नगर टुडे बुलेटीन 30-01-2021

 नगर टुडे बुलेटीन 30-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डोंगरगण ही श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी

जंगले शास्त्री महाराज :  डोंगरगण व मांजरसुंबा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ                        

वेब टीम नगर : प्रभू श्रीराम हे सर्वांचे आराध्य आहेत.पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीरामाचे मंदिर होत आहे.याचा सर्वांना अभिमान आहे.श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे ही भावना रामभक्तांची आहे.डोंगरगण ही श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.डोंगरगण येथे श्रीरामाचे वास्तव्य होते.याचे दाखले पुराणात आहेत.या परिसरातील लोक रामभक्त आहेत.अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यात जास्तीत जास्त निधी देऊन श्रीरामाच्या कार्यात सर्वानी हातभार लावावा.असे आवाहन जंगले शास्त्री महाराज यांनी केले.                                                                                      

डोंगरगण व मांजरसुंबा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ जंगले शास्त्री महाराज यांच्या हस्ते निधीच्या पावती पुस्तकाचे पूजन करून करण्यात आला.याप्रसंगी अभियानाचे जिल्हाप्रमुख गजेंद्र सोनवणे,सहप्रमुख अनिल रामदासी,संघाचे तालुका कार्यवाह बंडू मामा काळे,सरपंच सर्जेराव मते,सदाशिव पवार,रखमाजी खण्डागळे,देविदास खेत्री व जंगले शास्त्री महाराजांच्या आश्रमातील बाल वारकरी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                                                                                             

  अभियान जिल्हा सहप्रमुख अनिल रामदासी म्हणाले कि,अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरु झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.गावोगावी श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानाचे उस्फुर्तपणे स्वागत होत आहे.गावोगावी रामभक्त मोठ्या संख्येनी सहभागी होऊन श्रीरामाचे कार्य करीत आहेत.प्रत्येकाच्या मनामनामध्ये श्रीरामाचा भाव जागृत झाला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

उषादेवी डोके टॉवरच्या इमारतीमुळे सावेडीच्या वैभवात भर पडेल :आ.अरुण जगताप

वेब टीम नगर : लॉकडाऊन मुळे बांधकाम व्यवसायावर आलेले संकट आता दूर झाले आहे. त्यामुळे नगर शहरात मोठ्या वेगाने बांधकामे सुरु झाली आहेत. शहरातील सावेडी उपनगर आता आधुनिक नगर म्हणून ओळखले जात आहे. स्व.वनश्री बलभीम डोके यांनी प्रामाणिकपणे आपला बांधकाम व्यवसाय केला. आता हा वारसा त्यांची दोन्ही मुले पुढे चालवत आहेत. सावेडी भागात नव्याने होणाऱ्या उषादेवी डोके टॉवर या अत्याधुनिक व आकर्षक इमारतीमुळे सावेडी भागाच्या वैभवात भर पडेल, असे प्रतिपादन आ.अरुण जगताप यांनी केले.

          झोपडी कॅन्टीन जवळ बलभीम डोके डेव्हलपर्सच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या उषादेवी डोके टॉवर या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या इमारतीचे भूमिपूजन आ.अरुण जगताप व प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एस.एस.दीपक यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी मढी देवस्थानचे विश्वस्त ॲड. शिवजीत डोके, ॲड.  प्रसाद डोके, उद्दोजक चंद्रकांत गाडे, अनिल जोशी, सूर्यकांत गाडे, दिलीप मिस्किन, माजी नगरसेवक निखिल वारे, संदीप भांबरकर, पत्रकार विठ्ठल लांडगे, संपत नलावडे, बबनराव औटी, प्रभाकर कुलथे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी डॉ.एस.एस.दीपक म्हणाले, नगर शहर आता विकासाच्या मार्गावर जात आहे. सावेडी भागात पुण्याच्या धर्तीवर इमारती उभ्या होत आहेत. त्यामुळे नव्या व्यवसायांना मोठी चालना मिळत आहे. ॲड. शिवजीत डोके व ॲड.  प्रसाद डोके यांच्या उषादेवी टॉवर नव्या व्यावसायिकांना फायदेशीर ठरेल.

          उषादेवी डोके टॉवर बद्दल माहिती देतांना ॲड.  शिवजीत डोके म्हणाले, स्व. बलभीम डोके यांच्या कडून बांधकाम क्षेत्राचे धडे आम्ही घेतले आहेत. याठिकाणी उषादेवी डोके टॉवरची ६ मजली भव्य, आकर्षक व अत्याधुनिक इमारत येत्या वर्षभरात उभी राहणार आहे. सर्वसामान्य व्यावसायिकांना परवडेल अशा योग्य दरात याठिकाणी दुकाने उपलब्ध होणार आहेत.

          ॲड.  प्रसाद डोके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी उद्दोजक धनंजय गडे, डॉ.किरण दीपक, राहुल कुलथे, विशाल कुलथे, रेखा डोके, दिपाली डोके, शिल्पा कुलथे, अभय डोके आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 पतसंस्था सहकार संवाद कार्याक्रमाचे आयोजन 

 वसंत लोढा : ३१ जानेवारी रोजी संगमनेर येथे नाशिक विभागातील पतसंस्थांचा सहभाग

वेब टीम नगर : गेल्या वर्षी आलेल्या करोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या परीस्थीतीवर मात करण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व नगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या माध्यमातून गेल्या नऊ महिन्यांपासून वेळोवेळी डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करून पतसंस्थांचा कारभार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही समस्या व प्रश्न  एकत्र येवूनच सोडवल्या जाऊ शकतात. यासाठीच दि. ३१ जानेवारी व एक फेब्रुवारी रोजी संगमनेर येथे सहकार संवाद प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी दिली.

अधिक माहिती देतांना राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, रविवार दि. ३१ जानेवारी रोजी संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे सकाळी साडेनऊ वाजता राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सहकार संवाद कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आ.सुधीर तांबे, निफाडचे आ.दिलीप बनकर, विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, विभागीय सहनिबंधक राजेंद्र शहा, विभागीय निबंधक गौतम बलसाणे आदींसह नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे उपनिबंधक उपस्थित राहणार आहेत. आता करोनाचा प्रदुर्भाव कमी झाल्याने ९ महिन्यांच्या कालावधीनंतर एकत्र येत पतसंस्थांच्या विविध प्रलंबित समस्यांवर मार्ग काढण्यासाठी या सहकार संवाद कार्यशाळेचे आयोजन केले आहे. नाशिक विभागातील जास्तीतजास्त पतसंस्थांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सहकार संवाद कार्यशाळेच्या प्रचारासाठी नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुकताच पाचही जिल्ह्याचा दौरा केला आहे. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी पतसंस्था स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, विभागीय फेडरेशनचे उपाध्यक्ष गोपाळ पाटील आदींसह संचालक प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोनार समाजाला अभिमानास्पद विजयश्री सागर मैड यांनी मिळवली : संतोष वर्मा

वेब टीम नगर : सुपा ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मातब्बर नेतृत्वाला पराभव करत सागर मैड यांनी विजय मिळवल्या बद्दल नगरमध्ये सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा व लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय देवळालीकार यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी उमेश बेद्रे, सुनील डहाळे, रमेश शहाणे, सुनील पाटसकर, महेश वर्मा, दीपक बागडे, भरत वर्मा, अमोल मैड, शंभू देवळालीकर आदी उपस्थित होते.

          यावेळी बोलतांना संतोष वर्मा म्हणाले, कोणताही राजकीय वारसा नसतांना सागर मैड यांनी सामाजिक कामांच्या माध्यमातून जनतेची केलेल्या कामांची पावती मैड यांना या विजयातून मिळाली आहे. हा सोनार समाजाचा विजय असून सोनार समजाची मान उंचावली आहे. सोनार समाजाला अभिमानास्पद विजयश्री सागर मैड यांनी मिळवली आहे. त्यांचे भविष्य उज्वल आहे. संपूर्ण सराफ सुवर्णकार संघटना त्यांच्या मागे कायम खंबीरपणे उभी आहे.

          सत्कारास उत्तर देतांना सागर मैड म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातून वर येत प्रामाणिकपणे व्यवसाय करतांना सर्व जाती धर्माच्या नागरिकांपर्यत केंद्र सरकारच्या योजना पोहचवून त्यांना लाभ मिळवून दिला. त्यामुळेच सुपा गावातील जनता माझ्या मागे उभी राहून मला विजयी केले आहे. सराफ सुवर्णकार संघटनेने केलेला सत्कार प्रेरणा देणारा आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 इंटरनॅशनल ऑलंपियाड स्पर्धेमध्ये स्वराज पवार भारतात प्रथम

     वेब टीम नगर : इंटरनॅशनल ऑलिम्पियाड फाउंडेशन (आयओएफ) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत हिन्दी ऑलंपियाड-२०२० विषयामध्ये स्वराज जयदीप पवार याने वैक्तिकरित्या सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातून पहिला क्रमांक मिळवत गणित ऑलिम्पियाड -२०२० मध्ये गोल्डन अवॉर्ड मिळविला आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारात ही ऑलिम्पियाड स्पर्धा आयोजित करत असते.

     स्वराज पवार हा इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून काष्टी येथील परिक्रमा संकुलातील पब्लिक स्कुलचा विद्यार्थी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कष्ट केले तर ते कोणतेही ध्येय गाठु शकतात. हे या चिमुकल्याने दाखवुन दिले आहे. संपुर्ण भारतात अहमदनगर जिल्यातील विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवणे ही निश्‍चितच जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

    स्वराज जयदीप पवार याच्या या यशाबद्दल परिक्रमा संस्थेचे संस्थापक माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह पाचपुते, शाळेचे मुख्याध्यापक जेम्स मेनन, संकुल मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल पुंड, संकुल संचालक डॉ.विजय पाटील, प्राचार्य डॉ.सुनिल निर्मळ, डॉ.तन्हाजी दबडे व श्री. रमेश शिंदे यांनी अभिनंदन केले. तसेच संपूर्ण जिल्ह्यात या चिमुकल्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिंकणार्‍या जिद्दीच्या प्रवासाने रसिक नगरकर मंत्रमुग्ध...

चिंतामणी आयोजित शशिकांत खिस्ती यांचा प्रेरणादायी संवाद

    वेब टीम  नगर : व्यायामाची आवड... काही तरी वेगळे करुन दाखविण्याची जिद्द पण त्यामध्ये आर्थिक  बिकट परिस्थिती.. आधुनिक साधनांचा अभाव... शिक्षण, नोकरी व व्यायामाचा सराव यांचा ताळमेळ घालतांना केलेला प्रचंड संघर्ष परंतु यातूनही सतत जिंकत जाणार्‍या शरीरसौष्ठव पटू भारतश्री शशिकांतजी खिस्ती यांचा प्रवास अनुभवतांना उपस्थित रसिक नगरकर भारावले. चिंतामणी आर्ट गॅलरी, एमआयडीसी च्यावतीने ‘प्रेरणा -२’ पर्वा अंतर्गत आयोजित मुलाखतीत शशिकांतजी खिस्ती यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी चिंतामणीचे संचालक रामचंद्र व बिंदू सुकटणकर, स्नेहा खिस्ती, मुलाखतकार शिल्पा रसाळ, उपक्रमाचे प्रणेते चिन्मय सुकटणकर व असंख्य मान्यवर उपस्थित होते.

     खिस्ती यांनी आपल्या बालपणीच्या दादा चौधरी शाळेतील आठवणी सांगतांना प्रतिकुल परिस्थिीमुळे दिवसा शाळा करुन इतरवेळी खाऊ, सुपारी यांच्या पुड्या भरण्याचे काम करत. कबड्डी, फुटबॉल, एनसीसीमधून खेळाची आवड वाढत होती. मात्र कॉलेजमध्ये असतांना उदर निर्वाहासाठी एमआयडीसीमध्ये नोकरी करावी लागे. रात्री ड्युटीवरुन सायकलवर परत येतांना कुणी अडवले तर आपण स्वसंरक्षणासाठी आपले शरीर भक्कम व बलवान व्हावे यासाठी सिद्धीबाग व वाडियापार्कच्या तालमीत सराव सुरु केल्याचे खिस्ती यांनी नमुद केले.   

     पुरेसा आहार नसल्याने शरीर सौष्ठव स्पर्धेत उतरण्यास घरच्यांचा विरोध होता. परंतु पहिल्याच स्पर्धेत मिळालेले यश पाहून घरच्यांनी मोठे पाठबळ दिले. ‘शाकाहरी’ असल्याने विविध दाळी व शेंगदाणे हा माझा आगळा-वेगळा आहार असला तरी सातत्यपूर्ण मेहेनत, वाचनातून या खेळात बारकावे समजाऊन घेत तयार केलेले पिळदार व आकर्षक शरीर कमावून हा जिंकण्याचा जिद्दीचा प्रवास सतत सुरु राहिला. दरम्यान एमआयडीसी नोकरी, आयटीआय अभ्यासक्रमासाठी संघर्ष करतांना स्पर्धेच्या यशांचा उपयोग, जिल्हा उद्योग केंद्रातही स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी झाला. याच प्राविण्याच्या उपयोगाचे खिस्ती यांनी सांगितलेले किस्से उपस्थितांनाअंतर्मुख करणारे ठरले.

     दरम्यान राष्ट्रीय जलतरणपटू स्नेहा खिस्तींशी विवाहबद्ध झाल्यावर तिनेही आपल्या स्पर्धेच्या सर्वोच्य ध्येयासाठी  महत्वपूर्ण पाठिंबा दिला, त्यामुळेच १९९१ साली अर्बन बँकेत नोकरी सांभाळून खेचून आणलेला ‘भारत श्री’ चा किताब आयुष्यातील अविस्मरणीय ठरल्याचे खिस्ती अभिमानाने सांगतात.

     खिस्ती जिमच्या माध्यमातून गौतम दीक्षित व सदाभाऊ देवगांवकर यांनी केलेल्या मदतीमुळे पुढच्या पिढीच्या शरीर सौष्ठवाचे धडे देऊ शकल्याचे अभिमानाने सांगितले. उगवत्या पिढीनेही या खेळाकडे करियर म्हणून पाहतांना तंत्रशुद्ध ज्ञान, जिद्दी, सातत्य व नैसर्गिक आहाराला महत्व देण्याची गरज असल्याचे सांगितले.

     खिस्ती यांनी या मुलाखतीचा प्रवासात विविध स्पर्धेत आलेले अनुभव, चित्रकार प्रमोद कांबळे, क्रिकेटपटू जहिर खान, आंतरराष्ट्रीय किर्तीचे तळवळकर, क्रीडा मार्गदर्शक दिनुभाऊ कुलकर्णी यांच्या अनेक प्रसंगातून आठवणींना उजाळा दिला.

     याप्रसंगी संचालक चिन्मय सुकटणकर यांनी शशिकांत खिस्ती व भारती खिस्ती यांचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रीय खेळाडू स्नेहा खिस्ती यांनीही या मुलाखतीत सहभाग घेतला. मुलाखातकार शिल्पा रसाळ यांनी मुलाखत घेतली. यावेळी यश खिस्ती व रसिक नगरकर, शरीरसौष्ठवपटू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाचन संस्कृती वृद्धींगत करुन भाषेचा दर्जा वाढवा

डॉ.प्रा.लक्ष्मीकांत येळवंडे : जिल्हा वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विविध उपक्रम

    वेब टीम  नगर : मराठी भाषेतील ग्रंथ, साहित्य व त्यामागचे महान असे लेखक यामुळे मराठी समृद्ध आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या काळात तरुण पिढीला तंत्रज्ञानाचा वापर करुन वाचन संस्कृती वृद्धींगत करणे ही काळाची गरज आहे. सद्यस्थितीत धावपळीच्या जगात बदलत चाललेेले प्रत्येकाचे जगणे, त्यामधील संघर्ष आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहून संवेदना जागृत ठेवून सर्वांपुढे मांडणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन तरुण पिढीला प्रोत्साहन देण्याची गरज असून, जिल्हा वाचनालय हा वारसा अनेक दशके सांभाळत असल्याबद्दलचे समाधान न्यू आर्टस् महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी व्यक्त केले. 

     मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, लेखक सदानंद भणगे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, प्रा.मेधाताई काळे, दिलीप पांढरे, किरण आगरवाल, अनिल लोखंडे, गणेश अष्टेकर, ग्रंथपाल अमोल इथापे उपस्थित होते.

     जिल्हा ग्रंथालय अधिकारी गाडेकर यांनी जिल्हा वाचनालय हे ग्रंथाच्या बाबतीत लखपती असलेले दुर्मिळ ग्रंथालय आहे. वाचनाचा व भाषा समृद्धीचे हे प्रवेशद्वार असल्याने त्याचे महत्व अमुल्य असल्याचे सांगून हा वाचन संस्कृतीचा वारसा जिल्हा वाचनालयाने सुमारे १८२ वर्ष जपल्याने हा नगरकरांना अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

     अध्यक्ष प्रा.मोडक यांनी उपस्थितांचे स्वागत करुन वाचनालय रसिक वाचकांसाठी सातत्याने वाचन व भाषा संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी शिल्पा रसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. लेखक सदानंद भणगे यांनी वाचनालयास पुस्तक भेट दिले. आभार गणेश अष्टेकर यांनी मानले.

     यावेळी ग्रंथपाल अमोल इथापे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, अविनाश रसाळ, कर्मचारीवृंद उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वडारवाडी ग्रामपंचायत नूतन सदस्या सरोज परदेशी यांचा राजपूत ठाकूर समाजाच्यावतीने सत्कार

    वेब टीम  नगर : नगर तालुक्यातील वडारवाडी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या चुरसीच्या व अटीतटीच्या निवडणूकीत महिला राखीव प्रभागातून सौ.सरोज उदयभानसिंह परदेशी या निवडून आल्या. या निवडीबद्दल सौ. सरोज परदेशी यांचा राजपूत ठाकूर समाजाच्यावतीने ज्येष्ठ कार्यकर्ते नंदूभैय्या परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुभाषसिंह ठाकूर, श्रीपादसिंह ठाकूर, श्री राजपूत करणी सेनेचे कार्याध्यक्ष किसनसिंग परदेशी, भिंगार अध्यक्ष प्रितमसिंग परदेशी, उपाध्यक्ष अमोलसिंग ठाकूर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी नंदूभैय्या परदेशी म्हणाले, आज जमाना बदलला आहे, पुरुषांबरोबर महिलाही विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. राजकारणातही आपल्या कार्याने त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. गावपातळीवर महिलांना प्रतिनिधीत्व मिळत असल्याने गावाच्या विकासात महिलांची भुमिका महत्वाची ठरत आहे. त्यातून गावाचा विकास होत आहे. सरोज परदेशी यांनीही गावात महिलांचे चांगले संगठन केले आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना निवडून दिले आहे. गावाच्या विकासात त्या यापुढील काळात चांगले योगदान देतील, असे सांगून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

     सत्काराला उत्तर देतांना  सरोज परदेशी म्हणाले, गावातील कार्यात महिलांचे योगदान असावे, महिलांच्या समस्यां सोडविल्या जाव्यात यासाठी यापुढे कार्यरत राहू. वडारवाडी गावाचा विकासात महत्वपूर्ण कार्य करण्याचा आपला संकल्प आहे. आज समाजाच्यावतीने माझा सत्कार केल्याने प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाषसिंह ठाकूर यांनी केले तर आभार किसनसिंग परदेशी यांनी मानले. याप्रसंगी समाज बांधव उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विजेंद्र सिसवाल यांची राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेसच्या जिल्हा महासचिवपदी नियुक्ती

   वेब टीम नगर :  नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी विजेंद्र भीम सिसवाल यांची राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेसच्या जिल्हा महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमपाल गुरुजी यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष गोविंद कागडे यांनी दिले आहे.

     राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांसाठी काम करत आहेत. संघटनेच्या माध्यमातून सफाई कर्मचार्‍यांचे आडीअडचणी सोडविल्या जात आहेत. त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहे. विजेंद्र सिसवाल यांनी संघटनेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची जिल्हा महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष गोविंद कागडे यांनी सांगितले.

     नियुक्तीनंतर विजेंद्र सिसवाल म्हणाले, जिल्ह्यातील सफाई कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांबाबत आपण संघटनेच्या माध्यमातून सोडवणूक करत असतो. संघटनेने आपल्यावर दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडून जिल्ह्यात संघटनेचे काम वाढवू असे सांगितले.

          विजेंद्र सिसवाल यांचे नियुक्तीबद्दल राजेश कनोजिया, संदिप छजलानी, सिद्धार्थ सोळंकी, आनंद नकवाल, संजय गोहेर, सचिन चव्हाण, आबु लोहार, घोडगे मेजर, रोहित सिसवाल आदिंसह  जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांबरोबरच सफाई कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना काळात फिनिक्स फाऊंडेशनने निस्वार्थपणे केलेली रुग्णसेवा कौतुकास्पद

खा.डॉ.सुजय विखे : फाऊंडेशनचे अध्यक्ष बोरुडे यांचा सन्मान

वेब टीम नगर : कोरोना काळात माणुसकीच्या भावनेने फिनिक्स फाऊंडेशनने गरजू रुग्णांपर्यंत पोहचून त्यांची सेवा केली. मनुष्यरुपी रुग्णांची सेवा ही ईश्‍वरसेवाच आहे. फाऊंडेशनने निस्वार्थपणे केलेली रुग्णसेवा कौतुकास्पद असून, या कार्याची दखल घेऊन दिल्लीचा राष्ट्रीय अंधत्व निवारणचा पुरस्कार मिळणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने भुषणावह असल्याचे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

कोरोना महामारीत फिनिक्स सोशल फाऊंडेशनने विविध मोफत शिबीर घेऊन सर्वसामान्य रुग्णांना आधार दिल्याबद्दल व सदरच्या कार्याबद्दल दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा नेत्र सेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. विखे बोलत होते. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोरुडे यांचा खासदार डॉ. विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव, मितेश शहा, राहुल मुथा, तुषार अंबाडे आदी उपस्थित होते.

शिवाजी कर्डिले म्हणाले की, टाळेबंदी काळात सर्वसामान्यांची व हातावर पोट असलेल्या कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असताना, गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने फिनिक्स फाऊंडेशनने विविध शिबीरे घेतली. मागील आठ ते नऊ महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल हजारो रुग्णांनी लाभ घेतला. तर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. गरजू रुग्णांची पैश्यांमुळे परवड होऊ नये, यासाठी गोर-गरीब रुग्णांकरिता फिनिक्स फाऊंडेशन आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी काळात इतर उपचारासाठी नागरिकांना अनेक हॉस्पिटलमध्ये चकरा माराव्या लागल्या. तर कोरोनामुळे अनेक डॉक्टर रुग्णांना दवाखान्यात घेण्यास देखील घाबरत होते. टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेक रुग्ण विविध आजाराच्या उपचारापासून वंचित होते. ही जाणीव ठेऊन फिनिक्सने नियमांचे पालन करुन विविध ठिकाणी आरोग्य शिबीर घेतले. गरजूंना मोफत चष्मे व औषधांचे वाटप केले. नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी आर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटायझरचे वाटप केल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि मागासवर्गीय, बहुजन, बौद्ध, मातंग, समाजाची मागणी

वेब टीम नगर : शहरातील तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि मागासवर्गीय, बहुजन, बौद्ध, मातंग, समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, तालुका अध्यक्ष गणेश ढोबळे, जालिंदर उल्हारे, संतोष जगताप, कैलास साळवे, सागर साळवे, लहुजी शक्ती सेनेचे सुनील सकट, भारतीय लहुजी सेनेचे साहेबराव काते, साजिद बेग, हॅपी भांबळ, ज्ञानदेव भैलुमे, अजित गायकवाड आदी उपस्थित होते.                              

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील तमाम अपेक्षित घटकांचे विद्यापीठ होते. या थोर साहित्यकांचे शहरातील तारकपूर बस स्थानकाला नांव असणे भूषणावह ठरणार आहे. अण्णाभाऊ साठे यांनी अहमदनगरमध्ये सर्जेपुरा रंगभवन येथे शाहिरीचा कार्यक्रम केला होता. शहराजवळच अकोळनेर येथे अण्णाभाऊ साठे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी आले होते. त्यांच्याशी शहराचे भावनिक नाते निर्माण झालेले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय, दलित, शोषित, कष्टकरी, शेतकरी, कामगार व साहित्यिकांची तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची इच्छा आहे. तरी तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि मागासवर्गीय, बहुजन, बौद्ध, मातंग, समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निवड होऊन देखील भरतीसाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप २०१९ ची अंतिम निवड यादी जाहीर करण्याची मागणी

त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने तलाठी उमेदवारांचे उपोषण

वेब टीम नगर : तलाठी भरती२०१९ ची अंतिम निवड होऊन देखील भरतीसाठी दिरंगाई होत असल्याने त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने तलाठी उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण केले. यावेळी सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष संदीप लगड, प्रसाद बिराजदार, सतीश धरम, तुषार काळे, विजय मोरे, कांचन धाडगे, सोनाली जराड, चंद्रकांत नवाळी, दत्ता कोळपे, जीवन हजारे, प्रवीण जाधव आदीसह तलाठी उमेदवार उपस्थित होते.                              

तलाठी भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवार गेल्या वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सदर उमेदवारांनी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात या विषयाचा पाठपुरावा करून सुद्धा अद्याप त्यांना ठोस आश्‍वासन मिळालेले नाही.

दि.२डिसेंबर २०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार त्यांना लवकरात लवकर नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. तरीही ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू होईपर्यंत विविध कारणे देऊन विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. आचारसहिता संपल्यावर ताबडतोब नियुक्ती देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. आचारसंहिता संपुष्टात येऊन आज बरेच दिवस उलटून गेले असले तरी कुठल्याही प्रकारे प्रशासनाच्या वतीने लेखी स्वरुपात प्रकटन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. अथवा निवड यादी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन तलाठी भरती २०१९ ची अंतिम निवड यादी जाहीर करण्याची मागणी तलाठी उमेदवारांनी केली आहे.(फोटो-डीएससी ९०८१)


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तरूणाना लाजवेल असा उत्साह काकाजींमध्ये होता ह. भ.प. श्री. वेणूनाथ महाराज वेताळ

स्व. नंदलालजीं ( काकाजीं ) च्या स्मृतीला उजाळा म्हणून गुरुकृपा सत्संग मंडळ आणि जोशी परिवाराच्या वतीने " गुरू परमात्मा परेशु " कार्यक्रमाचे आयोजन 

वेब टीम नगर : काकाजी वयानी जरी वयस्कर झाले होते परंतू त्यांचे मन मात्र तरूण व अत्यंत उत्साही असे होते.तरूणाना लाजवेल असा उत्साह असे कोणताही कार्यक्रम असो त्यांचा जबरदस्त असा उत्साह होता. असे प्रतिपादन ह. भ.प. श्री. वेणूनाथ महाराज वेताळ यांनी केले.
रावसाहेब पटवर्धन सभागृह येथे  स्व. नंदलालजीं ( काकाजीं ) च्या स्मृतीला उजाळा म्हणून गुरुकृपा सत्संग मंडळ आणि जोशी परिवाराच्या वतीने " गुरू परमात्मा परेशु " आयोजित कार्यक्रमात नंदलाल जोशीच्या  प्रतिमेस पुष्पहार  ह. भ.प. श्री. वेणूनाथ महाराज वेताळ व ह.भ.प. महेश महाराज मडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. महेश महाराज गाडगे,संजय जोशी,गोविंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
वेताळ महाराज पुढे म्हणाले की,काकाजीनी जो पांयडा पाडला होता तो अखंडपणे गुरुकृपा सत्संग मंडळ आणि जोशी परिवार पुढे नेत आहे.हीच खरी श्रध्दाजंली आहे. वेताळ महाराजांनी काकाजीना प्रश्न विचारला होता की, तुमचे वय किती आहे त्यावर वय न सांगता काकाजी म्हणाले होते की आपण सतत समाधानी राहले पाहीजे.   
ह.भ.प.श्री. महेश महाराज मडके म्हणाले की,केवळ श्वास घ्यायचा नाही तर श्वासगणिक आपली इतरांना आठवण झाली पाहीजे तेच काम काकाजींनी केले आहे. यावर्षी या दिवशी काकाजी आपल्या सोबत नाहीत , काकाजी देहरूपी जरी नसले तरी ते मनाने आपल्यातच आहेत .
यावेळी भजनाचा कार्यक्रम झाला त्यात विठ्ठलराव लोखंडे (  गुरु परमात्मा परेशु ), उमेश  पागे (  दत्त दिगंबर दैवत माझे )  प्रसाद शेटे (  दत्ताची पालखी आहेर ), डॉ. अभिजित मिसाळ (   विठू माउली तू ) पांडुरंग शिंदे यांनी गौळण ( कान्होबा निवडी आपुली गोधने ),  संकेत सुवर्णपाठकी  (  अवघाची संसार करीन सुखाचा (भैरवी) ), अरूण अहिरे ( समयासी सादर व्हावे ) ,    ओंकार देऊळगावकर, नीता प्रथमशेट्टी, श्री गांधले, गुरुकृपा सत्संग मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्र  शंकर बाबा हात जोडीतो ,  दत्ताची मूर्ती आणा मला , नाही जन्म नाही नाम , धन्य धन्य हो प्रदक्षिणा , दिगंबरा दिगंबरा , श्री स्वामी समर्थ , गुरु महाराज गुरु ही भजने म्हटली.प्रसाद सुवर्णपाठकी व आनंद कुलकर्णी ( तबला ) , संकेत सुवर्णपाठकी (  हामोर्निअम ), निखिल गांधले ( टाळ ), आदीनी साथसंगत केली.
उमेश पागे, डॉ. अभिजीत मिसाळ, सौ शारदा होशिंग, सुनील गुरव, राजहंस देसाई, गायत्री शर्मा, प्रकाश भंडारे, सोनाली लोहोकरे,प्रसाद सुवर्णपाठकी,विठ्ठल लोखंडे, अरूण अहिरे, प्रसाद शेटे,राहुल तांबोळी यांनी काकाजींच्या आठवणीतील मनोगत व्यक्त केली. यावेळी जोशी परीवारातील सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक,स्वागत  व सुत्रसंचालन सौ. शारदा  होशिंग  यांनी केले.



Post a Comment

0 Comments