मूलमंत्र आरोग्याचा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
योगसाधना
अर्धचंद्रासन
पद्धती :
१) ताडासनात उभे रहा आणि उत्थित त्रिकोणासन करा.उजव्या बाजूने त्रिकोणासनात उभे राहिल्यावर श्वास सोडा आणि उजवा गुडघा वाकवून उजवा तळहात उजव्या पावलापासून एक फूट अंतरावर ठेवा त्याच वेळी डावे पाहून उजव्या पावला जवळ आणा .
२) या स्थितीत राहून दोनदा श्वसन करा मग श्वास सोडा आणि बोटे वर रोखली जातील अशा पद्धतीने डावा पाय जमिनीवरून उचला उजवा हात आणि उजवा पाय ताणून धरा.
३) डावा तळहात डाव्या मांडीवर ठेवून ताणून धरा, खांदे चांगले वर धरा छाती डावीकडे वळवा आणि शरीर तोलून धरा .
४) शरीराचा भार आता उजवे पाऊल आणि पार्श्वभाग यावर ठेवावा उजव्या हाताच्या पंजाच्या उपयोग केवळ तोल सांभाळण्यासाठी आधार म्हणून करावा.
५) दीर्घ आणि समतोल श्वसनासह या स्थितीत २० ते ३० सेकंद राहा नंतर डावे पाऊल घसरवत जमिनीवर आणा आणि पुन्हा त्रिकोणासन करा .
६) हे आसन पुन्हा डाव्या बाजूने करा.
परिणाम : ज्यांच्या पायामध्ये व्यंग किंवा रोग संसर्ग असेल अशांना हे आसन फार उपयुक्त आहे. कण्याचा तळाचा भाग आणि पायांच्या स्नायूशी संलग्न असलेले मज्जातंतू या आसनामुळे सदृढ बनतात. तसेच गुडघ्यांनाही शक्ती येते. उभ्याने करावयाच्या इतर आसनांप्रमाणे या आसनाने ही जठराचे रोग बरे होतात.
टीप : उभे राहून करावयाच्या आसनांमुळे ज्या अशक्त व्यक्तींना थकवा येतो त्यांनी फक्त उत्थित त्रिकोणासन आणि उत्थित पार्श्वकोणासन ही दोनच आसने करावी कारण त्यामुळे शरीराला सांभाळता येतो उभे राहून करण्याची इतर आसने मात्र ज्यांनी शक्ती कमावली आहे व ज्यांची शरीरे लवचिक झालेली आहेत अशांनीच करावी
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आरोग्य आहार
व्हेज माखनवाला
साहित्य : १ वाटी मटार , १ सिमला मिरची ,१ वाटी गाजराचे तुकडे, १ वाटी फ्लॉवर, २ बटाटे, अर्धी वाटी पानकोबी, थोडी कोथिंबीर, २ मोठे कांदे, आलं लसूण पेस्ट, पाव किलो टोमॅटो,पाव किलो पनीर.
मसाला साहित्य : शहाजिरे अर्धा चमचा, १ चमचा लाल तिखट,२ चमचे गरम मसाला, २ वाट्या दही, १ लिंबाचा रस, अर्धी वाटी बटर, मीठ, साखर चवीनुसार.
कृती : सर्व भाज्या वाफवून घेणे (कांदा ,टोमॅटो,सिमला मिरची सोडून).
चिरलेला कांदा , शहाजिरे . आलं लसूण पेस्ट,हिरव्या मिरच्या, लाल तिखट व गरम मसाला वाटून घ्यावा.
वाटलेल्या मसाल्यात दही , मीठ व साखर घालून चांगले एकजीव करून घ्यावे व वाफवलेल्या भाज्या त्यात मॅरीनेट करून थोडावेळ ठेवाव्यात.
कढईत तेल गरम करून सिमला मिरची व टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे व त्यात मॅरीनेट केलेल्या भाज्या व थोडे पनीर किसून घालून भाज्या परतून घ्याव्यात.
उरलेल्या पनीरचे छोटे छोटे तुकडे तळून भाजीच्या वरतून घालावेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments