नगरटुडे बुलेटीन 20-01-2021

 नगरटुडे बुलेटीन 20-01-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बचत गटामुळे महिलांना स्वयंरोजगारा बरोबरच उद्योजक होण्याची संधी 

 कमल गायकवाड  : साई संघर्ष व साई इच्छा बचतगटातील महिलांचा सन्मान

   वेब टीम  नगर : देश व राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. स्त्रीयांनी समाजात काम करतांना स्त्रीत्व जपून आत्मशक्ती वाढविली पाहिजे. स्त्री शक्तीला प्राधान्य देण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून राज्य शासन भक्कमपणे आपल्या पाठीशी आहे. महिलांना स्वयंरोजगारा बरोबरच बचत गटांमुळे उद्योजक होण्याची संधी मिळत आहे. बचत गटांमुळे कर्ज सुविधा सहज उपलब्ध होत असून, यामुळे स्वयंरोजगाराची संधी मिळते. नवीन उद्योग व्यवसायाला चालना मिळते, यामुळे उद्योजक होण्यासाठी महिलांनी पुढे यावे,  असे प्रतिपादन साई संषर्घ बचत गटाच्या सचिव कमल गायकवाड यांनी केले.

     सावेडी उपनगरात साई-संघर्ष व साई इच्छा बचत गटातील महिलांचे चांगले काम होत असल्याने सावित्रींच्या लेकी म्हणून या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला फकीरवाडा जिल्हा बँकेच्या शाखाधिकारी चारुशिला लांडे, जनता सहकारी बँकेचे शाखाधिकारी किरण कुंभारकर उपस्थित होते.

     अध्यक्ष पुष्पा राऊत यांनी प्रास्तविकात साई संघर्ष बचत गटाने केलेल्या कामाचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे चारुलिा लांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिलांमध्ये प्रचंड क्षमता असते. त्यांच्या व्यवसायिक कामांना व गुणांना संधी दिली तर त्या आर्थिकदृष्टया सक्षम होतील, त्यासाठी बँकांनी बचत गटांना वेळेत कर्ज पुरवठा करुन सहकार्य करण्याची भुमिका घ्यावी, असे सांगितले.

     जनता बँकेचे कुंभारकर म्हणाले की, महिला आता सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. बचत गटांच्या माध्यमातून त्या आत्मनिर्भर होतात. जनता बँकेमार्फत सर्व बचत गटांना परवडेल असे कमीत कमी दरात जास्त कर्ज सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. विविध आकर्षक कर्ज योजना बाबत त्यांनी सविस्तर माहिती यावेळी उपस्थित महिलांना दिली.

     बँकेने  काढलेल्या 2021  दिनदर्शिकेचे वाटप यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके व साई संषर्घ सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरात महिलांच्या बचत गटांचे चांगले काम सुरु असल्याने, त्यांचा सन्मान होणे उचित असल्याचे  पिंपळे यांनी सांगितले.  यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी बचत गटातील महिलांना सर्वोतोपरि सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी महिला बचत गटांच्या प्रमुख पुजा येल्ला यांनी सर्व महिलांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन सन्मान केला.

     या सन्मान सोहळ्यास ऐश्‍वर्या भावे, वंदना दडगे, विद्या एकलदेवी, जिजा पालवे, अश्‍विनी पुंड, स्वाती आव्हाड, संगीता ठोकळ, सुनिता ठोकळ, संगीता मेहेत्रे, मंगल आव्हाड, कल्पना खोमणे, कमल कापडे आदिंचा सन्मानचिन्ह प्रशास्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन अश्‍विनी पुंड यांनी केले तर आभार प्रिती धाडगे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवसेनेने नेहमीच महिलांचा उचित सन्मान केला आहे 

 सुरेखा कदम : आशा निंबाळकर यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजया बद्दल सत्कार

   वेब टीम  नगर : शिवसेनेची महिला आघाडी ही नेहमीच कार्यक्षम राहिलेली आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्‍नांबरोबरच नागरिकांचेही प्रश्‍न सोडविले आहेत. त्यामुळे महिला आघाडीचे पदाधिकार्‍यांनीही आपल्या कार्यकर्तुत्वाने विविध निवडणुकीत यश संपादन केले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि महिलांना दिलेल्या संधीमुळे महिलाही राजकारणात यशस्वी होत आहे. या यशस्वी महिलांचा शिवसेनेने नेहमीच उचित सन्मान करुन विविध पदांवरही संधी दिली आहे. आशा निंबाळकर या शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील त्यांच्या विजयाने त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे. या पदाच्या माध्यमातून गावाच्या विकासात मोठे योगदान देतील, असे प्रतिपादन माजी महापौर नगरसेविका सुरेखा कदम यांनी केले.

     शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर या दरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचा शिवसेनेच्यावतीने माजी महापौर सुरेखा कदम व माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, महिला शहराध्यक्षा अरुणा गोयल, संतोष तनपुरे, प्रविण बेद्रे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकविला आहे. जिल्ह्यातही शिवसेनेचे अनेक उमेदवार निवडून आले आहे. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांनी आपल्या धडाकेबाज कार्यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. त्या गावातील प्रश्‍नही सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यांच्या या कामांमुळेच त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाला असल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महापालिकेत छोट्या कामाच्या बीलांची देयके मिळण्यासाठी ठेकेदारांचा उपोषणाचा इशारा

जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन

वेब टीम नगर : महापालिकेत अनेक वर्षापासून थकित असलेल्या छोट्या कामाच्या बीलांची देयके मिळण्यासाठी ठेकेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले. सदर देयके त्वरीत न मिळाल्यास ठेकेदारांनी सोमवार दि.२५ जानेवारी पासून महानगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी एस.बी. भोर, अमृत नागुल, शहानवाज शेख, अमृत वन्नम, विजय सामलेटी आदी ठेकेदार उपस्थित होते.

महानगरपालिकेकडे महापालिकेच्या विविध लेखक शीर्षकांतर्गत शेकडो देयके अनेक वर्षापासून अदा करण्यासाठी प्रलंबित आहेत. त्या मोठ्या रकमेच्या देयकांची रेग्युलर आणि थकीत अशी दोन ज्येष्ठता याद्या आहेत. यातील देयके ज्येष्ठता यादीनुसार अदा केले जात होते. तसेच दोन-तीन वर्षापासून नगरसेवक स्वच्छा निधी या लेखाशिर्षका खालील देयके क्रमवारी प्रमाणे वर्षातून सर्व देयके अदा करून संपवली जातात. परंतु ५०हजार पेक्षा कमी रकमेची देयके जेष्ठता यादी केलेली आहे. परंतु ही छोटी देयके अदा करण्यात आलेली नाहीत. अशी छोटी कामे आपत्तीजनक व अत्यावश्यक परिस्थितीत स्थानिक अडचण निवारण करण्यासाठी करून घेण्यात आलेली आहे. अशी कामे करणारे ठेकेदार हे साधारण परिस्थितीतले आहेत त्यातच सन २०२० हे कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावात गेले. यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. ठेकेदारांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन उरलेले नाही. मुलांच्या शाळेची फी, कर्जाचे देणे, दैनंदिन गरजा व घरखर्च हे चालूच आहे. त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक व मानसिक परिस्थिती बिघडत चालली आहे. चालू वर्षी अहमदनगर महानगरपालिकेची कर वसुली ही उच्चांकी म्हणजे 50 कोटीच्या पुढे झालेली आहे. कर वसुली झाली की देयके अदा करण्याचे आश्‍वासन महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात येते. परंतु दरवर्षी पैसा महापालिकेच्या इतर खर्चापोटी खर्च होऊन ही छोटी देयके तशीच मागे पडत गेली आहेत. डिसेंबर२०२० मध्ये आयुक्त यांना निवेदन देऊन चर्चा झाली असता त्यांनी चालू वर्षाच्या वसुलीतून ही सर्व छोटी देयके व इतर देयके अदा करण्याचे आश्‍वासन दिले होते. तरी देखील छोटी देयके महापालिकेत थकित असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. महापालिकेत अनेक वर्षापासून थकित असलेल्या छोट्या कामाच्या बीलांची देयके त्वरीत मिळण्याची मागणी ठेकेदारांनी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध

समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी

वेब टीम नगर : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची लातूर जिल्ह्यातील मौजे साकोळ येथे विटंबना झाल्याचा लहुजी शक्ती सेना व मातंग समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर या प्रकरणातील समाजकंटक आरोपींना अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी दिले.

मौजे साकोळ, शिरुळ आनंतपाळ (जि. लातूर) येथे नुकतीच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. राष्ट्रीय महापुरुष हे देशाचे धरोवर असून, त्यांचा मान सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महापुरुषांचे पुतळे समाजाला सतत प्रेरणा देत असतात. अशा पध्दतीने एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करणे हे समाजामध्ये द्वेष पसरविण्यासारखे असून, हे देशद्रोही कृत्य आहे. या घटनेने समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. याची शासनाने तात्काळ दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍या समाजकंटकांचा शोध घ्यावा, आरोपींना अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने कायद्याच्या राज्याची प्रचिती येण्यासाठी न्यायव्यवस्थेचा सत्यबोधी सुर्यनामा

कोरोनानंतर सुरु झालेल्या न्यायालयाचे काम अतिशय कासव गतीने सुरु असल्याचा आरोप

वेब टीम नगर: कोरोना संपत असला तरी कोरोनाच्या भितीने न्यायालयाचे कामकाज अतिशय कासव गतीने सुरु असून, सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी व न्यायदान प्रक्रियेवरील विश्‍वास वाढवण्यासाठी कृतीयुक्त कार्य करण्याची गरज असल्याचे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जीवाच्या आकांताने न्यायाधीश कामापासून दूर राहिल्याने अनेक प्रकरणे प्रलंबीत असून, न्यायव्यवस्था राम भरोसे चालू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी जिल्हा न्यायालय व तालुकास्तरावरील न्यायालयांचे कामकाज पुर्ववत व नियमीत सुरु होऊन कायद्याच्या राज्याची प्रचिती येण्याकरिता न्यायव्यवस्थेचा सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व कायदे मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

कोरोनाच्या टाळेबंदीत न्यायालये बंद होती. नुकतेच न्यायालयाचे कामकाज सुरु झाले असले तरी, हे काम अतिशय कासव गतीने सुरु आहे. नवीन वर्ष उजाडून, कोरोना प्रतिबंधक लस आली असली तरी, जीवाच्या आकांताने न्यायाधीश काम करण्यास तयार नाही. न्यायालय नावाला सुरु असून, त्याचा फायदा मात्र न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या पक्षकारांना होत नाही. देशात कोरोनानंतर सर्व व्यवस्था रुळावर येता असून, न्यायव्यवस्था मागे पडत आहे. कायद्याचा आधार घेऊन न्याय मागणार्‍यांवर अन्याय होताना दिसत आहे. वकिल व पक्षकारांनी न्यायालया विरोधात बोलले तर न्यायालयाचा अवमान केल्याचा बडगा उगारुन त्यांच्यावर कारवाई होते. अवमानाच्या भितीने कोणीही न्यायालयाच्या कामकाजाच्या प्रक्रियेवर बोलण्यास तयार नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

न्यायव्यवस्थेचा सत्यबोधी सुर्यनामा करुन जनतेसमोर न्यायव्यवस्थेचे पितळ उघडे पाडले जाणार आहे. इंग्रज काळातील न्यायव्यवस्था आजही प्रचलित असून, न्यायव्यवस्थे विरोधात जाब विचारण्यावर न्यायालय अवमानाचा बडगा उगारला जातो. तरी न्यायदान प्रक्रियेत गती व सुसंगतता आणून कायद्याचे राज्य येण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्ट्स को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने

ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल नाना डोंगरे यांचा सत्कार

वेब टीम नगर : निमगाव वाघा ग्रामपंचायत निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्ट्स को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार, प्रशांत लोखंडे, प्रसेन कुरापाटी, संतोष हरबा, शशिकांत ढगे, अंकुश मोकाटे, गणेश सावंत, आर.एन. चव्हाण आदी उपस्थित होते.

राजेंद्र पवार म्हणाले की, जनतेने काम करणार्‍या व्यक्तीला संधी दिली असून, डोंगरे गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून कार्य करणार असल्याचे सांगितले. नाना डोंगरे यांनी गावाचा विकास हेच ध्यास ठेऊन आज पर्यंत सामाजिक कार्य करीत आलो असून, जनतेने दिलेल्या संधीचे सोने करुन गावाच्या विकासात योगदान देणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments