शेतकरी आंदोलनात पाचव्या शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकरी आंदोलनात पाचव्या शेतकऱ्याची आत्महत्या 

वेब टीम नवी दिल्ली : जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलक कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर आपला निषेध व्यक्त करत आहेत. या दरम्यान आणखी एका आंदोलकानं 'सुसाईड नोट' लिहीत आपला जीवनप्रवास संपवल्याचं समोर येतंय.

आंदोलकांच्या प्रदर्शन स्थळांपैंकी एक असलेल्या टिकरी सीमेवर विषारी पदार्थाचं सेवन करत या शेतकऱ्यानं प्राण सोडले. विषारी पदार्थ घेतल्याचं लक्षात येताच आंदोलकांकडून या शेतकऱ्याला बुधवारी अँब्युलन्सनं  संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय जय भगवान राणा यांचा विषारी पदार्थाचं सेवन केल्यानंतर मृत्यू झाला आहे. हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील पकासमा गावाचे ते रहिवासी होते. राणा यांनी मंगळवारी टिकरी सीमेवर प्रदर्शनस्थळावरच विषारी पदार्थाचं सेवन केलं होतं.

सुसाईड नोट

'आपण एक छोटे शेतकरी आहोत. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात अनेक शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा केवळ दोन - तीन राज्यांचा मुद्दा आहे. परंतु, संपूर्ण देशातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. दु:खद म्हणजे आता हे केवळ आंदोलन राहिलेलं नाही तर ही मुद्द्यांची लढाई बनलीय' असं जय भगवान राणा यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.



Post a Comment

0 Comments