नगर टुडे बुलेटीन 29-01-2021

 नगर टुडे बुलेटीन  29-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निरोगी जीवनासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे

अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी : कल्याणरोड येथे जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन

वेब टीम नगर : नगर-कल्याणरोड परिसरात प्रथमच लेडीज जिमचा शुभारंभ झाला आहे.यामुळे शहरातील महिलांना  आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.जी के लेडीज फिटनेस या जिम मध्ये अत्याधुनिक अश्या सुविधा आहेत. निलमताई खंडागळे यांनी जिम सुरु करून महिलांना आरोग्य निरोगी व सुदृढ राखण्यासाठी संधी निर्माण केली आहे.खंडागळे परिवाराने सुनेला पाठींबा देऊन जिम सुरु करण्यास प्रोत्साहन दिले हि अभिमानास्पद बाब आहे. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला निरोगी आरोग्याची आवश्यकता आहे.महिला निरोगी राहिल्यास कुटुंब निरोगी राहते.निरोगी जीवनासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी यांनी केले.                                       

शिवाजीनगर कल्याण रोड येथील भावना ऋषी येथे महिलांसाठी जीके फिटनेस लेडीज जिमचे उदघाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.याप्रसंगी जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे,देवेंद्र कवडे,पै.भैरवनाथ खंडागळे,नगरसेवक गणेश कवडे,दगडूमामा पवार ,दत्तात्रय मुदगल,जितेंद्र वल्लाकट्टी,डॉ.दीपक कारखेले,नगरसेविका सोनालीताई चितळे,वैशालीताई नळकांडे ,सविताताई शिंदे,कैलास दळवी,गणेश खंडागळे,नीलमताई खंडागळे,प्रा.उत्तमराव राजळे,गंगाधर खंडागळे ,पै.गोरख खंडागळे,बजरंग शेळके,मनोहर शिंदे,किरण खंडागळे,निखील सोनवणे,मंगेश घोरपडे,नितीन थोरात,पप्पू गारदे आदी उपस्थित होते.                                                                                                  

सुहासभाई मुळे म्हणाले,नगर शहरात खंडागळे परिवाराने लेडीज जिमचे उद्घाटन करून महिलांसाठी चांगला उपक्रम राबविला आहे.या जिमचा महिलांनी फायदा घेऊन आरोग्यसंपन्न व्हावे.  देवेंद्र कवडे म्हणाले,खंडागळे परिवाराने कल्याण रोड परिसरात महिलांसाठी जिम सुरु केली.हि भूषणावह बाब आहे.                                                                                                            

प्रास्तविकात निलमताई खंडागळे म्हणाल्या,जीके फिटनेस जिम ७ वर्षांपासून सुरु आहे.परंतु महिलांसाठी स्वतंत्र जिम असावी या उद्देशाने लेडीज जिमचा शुभारंभ केला आहे.मला परिवारातील सर्वांचा पाठिंबा मिळाल्यानेच मी हे करू शकले आहे.महिलांनी निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी जिम मध्ये प्रवेश घ्यावा.                                                                                                                                    

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उत्तमराव राजळे यांनी केले तर आभार भैरवनाथ खंडागळे यांनी मानले.यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी कल्यानरोड परिसरातील महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल : महंत आदिनाथ शास्त्री महाराज   

                                    

वेब टीम नगर : प्रभू श्रीराम हे आदर्श राजा,पुत्र,बंधू,मातृ,पितृ भक्त होते.राजा दशरथ यांचा शब्द पाळण्यासाठी श्रीरामांनी राज्यत्याग करून १४ वर्ष वनवास भोगला.दृष्ट प्रवुत्तीचा नाश करण्यासाठी रावणासारख्या बलाढ्य राक्षसाला नमविले.अश्या थोर आदर्शवादी प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल होईल.असे प्रतिपादन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी केले.                                    

 मढी येथील कानिफनाथ देवस्थान येथे निधी संकलन अभियानाचा प्रारंभ तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या हस्ते श्रीरामाचे पूजन करून करण्यात आला.याप्रसंगी ह.भ.प.शिंदे महाराज,पाथर्डी तालुका संघचालक अरविंद पारगावकर,मढी देवस्थान विश्वस्त भाऊसाहेब मारकड, माजी विश्वस्त हरिश्चंद्र मरकड,बाळासाहेब मरकड,सीईओ  पवार,दत्ता दारकुंडे,घनश्याम शिंदे,आदी उपस्थित होते.   

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गरीब व करोडपती नागरिकांच्या सर्मपणातून राम मंदिर होणार

 प्रांत संघचालक नानासाहेब जाधव : भारत भारतीचे साध्या पद्धतीने भारतमाता पूजन

वेब टीम नगर : सुमारे ५०० वर्षापूर्वी पाडलेले अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणी साठी झालेल्या संघर्षात  आत्तापर्यंत सुमारे साडेतीन लाख नागरिकांचे बलिदान गेले आहे. १९९२ साली बाबरी मस्जिदचा ढाचा पाडल्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी गावागावातून राम मंदिर उभारणीसाठी जागृती केली. आता राम मंदिर निर्मितीचे सर्व अडथळे दूर झाल्याने अयोध्येत प्रत्यक्ष बांधकामास सुरवात झाली आहे. याठिकाणी होणाऱ्या भव्य मंदिरासाठी लागणारे १५०० करोड रुपये सर्व भारतीयांकडून उभे केले जात आहेत. गरीबातील गरीब, निराधार, मध्यमवर्गीय व करोडपती नागरिकही या कार्यात सर्मपण करत आहे. येत्या ३१ जानेवारी पर्यंत सर्व नागरिकांनी आपल्या परीने या राष्ट्रमंदिरासाठी समर्पण करत इतरांना प्रेरित करावे, असे अवाहन रा.स्व.संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले.

 राष्ट्रीय एकात्मतेसाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या भारत भारती या संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त हजारो लोकांच्या उपस्थितीत होणारा भारतमाता पूजन व फूडफेस्टिव्हलचा कार्यक्रम यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र भारतमाता पूजनात खंड पडू नये यासाठी केवळ भारत भरतीच्या सदस्यांच्या उपस्थितीत सध्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव व प्रांत संपर्क प्रमुख राजाभाऊ मुळे यांच्या हस्ते भारतमाता पूजन करण्यात आले. यावेळी भारत भारतीचे उपाध्यक्ष कमलेश भंडारी, सचिव चेतन जग्गी, माजी अध्यक्ष के.के.शेट्टी, दामोदर बठेजा, अशोक मवाळ, कॅप्टन रावत, वसंत सिंग, बाबुशेट टायरवाले आदींसह सदस्य उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ मुळे यांचे नवीन भारत या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, आपल्या भारतीयांनी शौर्य दाखवले नाही आज असे जगात एकही क्षेत्र राहिलेले नाही. आपला भारत देश संपूर्ण जगात आदर्शवत काम करत असल्याने आपल्या समोर नवा भारत दिसत आहे. कारोनाच्या संकटात भारत पूर्णपणे ढासळेल असे मोठ्या राष्ट्रांना वाटत होते. मात्र करोनाच्या विरोधातील युद्ध जिंकत भारताने सर्वात स्वस्त, सर्वात प्रभावी व सर्वात जास्त वेगाने निर्माण होणारी स्वतःची लस निर्मिती केली आहे. त्याच बरोबर भरताने बनवलेले क्षेपणास्त्राची अनेक देश मागणी करत आहेत. हा सर्व पराक्रम आपल्याला आत्मनिर्भर करणारा आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे खंबीर व सक्षम नेतृत्व भारतास मिळाले नाही हे आपले दुर्दैव, नाहीतर ही प्रगती केव्हाच झाली असती.  कार्याक्रमचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन कमलेश भंडारी यांनी केले. आभार चेतन जग्गी यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पदाधिकार्‍यांनी पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहचवावीत

 राजेंद्र फडके : भाजपाचे जिल्हास्तरीय बैठक संपन्न

  वेब टीम  नगर : पक्षीय पातळीवर काम करत असतांना सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागते. पक्षातील प्रत्येक घटक हा एकमेकांशी जोडला गेला पाहिजे. संघटन हे महत्वाचे असून, पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यपर्यंत पोहचविण्याची जबाबदार तुमच्यावर आहे. पक्षातील महत्वाच घटक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते, त्यामुळे आपणावर दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. प्रामाणिक कार्यकर्त्यांची दाखल पक्ष हा घेत असतोच, त्यामुळे जबाबदारीने काम करुन पक्ष वाढवावा. केंद्र शासनाच्यावतीने सर्वांसाठी विविध योजना राबविल्या आहेत, त्याचा लाभ संबंधितांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षीय पातळीवर संघटनेचे मजबुतीकरण करण्याचे काम सुरु असून, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम पक्ष करणार आहे. बुथ समित्या या नागरिकांशी जोडलेल्या असल्याने प्रत्येक बुथ सदस्यांनी आपले संपर्क अभियान आणखी वाढविले पाहिजे, असे आवाहन प्रदेश भाजपाचे बुथ प्रभारी राजेंद्र फडके यांनी केले.

भाजपाची जिल्हास्तरीय बैठक लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री.फडके बोलत होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, नगर जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, शाम पिंपळे, कचरु चोथे, सत्यजित कदम, विश्‍वनाथ कोरडे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी लक्ष्मण सावजी  म्हणाले, केंद्र शासनाने शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी नवीन कृषी कायदे तयार केले आहेत. हे कायदे दोन्हीही संसदेत कायदे संमतही झाले आहेत. त्यावेळी अनेक पक्षांनी संमती दिली तर अनेकांनी यावेळी चर्चाही केली नाही, परंतु आता बाहेर येवून शेतकर्‍यांचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत. परंतु भाजप प्रणित केंद्र शासनाने शेतकर्‍यांच्या हितासाठीच हे कायदे केले आहेत, परंतु विरोधक या कायद्यांची सविस्तर माहिती न घेता शेतकर्‍यांना भडकविण्याचे काम करत आहेत. अशा परिस्थितीत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कृषी कायद्याची माहिती घेऊन ती सर्वांपर्यंत पोहचविली पाहिजे,असे सांगितले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले, जिल्ह्यात भाजप पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून, पक्षाने दिलेल्या कार्यक्रम प्रभावीपेण राबवत आहेत. पदाधिकारी व कार्यकत्याच्या समन्वयातून भाजप पक्ष जिल्ह्यातील तळागाळापर्यंत पोहचत आहे. पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या समन्वयातून केंद्र शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरु आहे. बुथस्तरावरील कार्यकर्त्यांना पक्षाच्यावतीने पाठबळ देण्यात येत असून, त्यातून अनेक उपक्रम व कार्यक्रम राबविले जात आहेत. विशेषत: ग्रामीण भागात शेतकर्‍यांमध्ये कृषी कायद्याबाबत व केंद्राच्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांमार्फत पोहचविली जात आहे.

यावेळी संस्कृतिक विभागाच्या प्रदेश सहसंयोजक गितांजली ठाकरे व नूपूर सावजी यांनी सांस्कृतिक विभागाची माहिती दिली. उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव, गणेश भालसिंग, आजिनाथ हजारे, मनोज कुलकर्णी, गुरुनाथ माळवदे आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१३ राज्यात कार्यरत असलेल्या दि मिलिटरी इंजिनिरिंग सर्व्हिसेस सोसायटीच्या अध्यक्षपदी अभिषेक चिपाडे

वेब टीम  नगर :  दि मिलिटरी इंजिनीरिंग सर्व्हिसेस क्रेडिट कॉ-ऑप सोसायटीच्या  पुणे येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नगरचे अभिषेक भानुदास चिपाडे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी संचालक मनोहर वाघेला, आर.पी.टिळेकर, विलास भोंडवे, एम.ए.शेख, सी.एस.सावंत आदिंसह संचालक उपस्थित होते.  संस्थेच्या ९५ वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच अहमदनगर विभागातून अध्यक्षपदापर्यंत पोहचणारे पहिलेच संचालक ठरले. या संस्थेचे भारतातील १३ राज्यामध्ये कार्यक्षेत्र आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा, केरळ, अंदमान-निकोबार व इतर.

अभिषेक चिपाडे यांनी गेले ३०-३२ वर्षांपासून एम.ई.स. एम्प्लॉयीस युनियन पुणे, वर्क्स कमिटी, जे.सी.एम च्या विविध पदावर प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सामाजिक कामामध्ये नेहमीच सहभाग असतो.

सर्व्हिसमध्ये अ.नगर, पुणे, गुजरात, राजस्थान, या ठिकाणी काम करत असताना, कामगारांचे प्रश्‍न विविध पातळ्यांवर घेऊन सोडवणूक केली. त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. गेले 3 वर्षांपासून या संस्थेमध्ये संचालक तसेच मागील वर्षी उपाध्यक्षपदी काम केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विद्यार्थ्यांनी शेअर बाजाराच्या संधी ओळखाव्यात

 प्रा.डॉ.गणेश मांगडे : अहमदनगर कॉलेजमध्ये शेअर बाजारातील व्यवहारवर ऑनलाईन व्याख्यान 

   वेब टीम नगर : अहमदनगर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागामध्ये नुकतेच शेअर बाजारातील व्यवहार व आर्थिक विकास: मुलभूत संकल्पना या विषयावर डॉ.गणेश मांगडे यांचे गुगल मीटवर व्याख्यान  झाले. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होण्यासाठी शेअर बाजाराची ओळख व्हावी या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन अर्थशास्त्र विभागाच्या नियोजन मंचाच्या वतीने करण्यात आले होते. 

यावेळी बोलतांना डॉ.गणेश मांगडे यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक वाढली असता देशातील उत्पादनात आणि रोजगारामध्ये वाढ होते.या सर्वांचा एकत्रितरीत्या परिणामी आर्थिक विकासाला चालना मिळण्यास होतो.त्याचबरोबर, सरकारचे अर्थसंकल्पीय धोरण, मौद्रिक धोरण यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सरकारी धोरणांचा आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशातील विविध राजकीय, सामाजिक घडामोडींचा आणि विदेशी गुंतवणुकीचा परिणाम शेअर बाजारावर होतो, असे सांगून  विद्यार्थ्यांना शेअर बाजाराची ओळख करून देत त्यासंबंधीच्या असंख्य संधींची माहिती दिली.जेणे करून भविष्यात विद्यार्थ्यांना करिअर निवडताना समस्या येणार नाहीत.या संदर्भात विचार व्यक्त करताना त्यांनी भारतीय शेअर बाजार संबंधी प्राथमिक माहिती दिली.नव्याने या क्षेत्रात गुंतवणूक करीत असता कोणती काळजी घेतली पाहिजे?,सेन्सेक्स म्हणजे काय?, अल्पकाळातील आणि दीर्घकालीन शेअर खरेदी-विक्री,इंट्रा डे खरेदी-विक्री,कंपन्याची प्रोफाईल कशी पहायची?, कोणत्या कंपन्या भविष्यात चांगली कामगिरी करू शकतात, कोणत्या कंपन्याच्या शेअर खरेदीला प्राधान्य द्यावे? याबाबत माहिती देऊन शेअर बाजार व आर्थिक विकास या मधील सहसंबध स्पष्ट केला.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे.बार्नबस यांनी शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ पराग कदम यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ विशाल करपे, राजेंद्र घवाळे, एन.एन .एस चे कार्यक्रम अधिकार अशोक घोरपडे  हे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ माधव शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अनारसे वैभव याने करून दिला तर आभार डॉ भागवत परकाळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयासोबत सर्व वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना काळात नाभिकांच्या आत्महत्या शासनाने १० लाख मदत द्यावी 

बारा बलुतेदार संघटनेच्यावतीने आमदारांना निवेदन

 वेब टीम  नगर : कोरोना काळात ज्या नाभिक सलून व्यवसायिकांच्या आत्महत्या झाल्या, त्यांच्या परिवाराला राज्य शासनाने १० लाख रुपये मदत द्यावी, यासह बारा बलुतेदार आर्थिक महामंडळाची स्थापना करुन ५०० कोटींचा निधी मिळावा, समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा आदि७ मागण्या राज्य सरकारने मंजूर कराव्यात या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष व बारा बलुतेदार महासंघाचे नगर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली गायकवाड यांनी  आ.अरुणकाका जगताप यांना दिले. गायकवाड यांच्या समवेत सर्वश्री राजेंद्र पडोळे, अनिल इवळे, शाम औटी, बाबूराव दळवी, जलिंदर बोरुडे, सिताराम शिंदे, स्वप्नील नांदूरकर, मनोज खोडे, नंदकुमार आहिरे, संदिप वाघमारे, बबन कुसाळकर, मल्हारी गिते, संदिप घुले, जतीकार शेलार, संजय सैंदर, गोरख ताकपेरे, राहुल महामुने, प्रमोद गुरव, बापू इंगळे, संजय औटी यांच्यसह बारा बलुतेदार महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा मनिषा गुरव आदि उपस्थित होते.

या निवेदनातील प्रलंबित मागण्याबाबत आपण आमदार या नात्याने सभागृहात प्रश्‍न उपस्थित करुन पाठपुरावा करावा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस करावी, अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच आमदारांना संघटनेच्यावतीने पदाधिकार्‍यांनी त्या-त्या ठिकाणी निवेदन दिले आहेत.

 निवेदनातील प्रलंबित मागण्या - बारा बलुतेदारांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, त्यास दरवर्षी पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा. कोरोना काळात आत्महत्याग्रस्त नाभिक समाज बांधवांस दहा लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. 26 मार्च 1979 च्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्राप्रमाणे नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी. प्रतापगडावर शुरवीर जिवबा महाले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे व त्यासाठी निधीची तरतुद उपलब्ध करुन द्यावी. स्वातंत्र्य लढ्यातील झुंजार क्रांतीवीर विरभाई कोतवाल यांच्या नावाने बारा बलुतेदारसाठी सबलीकरण योजना राबवावी.  रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करावी आणि नाभिक समाजाच्या सलून कारागिरास दरमहा रुपये १५ हजार निवृत्ती वेतन लागू करावी या आहेत.

 आपण या प्रश्‍नांचा पाठपुरावा करु, असे आश्‍वासन आ.अरुण जगताप यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाने शहराचे आमदार संग्राम जगताप यांनाही निवेदनाची प्रत दिली आहे. त्यांनाही या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करु, असे आश्‍वासन दिले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाजारपेठेतील अतिक्रमणे त्वरित काढा, अन्यथा बाजारपेठेच उपोषण

हिंदूराष्ट्र सेनेचा मनापास इशारा

वेब टीम नगर : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली, सारडा गल्ली भागातील परिसरामध्ये अनधिकृतपणे अतिक्रमण करुन शेकडो लोकांनी रस्त्यावरच वेगवेगळे व्यवसाय सुरु केले आहेत. या अतिक्रमनांमुळे बाजारपेठेतून चालणेही अशक्य झाले आहे. महिलांची छेडछाड, मंगळसूत्रांची चोरी, वाहतुकीची कोंडी असे अनेक प्रकार सत्यात्याने होत आहेत. महापालिकेचे अधिकारी थातूरमातुर तात्पुरती कारवाई करत असल्याने काढलेले अतिक्रमणे काही वेळातच पुन्हा त्याच जागेवर होतात. शहरात असे वर्षानुवर्ष चालू आहे. आता महापालिकेने बाजारपेठेतील अतिक्रमणे कायमची काढण्याची ठोस कारवाई पुढील पाच दिवसात करावी, अन्यथा हिंदूराष्ट्र सेना तीव्र आंदोलन करत बाजारपेठेतच उपोषणास करेल. त्यानंतर उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेस सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने मनापा प्रशासनास देण्यात आला.

हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने बाजारपेठेतील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेनेचे शहर प्रमुख घन:श्याम बोडखे यांनी मनापा उपयुक्त सुनील पवार यांना नीवेदन दिले. यावेळी उपायुक्त सुनील पवार यांनी योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, बाजार पेठेत अतिक्रमण करणारे व्यावसाईक हे सर्व व्यवसाय महापालिकेला एकही रुपयाचा कर न देता राजरोसपणे करत आहेत. महापालिकेकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या प्रमुखांनी अतिक्रमण हटविण्याच्या वल्गना वेळोवेळी केल्या आहेत. मात्र आजतागायत कोठेही आवश्यक कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच या सर्व अतिक्रमण धारकांपैकी बऱ्याच अतिक्रमित व्यवसायीकांकडे स्वत:चे ओळखपत्र देखील नसून हे अतिक्रमण धारक नेमके कोण आहेत व कोठुन आले आहेत व यांना पोसणारा पोशिंदा कोण आहे? हा सुध्दा संशोधनाचा भाग आहे.

आजपर्यंतचा इतिहास पाहता तुमच्याही लक्षात येईल की, या अतिक्रमण धारकांमुळे होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेक वेळा बाजारपेठेत चोऱ्या, महिलांची छेडछाड, महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडणे असे प्रकार राजरोसपणे होत आहेत. या सर्व घटनांच्या लेखी तक्रारी नागरिकांनी संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आहेत. या सर्व तक्रारी दाखल झाल्यानंतर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश ईथापे यांनी दिनांक १९/११/२०१८ रोजी वर्तमानपत्रात इथुन पुढे अतिक्रमण केल्यास अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल असा ईशारा दिला होता. त्या ईशाऱ्याला सुध्दा केराची टोपली दाखवुन अतिक्रमण धारक महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चुन त्याच जागेवर उभे आहेत व अतिक्रमण विभाग फक्त आश्वासन देण्यातच धन्यता मानत आहे.

महानगरपालिकेला सर्वाधिक 'कर' देणारा भाग हा सदर व्यापारी पेठ आहे. व्यापार पेठ जगली तरच शहर आणि महापालिका जगणार आहे. महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 'वेतन' व्यापारी पेठेतून येणाऱ्या 'करा' मधूनच होतात ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

हिंदुराष्ट्र सेनेच्या माध्यमातुन आम्ही वेळोवेळी गेली चार वर्षापासून सदर गोष्टीचा पाठपुरावा महापालिकेकडे केला आहे. मात्र आजतागायत कुठलीही कारवाई महानगरपालिका प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे पुढील पाच दिवसात महानगरपालिकेच्या यंत्रणेने सर्व अनधिकृत अतिक्रमण व अतिक्रमण धारक यांना कायमस्वरुपी हटवावे अन्यथा कुठलेही स्मरणपत्र व पुर्वकल्पना न देता हिंदुराष्ट्र सेनेतर्फे बाजारपेठेतच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणास बसणार असून त्यानंतर उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेस सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.

यावेळी निवेदनावर सागर ठोंबरे, परेश खराडे, सागर ढूमणे, महेश निकम, रुद्रेश अंबाडे, विनोद निस्ताने, सचिन पळशीकर, केशव मोकाटे, सागर डोंगरे, सनी परदेशी, स्वनिल लहरे, सुरज गोंधळी, विनोद अनेचा आदींच्या सह्या आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रविवारी मोफत स्त्रीरोग व अस्थीरोग तपासणी शिबिराचे आयोजन

केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलच्या वतीने  शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन

वेब टीम नगर : शहरातील किंग रोड, रामचंद्र खुंट येथील केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठी मोफत स्त्रीरोग व अस्थीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या शिबीराचे उद्घाटन होणार असून, या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.सईद शेख, अस्थिरोग तज्ञ डॉ. जाहीद शेख, स्त्रीरोग प्रसुती तज्ञ डॉ. मारिया शेख, स्त्रीरोग वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. कुदरत शेख यांनी केले आहे.

हे शिबीर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरात गरोदर स्त्रियांची तपासणी, वंध्यत्व निवारण, स्त्री रोग निदान व उपचार, वयात येतानाच्या तक्रारींवर मार्गदर्शन, विवाहपूर्व समुपदेशन, प्रसूतिपूर्व प्रसुतीपश्‍चात तपासणी, वेदनारहित प्रसूती, वारंवार गर्भपात होणे निदान व उपचार, कुटुंबनियोजन सल्ला व मार्गदर्शन, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणे, तसेच अस्थिरोगाशी संबंधीत मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, संधिवात, सर्व प्रकारचे जुळून आलेले फ्रॅक्चर, फ्रोजन, सांधे निखळणे आदी संदर्भात तपासणी करुन त्यावर उपचार करण्यात येणार आहे. या शिबिरात आवश्यक असणार्‍या तपासण्या व ऑपरेशन सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, (०२४१) २९५००६३व ९४२२२३२२७६ या नंबरवर नांव नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच रुग्णांनी तपासणीला येताना जुने रिपोर्ट घेऊन येणे आवश्यक आहे.


Post a Comment

0 Comments