकलो. प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती अंगीकारल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. 

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनोज पाटील यांची जाहीर मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. 

स्पर्धा परीक्षा, पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील संवादाची गरज, वाहतूक कोंडी, युवती - महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था अशा अनेक विषयांवरील विविध प्रश्नांना पाटील यांनी यावेळी दिलखुलास उत्तरे दिली. 

कंप्यूटर इंजिनियर असणारे पाटील यांनी दोन वर्ष अध्यापक म्हणून काम केले आहे. आपल्याला घडवण्यामध्ये आपल्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचे तसेच सेवेतील वरिष्ठ तसेच कनिष्ठ सहकाऱ्यांकडून देखील अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

नगर जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक चांगले अधिकारी दिले आहेत. आपल्या कार्यकाळात नगरमध्ये अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागरिकांची कामे ठराविक कालमर्यादेत पूर्ण व्हावीत यासाठी ई-टपाल सेवा सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर पोलीस प्रश्नाला पेपरलेस करण्यासाठी आणि समाजातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वसामान्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. 

वाहतूक कोंडीवर ट्राफिक इंजिनीअरिंगचा उपयोग करणार 

पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे पुण्यात मनोज पाटील हे ' वन वे पाटील' या नावाने प्रसिद्ध झाले होते. किरण काळे यांनी आपण नगरचे देखील वनवे पाटील होणार का ? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी नगर शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ट्राफिक इंजिनीअरिंगचा उपयोग करण्याचा मनोदय असल्याचे सांगितले. विशेषत: कापड बाजार परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुयोग्य नियोजन केले जाईल.  पोलिस, नागरिक यांना एकत्रित मिळून वाहतूक समस्येवर काम करावे लागेल अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. . 

काळेंची काँग्रेस कडून शहरात शांततेची ग्वाही

किरण काळे यांनी यावेळी मनोज पाटील यांना जाहीर ग्वाही दिली की, नगर शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां कडून कधीही कोणतेही लाजीरवाणे काम होणार नाही. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याला काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजून अनुमोदन दिले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि.चिरंजीव गाढवे यांनी केले. भूमिका प्रशांत जाधव यांनी विशद केली. यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. बाळासाहेब पवार, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी मनोगते व्यक्त केली. सुजित जगताप, कु.किरण वाडेकर यांनी आभार मानले. योगेश जस्वाल, सचिन वारुळे,धुळाजी महारनवर, शामल पवार यांच्यासह विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी काम पाहिले. 

Post a Comment

0 Comments