मूलमंत्र आरोग्याचा :योगसाधना , आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 

शलभासन (पूर्ण )




या आसनातील क्रिया अर्ध शलभासन याप्रमाणेच आहेत फक्त अर्ध शलभासनात एकावेळी एकच पाय वर उचलला जातो, तर या आसनात एका वेळी दोन्ही पाय एकदम उचलले जातात व आसन सोडताना एकदम खाली आणले जातात दोन्ही पाय एकमेकांना चिटकून सरळ ठेवणे आवश्यक आहे 

आसनस्थिती :

 वर उचललेले दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवून चवडे मागच्या दिशेने ताणून घ्या या वेळी पायामध्ये कंपने  निर्माण होण्याची शक्‍यता आहे अशा वेळी पाय किंचित खाली आणले तर हे  कंपन थांबते.  अशा प्रकारे पायात कंपने  निर्माण न होता पाय जास्तीत जास्त वर उचलले जायला हवेत व त्याच ठिकाणी संथ श्वसन चालू ठेवून पाय स्थिर ठेवणे जरूर आहे मांड्यांचे व पोटाचे स्नायू वगळता अन्य सर्व स्नायू शिथिल ठेवण्याचा प्रयत्न करावा दोन्ही पायांचे अंगठे टाचा व गुडघे एकमेकांना चिटकवून ठेवावेत कालावधी अर्ध शलभासना पेक्षा पूर्ण शलभासन हे अधिक कठीण व अधिक ताण देणारे असल्याने हे आसन  कमीत कमी पंधरा सेकंद ठेवले तरी त्याचे फायदे मिळतात याची एक ते तीन आवर्तने करणे चांगले . 

 विशेष दक्षता :

पाठीच्या कणा व कमरेचे विकार असलेल्यांनी तंज्ञाचा सल्ला घेऊनच हे आसन करावे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
साई भाजी

 साहित्य: दोन गड्डी पालक, एक गड्डी चुका ,एक गड्डी मेथी, एक गड्डी चाकवत,१ बटाटा,१००  ग्रॅ वांगे,१०० ग्रॅ लाल भोपळा ,२ वाट्या  हरभरा डाळ एक तास पाण्यात भिजवून निथळून घ्यावी, अर्धी वाटी तेल ,पंधरा सोळा लसूण पाकळ्या ठेचून ,एक इंच आले वाटून, दोन मोठे कांदे बारीक चिरुन, तीन मोठे टोमॅटो चिरून ,दहा-बारा हिरव्या मिरच्या बारीक चिरुन, चवीनुसार मीठ. 

 कृती : सर्व पालेभाज्या निवडून बारीक चिरून घ्याव्यात.वांग,बटाटा,लाल भोपळ्याचे मोठे तुकडे करावे, पाव वाटी तेल तापवावे त्यात चिरलेला कांदा व हिरवी मिरची व वाटलेले आले घालून परतावे. सर्व पालेभाज्या घालून थोडे परतावे, भोपळ्याचे वांग्याचे व बटाट्याचे तुकडे घालावेत हरभर्‍याची भिजवलेली डाळ घालून परतावे, चवीनुसार मीठ घालावे सर्व भाज्या पूर्ण प्रेशरवर प्रेशर कुकरमध्ये पाच मिनिटे शिजवाव्यात . प्रेशर कुकर मधून बाहेर काढून रवीने अथवा डावाने एकजीव होईपर्यंत घोटावे.कढईत उरलेले पाव वाटी तेल तापवून ठेचलेला लसूण घालून वरून भाजीला चरचरीत फोडणी द्यावी.  

टीप : 

* सर्व भाज्या एकत्र आल्याने चांगली येते .

* शिजवतांना हरबरा डाळ  घातल्याने डाळीचे पीठ लावायची गरज नाही.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments