नगरटुडे बुलेटीन 23-01-2021

 नगरटुडे  बुलेटीन 23-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

‘व्यसन’ आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्याही घातक 

 डॉ.सुदर्शन गोरे : दंतरोग तपासणी, व्याख्यान : सकल नाभिक समाजाच्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

    वेब टीम  नगर : तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणारे दर सेकंदाला एक मृत्यू असे प्रमाण आपल्या देशात असून, या व्यसनाधिन्यांचे आयुष्य २४ वर्षांनी कमी होते. कर्करोगसारखे आजाराने त्रस्त लोकांत तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन करणारे बहुसंख्य आहेत. देशात अलिकडे एका पाहणीत ३० हजार कोटी रुपये या रुग्णांचे खर्च झाल्याचा अहवाल प्राप्त आहे. तंबाखूतील निकोटीन द्रव्य हे अत्यंत घातक असे आहे तर त्यातील डोकायत द्रव्य व्यसनाधिनांवर अनिष्ट परिणाम करणारे असल्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब या सारख्या विकाराने अनेक त्रस्त आहेत. व्यसनाधिनांकडे समाजाचा पाहण्याच्या दृष्टीकोन नकारात्मक असून, व्यसनावर मोठा आर्थिक खर्च होतो ते वेगळे नुकसान आपण करतोय. यासर्व बाबींचा विचार करुन तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसनापासून दूर राहून आपले आणि आपल्या परिवाराचे जीवन सुरक्षित केले पाहिजे, असे आवाहन प्रख्यात दंतरोगतज्ञ डॉ.सुदर्शन गोरे यांनी केले.

     येथील डॉ.गोरे डेन्टल हॉस्पिटल आणि सकल नाभिक समाज अ.नगर आयोजित व ओबीसी व सलून शहराध्यक्ष आणि नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दंत रोग तपासणी शिबीर आणि व्यसनमुक्ताता मार्गदर्शन कार्यक्रम पानसरे गल्लीतील संत सेना महाराज मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आला, यावेळी डॉ.गोरे बोलत होते. ते पुढे बोलतांना डॉ.गोरे म्हणाले, संत सेना महाराज आणि संत सावता महाराज यांच्यासह संत महंतांनी आपल्या कृतीतून मानवसेवेची शिकवण दिली आहे. या दोन संतांनी आपल्या व्यवसाय, बोलीतून रचलेले अभंग लोकप्रिय आहे. या शिकवणुकीचे पालन करण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे दंत रोग तपासणी शिबीर आहे. यामुळे समाजात आरोग्याचा जागर करीत असे अनेक आरोग्याचे प्रश्‍न आणि त्यावरील उपचार करणारे उपक्रम यापुढे व्हावे, हा संदेश यामुळे देता येईल. सर्व सामान्यांपासून लोकांची आरोग्य तपासणी करण्याच्या प्रयत्नाचा प्रारंभ रक्तदान शिबीर, दंत रोग तपासणी शिबीर आयोजित करुन एक चांगला वेगळा पायंडा श्री. गायकवाड आणि श्री.निकम यांच्या जन्मदिन कार्यक्रमाने सुरु केला आहे तो आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले. अनिल निकम यांचा यावेळी सत्कार करुन अनेकांनी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देतांना श्री.निकम म्हणाले, समाजकारणात काम करतांना मिळणारा आनंद आणि सेवाभावी वृत्ती जोपासनाची दिक्षा मिळाल्याने त्याचे पालन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे, आपल्या शुभेच्छा आणि पाठबळ, असे कायम असावे.

     ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चाचे नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे, जालिंदर बोरुडे, बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गायकवाड, खान्देश युवा मंचचे अध्यक्ष रामदास आहेर, मठ-मंदिर समितीचे हरिभाऊ डोळसे, नाभिक जिल्हा कार्याध्यक्ष विशाल सैंदाणे, शहराध्यक्ष श्रीपाद वाघमारे, साई संघर्ष प्रतिष्ठानचे योगेश पिंपळे, जीवन सोन्नीस, अनिल बापू औटी आदिंची समयोचित भाषणे झाली.

     याप्रसंगी  भुजबळ यांचा ओबीसी शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबीरात ४०  रुग्णांची तपासणी करण्यात आली. सर्वश्री रमेश बिडवे, अशोक औटी, नंदकुमार सोन्नीस, बाबूराव दळवी, अनिल इवळे, बाबूराव ताकपेरे, श्रीरंग गायकवाड, सर्वेदा डिक्कर, शाम औटी, सुनिल आहेर, राजेंद्र सोन्नीस, कैलास गांगुर्डे, शरद आहेर, युवराज राऊत, संतोष जाधव, ललित आहिरे, सचिन खंडागळे, सौरभ सैंदाणे, प्रविण वाघमारे, ज्ञानेश्‍वर निकम, संदिप वाघमारे आदि उपस्थित होते. शेवटी अनिल निकम यांनी आभार मानले.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्थेचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवणार

अ‍ॅड. कारभारी गवळी : शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवून त्यांचा सर्वांगीण  विकास साधण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन ,भारतीय जनसंसदचा पुढाकार

वेब टीम नगर : शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवून त्यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्था आनण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदने पुढाकार घेतला असून, अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्थेचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

देशातील शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी शेतकरी संरक्षण कायद्याची गरज असताना, त्यांच्यात बदल घडविण्यासाठी अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ग्रामीण भागात रोजगार नसल्याने शहरात रोजगार मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने युवकांचे लोंढे येतात. ग्रामीण भागात अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार झाल्यास युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. ग्रामीण भागात मुलींना पदवी पर्यंतचे शिक्षण स्थानिक पातळीवर मिळण्यासाठी मदत होणार आहे. खेड्यांना शहरीकरणाचे रुप येणार असून, शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंद्याची साखळी देखील निर्माण होणार आहे. ग्रामीण भागात अशिक्षितपणा नाहीसा होऊन युवकांना रोजगार मिळाल्यास गावांचा झपाट्याने विकास होणार आहे. ईस्त्रायल, अमेरिका सारख्या राष्ट्रांमध्ये असलेल्या शेतकर्‍यांप्रमाणे भारतातील शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारणार आहे. रुर्बन अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना शेतीचे आधुनिक तंत्र अवगत करुन क्रांतीकारक पध्दतीने बदल घडविण्यासाठी संघटनेचा पुढाकार राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुबळे असल्याने आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांना शेतकरी संरक्षण कायद्याशिवाय पर्याय नसून, अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्था त्यांचे जीवनमान व राहणीमान बदलणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा हा प्रयोग असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्थेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शूर आम्ही सरदार... हेमंत दंडवते यांची अशीही एक कला

    वेब टीम नगर : अहमदनगर येथील कलाकार हेमंत दंडवते हे वेगवेगळ्या माध्यमातून आपली कलाकृती साकारण्यात प्रसिद्ध आहे.  कला विश्‍व प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष हेमंत दंडवते यांनी मराठी चित्रपट मराठा तितुका मेळवावा’ (१९६४) मधील लौकिक देशभक्तीपर  गीत ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ या मुळ गाण्यातील हरकती जोपासून ट्रॅकवर आपल्या सुरेल आवाजात व उत्तम अभिनयातून सिनेमॅटोग्राफी कला सादर केली आहे. यासाठी त्यांनी अतिशय मेहनत घेऊन गाण्याच्या छायाचित्रणासाठी स्वतःच दिग्दर्शन केले आहे, विशेष म्हणजे कृष्णधवल मध्येच हे गाणे छायाचित्र केले आहे, त्यामुळे छायांकन पाहण्यास एक वेगळाच आनंद मिळेल.

     २६ जानेवारी गणराज्य दिनी हे गाणे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यामांंवर प्रकाशित होणार आहे, तरी सर्व गानप्रियकरांनी याचा आनंद घ्यावा, असे दंडवते यांनी आवाहन केले आहे.

     गाण्याचे छायाचित्रण / व्हिडिओ संपादक जीत मोशन ग्राफिक्स, ध्वनी एमके स्टुडिओ यांनी तर वेशभूषा उदय ड्रेसवाला, मेकअप नेहा दंडवते यांनी केले तर आहे तर सहकलाकार श्रीमती विद्या तन्वर, सृष्टी कुलकर्णी यांनी काम केले. तसेच आंतरराष्ट्रीय सुफी गायक पवन नाईक, वाजीद खान, कुबेर ग्रुप, शांती ऑडीओ, सुनील महाजन, अजित गुंदेचा, प्रशांत नेटके, सुफी सय्यद, ज्ञानेश्‍वर काळे यांचे सहकार्य लाभले.

      हेमंत दंडवते हे दिव्यांग मुलांच्या समाज कार्यातही अग्रेसर असतात, कला क्षेत्रात त्यांचे आत्तापर्यंत लिम्का बुक व इतर असे एकूण सहा विश्‍वविक्रमात नोंद झाली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तपोवन रोड एक महिन्यांत सुरु न झाल्यास अधिकार्‍यांना काळे फासणार

भा.क.पक्षाचे सेक्रेटरी कॉ.सुधीर टोकेकर यांचा इशारा

    वेब टीम  नगर : सन 2018 ग्रामसडक योजना अंतर्गत तपोवन रोड मंजुर झाला. त्यानंतर काही रोड झाला तर काही रोड झालेला नाही. अनेक चर्चा, वेगवेगळ्या पक्षाने केलेले आंदोलन, माहिती अधिकार वापरुन माहिती घेऊन या संदर्भात वर्तमान पत्रात बातम्या आल्या. सतत हा रस्ता चर्चेत राहिला मात्र महाल ते औरंगाबाद रोड पर्यंतचा रोड आहे. तसाच खराब आहे. महालापासून ढवण वस्तीपर्यंत तर खडीच खडी आहे. धुराळा आहे. गाड्या चालविता येत नाही. गाड्या नादुरुस्त व पंक्चर होत आहेत.  मात्र तरी पण या भागातील नागरिक शांत आहेत, मात्र आता हा उद्रेक झाला आहे. हा रोड एक महिन्यात न झाल्यास त्यानंतर कधीही संबंधित अधिकार्‍यांना काळे फासल्याशिवाय गंत्यतर नाही. शासन रोड मंजुर करते, पैसा देते मात्र ही यंत्रणा हे काम करत नाही, ही तर लोकशाहीची थट्टा आहे. तेव्हा एक तर काळे फासण्यास भाग पाडू नका, नाही तर तुमच्या रेल्वे स्टेशन जवळील कार्यालयासमोर उपोषणाला बसतील असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी कॉ.सुधीर टोकेकर, विडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष कॉ.भारती न्यालपेल्ली, अशितोष टोकेकर, नरेंद्र पासकंटी यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे इशारा दिला आहे.

     मी दोन वेळेस माहिती अधिकारात माहिती मागितली मात्र त्यांचाही उपयेाग होत नाही. नुकतीच एक महिन्यापूर्वी आरटीआय खाली अर्ज केला त्यास उत्तर दिले ‘रोडसाठी तीन महिने वाढवून मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.’ म्हणजेच मे महिन्यांपर्यंतही रोड होत नाही व नंतर पावसाळा म्हणजेच आम्हा नागरिकांवर अन्यायच आहे. आ. संग्राम जगताप यांनाही नागरिकांनी फोनवर या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. शिवसेना व वकिल कारभारी गवळी यांनीही आंदोलने केली. मात्र या ग्रामसडक खात्याला जाग येत नाही. मुख्य व उपअभियंते यांना नागरिकांचा त्रास माहिती नाही, मी स्वत: या ठिकाणी राहतो. कंबरेचे पार खोबरे झाले आहे, अनेक वेळा गाड्या पंक्चर झाले आहेत. छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तरी एक महिन्यात हा रस्ता व्हावा, अशी अपेक्षा आहे.  या संदर्भात खा.सुजय विखे यांनाही याची प्रत देऊन, मुख्यमंत्री यांनाही शिष्टमंडळ भेटणार आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विद्यार्थ्यांनी यूट्यूब वरील व्हीडीयोंचे अनुकरण टाळावे

 नाट्यकर्मी श्याम शिंदे : रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या एकपात्री नाट्य प्रयोग स्पर्धेस मोठा प्रतिसाद

वेब टीम नगर : व्यक्तिमत्व प्रभावित करण्यासाठी नाट्य स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सतत भाग घ्यावा. एकपात्री प्रयोग हा मोठा कलाकर होण्याचा पाया आहे. त्यामुळे एकपात्री प्रयोग सादरीकरण करतांना विद्यार्थ्यांनी कायम नवे वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा. यूट्यूब वरील व्हीडीयोंचे अनुकरण वियार्थ्यानी टाळावे. रोटरी क्लब प्रियदर्शनी या संस्थेने सामाजिक उपक्रम राबवतांना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बदलण्याऱ्या नाट्य स्पर्धांचे आयोजन करून मुलांना नवे चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे प्रतिपादन नाट्यकर्मी श्याम शिंदे यांनी केले.

          रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या एकपात्री नाट्य प्रयोग स्पर्धेच्या पारितोषिक प्रसंगी नाट्यकर्मी शिंदे बोलत होते. अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मेडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेस विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख छाया फिरोदिया, रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या अध्यक्षा गीता गिल्डा, सचिव देविका रेळे आदींसह क्लबच्या महिला सदस्या, सहभगी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण श्याम शिंदे, जेष्ठ रंगकर्मी व क्लबच्या सदस्य उषा कोलते, अभिनेत्री अंजना पंडित व सुनील तरटे यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आले.

          प्रास्ताविकात गीता गिल्डा म्हणाल्या, रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या वतीने वर्षभर सामाजिक व गरजूंना मदतीचे उपक्रम राबवत आहे. नगरमध्ये करोनाचा पादुर्भाव ज्यावेळी सर्वात जास्त होता त्यावेळी रोटरी क्लबने चालवलेल्या मोफत कोविड उपचार सेंटर साठी प्रियदर्शनी क्लबने कम्युनिटी किचन चालवले होते. आता करोनाचा प्रदुर्भाव कमी होत आहे. गेल्या १० महिन्यांपासून घरात बसलेल्या विद्यार्थांसाठी नवीन चांगला उपक्रम राबण्यासाठी या एकपात्री नाट्य स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिव देविका रेळे यांनी केले. यास्मिन जालनावाला यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले. यावेळी प्रियदर्शनीच्या सदस्य प्रतिभा धूत, दीपा चंदे, शशी झंवर, जयमाला भट्टड, मीनल बोरा, कुंदा हबळे आदी उपस्थित होत्या.

          स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ५ वी ते ८ वी गट :- प्रथम मनुजा देशमुख, द्वितीय ईश्वरी खिलारी, स्मिता कसोटे, उत्तेजनार्थ कृष्णा बेल्हेकर, कार्तिकी लोंढे.

९ वी ते १२ वी गट :- समृद्धी वैकर, दिव्या काकडे, शंतनू रेखी. उत्तेजार्थ शिवतेज शेटे, सुप्रिया मौर्य.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल पै.नाना डोंगरे यांचा जिल्हा तालिम संघाच्या वतीने सत्कार

वेब टीम नगर : निमगाव वाघा ग्रामपंचायत निवडणुकीत पै. नाना डोंगरे मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, शहर अध्यक्ष नामदेव तात्या लंगोटे, माजी नगरसेवक सुनिल भिंगारदिवे, कुमार सुसरे, प्रशांत मुथा, शकिल शेख, अक्षय औसरकर आदी उपस्थित होते.

पै.वैभव लांडगे म्हणाले की, लाल मातीत तयार झालेले मल्ल राजकीय आखाडे गाजवत आहे. पै. नाना डोंगरे यांचे सामाजिक व कुस्ती क्षेत्रात मोठे योगदान असून, गावाच्या विकासासाठी ते विश्‍वासास पात्र ठरणार आहे. ग्रामस्थांनी सर्वसामान्य व्यक्तीला निवडून काम करण्याची संधी दिली असून, हा जनशक्तीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. पै.नाना डोंगरे म्हणाले की, गावाच्या सामाजिक कार्यात सक्रीय राहून राजकारणात आलो असलो तरी, सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे. समाजसेवा हा एकमेव उद्दीष्ट समोर ठेऊन ग्रामपंचायतमध्ये कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहर जिल्हा काँग्रेसची अर्नब गोस्वामीला अटक करण्याची मागणी

राज्यभरात आंदोलन ; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसची निदर्शने

वेब टीम नगर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असणारी माहिती अर्नब गोस्वामी याला मिळाली कशी याची तात्काळ चौकशी होण्याच्या दृष्टीने अटक करण्यात यावी, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. 

राज्यभरात याबाबत काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, निदर्शने करण्यात आली. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने तसे लेखी निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. 

यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष निजामभाई जहागीरदार, खलील सय्यद, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, फारुखभाई शेख, एनएसयुआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अज्जूभाई शेख, सरचिटणीस नलिनीताई गायकवाड, सहसचिव नीता बर्वे, सेवादल अध्यक्ष कौसर खान, क्रीडा अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, जरीना पठाण, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सुजित जगताप, युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, अनिसभाई चुडीवाल, सचिव मुबीन शेख, अन्वर सय्यद, सहसचिव ॲड.सुरेश सोरटे, शिक्षक काँग्रेसचे प्रसाद शिंदे, अजय मिसाळ, शरीफ सय्यद, महेश लोंढे आदी उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे की, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीला घटनेच्या तीन दिवस आधीच होती. असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामी कडे कशी आली ? 

देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली ? ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी कशी काय मिळाली ? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का ? असे अनेक प्रश्न निवेदनामध्ये उपस्थित करण्यात आले आहेत. 

शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले की, या व्हाट्सअप चॅटवरून स्पष्ट दिसते की अर्णब गोस्वामी याचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध असून त्यांनी नियमांच्या पलीकडे जाऊन मदत केली असल्याचे स्पष्ट आहे. त्यासोबतच पुलवामा हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे, तो निवडणूक जिंकेल, असा उल्लेखही यामध्ये आहे. 

त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का ? असा सवाल उपस्थित करीत, गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. 

या सर्व प्रकरणात अर्नब गोस्वामी एकटाच दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथेचा भंग करून गोस्वामी याला व्यावसायिक फायदा करून देण्याचे, तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा सुद्धा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा असून या प्रकरणात गोस्वामी याला मदत करणाऱ्या उच्चपदस्थ यांच्यावर देखील तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जमाअत ए इस्लामी हिंदच्या 'अंधारातून प्रकाशाकडे 'पुस्तक प्रकाशनाने राज्यव्यापी अभियानाची सुरुवात

वेब टीम नगर : जमाअत ए इस्लामी हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, कासिमखानी मशिद येथे अंधारातून प्रकाशाकडे या पुस्तकाचे प्रकाशन करून राज्यव्यापी अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचे प्रारंभ जमाअत ए इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रिजवानूरर्हमान खान यांच्या हस्ते झाले. यावेळी नितीन थोरात, रतन भोसले, शहर व जिल्हाध्यक्ष अख्तर सहाब आदींसह जमाअत ए इस्लामी हिंदचे पदाधिकारी उपस्थित होते.  

अंधारातून प्रकाशाकडे हे अभियान दि.२२ ते ३१ जानेवारी पर्यंत चालणार असून, या पुस्तकाच्या माध्यमातून जागृती केली जाणार आहे. हे अभियान शहरापासून तर छोट्या खेड्यातील वस्तीपर्यंत चालवले जाणार आहे. सध्या समाजात व मानवी जीवनात पसरलेला अंधार कसा दूर करता येईल? आणि उज्वल वर्तमान व भविष्यासाठी अखंड प्रकाश कसा तेजोमय राहील यासंदर्भात या अभियानाच्या माध्यमातून जागृती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रिजवानूरर्हमान खान म्हणाले की, समाजामध्ये परिस्थिती बिकट होत चालली आहे. मनुष्य एखाद्या प्राण्यांप्रमाणे जीवन व्यतीत करीत आहे. यामुळे समाजातील वातावरण बिघडले आहे. कोरोना महामारीत मनुष्य हा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुरावला गेला आहे. जमात-ए-इस्लामी हिंदच्या माध्यमातून हे अभियान राबवून नागरिकांना येणार्‍या अडचणी समजवून घेतल्या जाणार आहेत. मनुष्य ईश्‍वराला विसरुन आपले कार्य चालवत आहे. त्याचे व ईश्‍वराचे संबंध संपले असून, मनुष्य व मनुष्य निर्माता यामध्ये संबंध दृढ व्हावे या हेतूने हे अभियान चालविण्यात येणार आहे. जीवनामध्ये मनुष्याने धर्माप्रमाणे चांगले कार्य केल्यास अनेक अडचणीचे निवारण होण्यास मदत होणार आहे. अंधारातून प्रकाशाकडे या पुस्तकार कुरानमधील मानवासाठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कासिमखानी मशिद येथे लावण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर अंधारातून प्रकाशाकडे याच्यासह कुरान व ईस्लाम धर्माचे विविध पुस्तक उपलब्ध करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जेसीबीद्वारे मागासवर्गीय कुटुंबीयाचे घर पाडण्याचा प्रयत्न

पोलीस अधिक्षक कार्यालयास निवेदन : गावगुंडांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची घोडके कुटुंबीयांची मागणी

वेब टीम नगर : जेसीबीद्वारे मागासवर्गीय कुटुंबीयाचे घर पाडण्याचा प्रयत्न करुन, जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या गावगुंडांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भागचंद घोडके (रा. सिध्दार्थनगर, ता. श्रीगोंदा) यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले. सदर प्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशन दखल घेत नसल्याने घोडके कुटुंबीयांनी ३१ जानेवारी पासून पोलीस अधिक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

भागचंद घोडके श्रीगोंदा तालुक्यात सिध्दार्थनगर येथे मागील पन्नास वर्षापासून पत्नी, मुले, सुना व नातवंडासोबत राहत आहे. येथील सि.स.नं. २१४४ हा सुमारे ६ गुंठे क्षेत्राचा असून, त्यांनी या जागेत बांधकाम केलेले आहे. या जागेत त्यांचा गाई-गुरांचा गोठा असून, शेती औजारे ठेवली जातात. ११जानेवारी रोजी श्रीगोंदा शहरातील गुंड प्रवृत्तीचा नंदकुमार उर्फ लक्ष्मण बोरुडे, त्याचा मुलगा गणेश बोरुडे व इतर चार ते पाच जणांनी जेसीबी मशीन घेऊन येऊन घर पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप तक्रारदार घोडके यांनी केला आहे.

सदर जागेबाबत श्रीगोंदा न्यायालयात दावा सुरु असून, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देखील याबाबत रिट पिटीशन दाखल करण्यात आलेली आहे. दोन्ही दाव्याचा निकाल न्यायप्रविष्ट असून, सदर आरोपी बेकायदेशीरपणे घर पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ११जानेवारीला सदर आरोपी घर पाडण्यासाठी आले असता त्यांना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बेकायदेशीर कृत्य न करण्याचे सांगितले असता, त्यांनी घोडके व त्यांच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तर जेसीबी चालकाने लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न केला. मागासार्गीय कुटुंबीय असल्याचे सदर आरोपी दमबाजी करुन केंव्हाही जेसीबी मशीन घेऊन येऊन घर पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे संपुर्ण कुटुंबीयांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास गेलो असता, आरोपींच्या दबावाखाली पोलीस तक्रार घेण्यास देखील टाळाटाळ करीत असयाचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी गावगुंड आरोपींवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भागचंद घोडके यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी,सुदृढ आरोग्यासाठी शारीरिक शिक्षण महत्वाचेच

 विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ : फीट इंडियासाठी अतिरिक्त तासिकेबाबत शासन सकारात्मक

वेब टीम नगर : शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते १२ वी इयत्तेसाठी फीट इंडिया अ‍ॅसेसमेंट प्रोग्राम राबविण्यास सुरूवात झाली असून या उपक्रमांतर्गत शाळांची ऑनलाईन नोंदणी चालू आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वर्षभरात दोन वेळा फिटनेस चाचण्या घेण्यात येणार असून चाचणी आधारे प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण ऑनलाईन अपलोड करावयाचे आहेत. सदरील काम हे उपलब्ध शारीरिक शिक्षण तासिकेतच करावयाचे आहे. मुळातच शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकविणे, प्रात्यक्षिक घेणे, क्रीडा स्पर्धेची तयारी करून घेणे, खेळाचा सराव घेणे तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेणे, गुणांकन करणे या करीता उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी असलेल्या  ४, ३व २ तासिका कमी पडत असून त्यामध्ये फीट इंडिया उपक्रमची भर शालेय स्तरावर घालण्यात आल्याने फीट इंडिया उपक्रम यशस्वीतेसाठी वेळापत्रकात दोन वाढीव तासिका प्रचलीत कार्यभारा व्यतिरीक्त देण्यात याव्यात म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती यांचे मागणी वरून बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत फीट इंडिया मुव्हमेंटची प्राप्त परिस्थितीत शालेय स्तरावर असलेली गरज व या उपक्रमासाठी शालेय स्तरावर उपलब्ध तासिकेव्यतिरीक्त जादा तासिकांची आवश्यकता असल्याची मागणी अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी केली. तसेच सध्याचा वेळापत्रकात असलेला कार्यभार, फीट इंडिया अंतर्गत फिटनेसबाबत विद्यार्थ्यांना द्यावयाचे धडे, घ्यावयाच्या चाचण्या, करावयाचे गुणदान, ऑनलाईन गुणांकन भरणे ही कामे उपलब्ध तासिकेत शक्य नसल्याची माहिती शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर व क्रीडा विकास परीषदेचे राज्य सचिव ज्ञानेश काळे यांनी करून दिली. सदरील उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेली तासिकेची गरज लक्षात घेऊन शासन लवकरच या संबंधी निर्णय घेईल असे शालेय शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार व क्रीडा उपसचिव स्वाती नानल यांनी सांगीतले. प्रत्येक भारतीयाला फीट करणारा हा उपक्रम अतिशय चांगला असून, सद्य परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिकारक क्षमता टिकवण्यासाठी व वाढविण्यासाठी शारीरिक शिक्षणाचे महत्व अधोरेखित झाल्याने या उपक्रमास अतिरिक्त तासिका उपलब्ध करून देण्यात याव्यात व त्या संबंधी लवकर निर्णय घेण्यात यावा असे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना निर्देशित केले.

भारतात २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फीट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रमाची घोषणा केली. योगदिवस आणि स्वच्छ भारत अभियान या नंतर सर्वांत मोठा असणारा हा उपक्रम आहे. भारतात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत फीटनेसच्या बाबतीत जागृकता निर्माण करून सुदृढ व बलशाली भारताचे स्वप्न साकारण्यासाठी फीट इंडिया उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात या उपक्रमाअंतर्गत सर्वात मोठा सहभाग हा शालेय विद्यार्थ्यांचा असून या उपक्रमाची यशस्वीता शिक्षकांवर व संबंधित यंत्रणेवर अवलंबून आहे. त्यामुळे या उपक्रमाअंतर्गत वाढीव कार्यभारास तासिकेची गरज असल्याचे शिष्टमंडळाने मांडले. या संदर्भात विभागीय बैठक घेऊन लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन उच्च पदस्थ अधिकारी यांनी उपाध्यक्षांना दिले. विधानभवनात उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बोलावलेल्या या बैठकीस शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण संचलनालय, क्रीडा विभाग, समग्र शिक्षा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेचे उच्च पदस्थ अधिकारी तसेच शारीरिक शिक्षण संघटनेचे शिवदत्त ढवळे, राजेंद्र कोतकर, ज्ञानेश काळे, कला-क्रीडा-कार्यानुभव शिक्षक कृती समितीचे ज्ञानेश भोसले, राजू उलेमाले, नितीन चौधरी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments