मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना ,आरोग्य आहार

  मूलमंत्र आरोग्याचा 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
वीरभद्रासन -२

पद्धती :

१) ताडासनात उभे रहा दीर्घ श्वास घ्या आणि उडी मारून पावले दोन बाजूंना चार ते साडेचार फूट अंतरावर ठेवा हात खांद्याच्या रेषेत दोन बाजूंना लांब पसरा तळ हात जमिनीकडे वळवा. 

२) उजवे पाऊल ९० अंशांनी उजवीकडे वळवा द्यावे पाऊल जरासे उजवीकडे वळवा डावा पाय ताठ  आणि गुडघ्यात घट्ट आवळलेला असु द्या.  डाव्या  पायाच्या गुडघ्या मागील स्नायूंना ताण द्या.  

३)श्वास सोडा आणि उजवा गुडघा अश्या तर्हेने वाकवा की त्यामुळे उजवी मांडी जमिनीशी समांतर होईल आणि पायाची नडगी  जमिनीशी  काटकोनात राहील त्यामुळे उजवी मांडी व उजवी पोटरी एकमेकींशी काटकोन करतील. वाकवलेला गुडघा घोट्याच्या पुढे न जाता टाचेच्या सरळ  रेषेत असावयास पाहिजे. 

४) दोन व्यक्ती दोन बाजूंनी तुमचे हात जणू खेचत आहेत अशा तऱ्हेने हातांना उजवीकडे व डावीकडे ताण द्या. 

५)चेहरा उजवीकडे वळवा आणि उजव्या तळहातावर दृष्टी वळवा डाव्या पायाचे मागचे  स्नायू पूर्णपणे ताणा पायाच्या मागची बाजू ,पाठीचा छाती मागचा भाग एका  रेषेत असली पाहिजे. 

६) या स्थितीत २० सेकंद ते अर्धा मिनिट श्वसन करत रहा.  

७) डावे   पाऊल ९० अंशांनी   डावीकडे वळवा उजवे पाऊल थोडसे डावीकडे वळवा आणि डावा गुडघा या स्थितीत उलट्या म्हणजे डाव्या बाजूने करा. 

८) श्वास घ्या, श्वास सोडा आणि पुढे उडी  मारून ताडासनात या. 

परिणाम : या आसनामुळे पायांच्या स्नायुंना सौष्ठव आणि सशक्तता   लाभते पोटऱ्या आणि मांड्या यांच्या स्नायूंमध्ये येणारे पेटके कमी होतात पाय आणि पाठीचे स्नायू यामध्ये लवचिकपणा येतो आणि अवयवांना सुदृढता येते उभ्याने करावयाच्या आसनांवर प्रभुत्व मिळवले म्हणजे अभ्यासाची पुढे वाकावयाची आसने  करण्याची पूर्वतयारी होते नंतर ती आसने  सुकरतेने आत्मसात करता येतात. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
पेसरट्टु 

साहित्य : २ वाट्या रात्रभर भिजवलेली मुगाची डाळ, ४ मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि थोडे मीठ एकत्र वाटून, २ टीस्पून खसखस व नारळाचा चव एकत्र वाटून,चवीनुसार मीठ , तेल. 

कृती : रात्रभर भिजवलेली मुगाची डाळ वाटून घ्यावी व त्यात चवीपुरते मीठ घालावे व तासभर बाजूला ठेवावे. 

एका तासानंतर तव्यावर मिठाचे पाणी मारून तव तयार करून त्यावर १ डावभर पीठ घालून डोसा तवाभर पसरून घ्यावा. 

तव्याच्या बाजूने डोसा सुटू लागल्यावर त्यावर चमचाभर तेल सोडून त्यावर वाटलेली मिरची, कोथिंबीर, खसखस, खोबऱ्याचे वाटलेले मिश्रण पसरून डोसा गुंडाळी करून काढावा. 

टीप :  डोसा कुरकुरीत व्हायला हवे असतील तर वाटलेल्या डाळीत १ टेबलस्पून बारीक रवा घालावा.    


Post a Comment

0 Comments