नगरटुडे बुलेटीन 16-01-2021

 नगरटुडे  बुलेटीन 16-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संक्रांत हा सण एकमेकांविषयी आदर, गोडवा निर्माण करणारा सण

प्रा.शिरीष मोडक : सीताराम सारडा विद्यालयात राष्ट्रीय भूगोल दिन व तिळगुळ वाटप समारंभ साजरा                                     

वेब टीम नगर : संक्रांत हा सण एकमेकांविषयी आदर व गोडवा निर्माण करणारा सण आहे.भारतीय संस्कृतीत सणाला फार महत्व असते.प्रत्येक सण हा मानवाला संदेश देणारा असा आहे.तिळगुळ समारंभाच्या दिवशी गोड बोलणे हे एक दिवसाचे नसून वर्षभर हा गोडवा टिकविणे हीच आपली संस्कृती आहे.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी केले.        

 हिंदसेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात राष्ट्रीय भूगोल दिन व तिळगुळ वाटप समारंभ साजरा करण्यात आला.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर मालनताई ढोणे,उपाध्यक्ष भैया गंधे,कार्याध्यक्ष अजित बोरा,उपकार्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी,माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा,हिंदसेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा,सीताराम सारडा विद्यालयाचे चेअरमन प्रा.मकरंद खेर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल,पर्यवेक्षिका अलका भालेकर आदी उपस्थित होते.  

 उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या कि,सीताराम सारडा विद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेमाने बोलावतात व चांगले शिक्षण देतात.त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण झाली आहे.माझ्या प्रभागात ही शाळा असल्याने मनपाच्या माध्यमातून या शाळेच्या अनेक समस्या दूर केल्या आहेत.आता कोरोना लसीकरण सुरु झाल्याने काही दिवसांनी शाळा पूर्ववत होतील.तिळगुळ समारंभानिमित्त सर्वाना खूप शुभेच्छा.                    अजित बोरा म्हणाले कि,बोरा परिवारातर्फे सर्वाना संक्रांतीच्या शुभेच्छा देतो.प्रत्येकाशी गोड बोला व आपुलकीने वागावे.                                                                                                                              

ब्रिजलाल सारडा म्हणाले कि,संक्रांत सणापासून उत्तरायण सुरु होते.भगवद गीतेत ज्ञान विज्ञान योग सांगितला आहे.प्रत्येक सणामागे काहीतरी विज्ञान असते.यामुळेच आहारात तीळ,बाजरी व गुळ यांचे सेवन करतात.शारीरिक,बौद्धिक व अध्यात्मिक ज्ञान मिळविणे हा गीतेत सांगितलेला अर्थ आहे.                                      प्रा.मकरंद खेर म्हणाले कि,जेथे भौतिकता थांबते तेथे अध्यात्मिकता सुरु होते.संक्रांत हा सण प्रेम आपुलकी व जिव्हाळा निर्माण करणारा आहे.शाळेत सत्काराच्या वेळी बुके देण्याऐवजी तुळशीची रोपे दिली जातात.तुलसी ही वनस्पती २४ तास ऑक्सिजन देते. भैया गन्धे म्हणाले कि,संक्रांतीच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा.सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने हा हिंदू धर्मासाठी खरोखरच महत्वाचा दिवस आहे.तिळगुळ समारंभ सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो.                           

कार्यक्रमात रेणुका काकडे,गोरखा राखी,अर्चना दिनकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. भूगोलविषयी शिक्षक रवींद्र चोभे यांनी माहिती दिली.वृषाली जोशी यांनी संक्रात सणाचे महत्व सांगितले.                                                                                                           

प्रास्तविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल यांनी केले.सूत्र संचालन सुजाता खामकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका अलका भालेकर यांनी मानले. तिळगुळ समारंभास कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी

 अंजली वल्लाकटी यांची मुख्यामंत्रींकडे मागणी

वेब टीम नगर : आघाडी सरकार मधील सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर केलेल्या अत्याचाराचा नगर शहर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने निषेध केला आहे. शहर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पै.अंजली वल्लाकटी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेवून तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तातडीने राजीनामा घेतला नाहीतर शहर भाजप महिला आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही दिला आहे.

          मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनावर महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सुरेखा विद्दे, गीता गिल्डा, दीप्ती गांधी, वंदना पंडित, कालिंदी केसकर, संगीता खरमाळे, शुभांगी साठे, जोत्सना मुंगी,पावशे आदी भाजपा महिला आघाडीच्या पादाधीकारींची नावे आहेत.

निवेदनात म्हंटले आहे की, आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरूद्ध दि.  ११रोजी रेणू अशोक शर्मा यांनी ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य बलात्कार केल्याप्रकरणी माननीय पोलीस आयुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

          आपले सदर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून कबूल केले आहे की, “करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांवर या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. सदर करूणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे."

          सामाजिक न्याय खात्या सारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी आपण वरील गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. वरील वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण सदर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा त्वरित राजीनामा घेवून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा नगर शहर भाजपा महिला मोर्चा, आपल्या सरकार विरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्याकरिता व कायदेशीर कारवाईकरिता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिवाजी महालेंचे नाव हृदयात कोरले गेले

 आ.संग्राम जगताप : स्मृतिदिनी फलकाचे अनावरण

   वेब टीम नगर : हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडले गेलेले मावळे निष्ठेने, एक विचाराने लढले, अनेकांनी प्राणाची आहुती दिली त्यात ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण सार्थ करणारे जिवाजी महाले होते. त्यांचे नाव मराठी माणसाच्या हृदयात कोरले गेले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आजच्या स्मृतिदिनामुळे अधिक उजळली आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

     प्रेमदान नजिक जिवबा महाले चौक असे नाममकरण २०१५ मध्ये झालेल्या या ठिकाणी नव्या फलकाचे अनावरण जिवा महाले स्मृतिदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी आ.जगताप अध्यक्षपदावरुन बोलत होते. महापौर बाबासाहेब वाकळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकल नाभिक समाज आयोजित जिवा महाले स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रेमदानच्या दालनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की,  छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात बारा बलूतेदारांसह सर्वांनी एकजूट दाखवली. या मावळ्यांनी निष्ठेने पराक्रम गाजवला तशी एकजूट आपणही दाखवून सत्तेच्या माध्यमातून शहराचा विकास घडवू. महापालिकेत सत्ता बदलत असते, पण आज शहरात स्वच्छता निर्माण करण्यास कचरा घंटा गाड्यांची यंत्रणा राबविल्याने या कामात प्रगती आहे, त्याचे प्रमाणपत्र पुरस्काराच्या माध्यमातून मनपाला प्राप्त आहे.

     सकल नाभिक समाजाची मागणी मान्य करुन२०१५ ला या चौकाचे नामकरण ‘जिवबा महाले चौक’ करण्यात आले असे सांगून यापुढे याच नावाने चौक ओळखला जावा, त्याची सुरुवात आपणच केली पाहिजे, असे आवाहन केले.

     महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आपल्या भाषणात ‘जिवबा महाले चौक’ असा उल्लेख सिटी बस थांब्यासाठी करण्यात येईल तसेच मनपा आणि शासकीय कागदोपत्री याच नावाचा उल्लेख या पुढे केला जाईल, असे आश्‍वासन देऊन समाजाच्या मागण्यांचाही विचार केला जाईल, असे सांगितले.

     प्रारंभी सकल नाभिक समाजाचे बाळासाहेब भुजबळ यांनी प्रास्तविकात शिवबा काशिद आणि जिवबा महाले यांची जयंती मनपात छायाचित्र लावून साजरी करावी, असे सूचविले. रामदास आहेर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक सर्वश्री विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, कुमार वाकळे, अजय चितळे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, प्रेमदानचे संचालक सुनिल नहार, संजय ढोणे, अ‍ॅड.शिवाजी डोके, बाळासाहेब जगताप, जालिंदर बोरुडे, सतिष शिंदे, अविनाश देडगांवकर आदिंनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक औटी यांनी केले. तर आभार पत्रकार राजेश सटाणकर यांनी मानले.

     सकल नाभिक समाजाचे माऊली गायकवाड, अनिल (बापू)औटी, रमेश बिडवे, बाबूराव दळवी, अनिल निकम, विशाल सैंदाणे, श्रीपाद वाघमारे, बाबुराव ताकपेरे, योगेश पिंपळे, शाम औटी, सचिन खंडागळे, युवराज राऊत, संदिप सोनवणे, मगर आप्पा, रमेश भुजबळ, श्रीरंग गायकवाड, अनिल इवळे, रघुनाथ औटी, निलेश पवळे, शहाजी कदम, संदिप वाघमारे, ज्ञानेश्‍वर निकम, अजय औटी, जितेंद्र जगताप, आदिंनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रविवारी अनोखा रमैनी विवाह

   वेब टीम नगर : जगतगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या आशिर्वाद व मार्गदर्शनाने चि.महेश माधवराव पवार (रा.जाशी, ता.मान, जि.सातारा) व चि.सौ.कां. प्रांजली प्रमोद भापकर (रा.सावेडी, अ.नगर) यांचा रमैनी (विना हुंडा) विवाह रविवार दि.१७ जानेवारी २०२१ रोजी दु. १२. ३० वा. हॉटेल सिंग रेसिडेंसी, तारकपुर बस स्टॅण्ड जवळ, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

     या विवाहाचे वैशिष्ट्ये म्हणजे, कोणत्याही स्वरुपाचा हुंडा दिला-घेतला जात नाही, तसेच संसरोपयोगी वस्तू दिल्या-घेतल्या जात नाही, आहेर-मानपान, कोणत्याही प्रकारची पूजा, साखरपुडा, हळदी, मंगलाष्टके, अक्षदा, हार, फटाके, बॅण्ड, वरात असा कोणत्याही प्रकारचा खर्च केला जात नाही.

     अशाप्रकारे सर्व प्रथा, परंपरेला पूर्ण विराम देत पुज्य कविदेव कबीर व त्यांचे अवतार जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या आर्शिवादाने १७ मिनिटाच्या रमैनी आरतीने हा विना हुंडा तसेच इतर खर्चाचे मुलीच्या आई-वडिलांना ओझे वाटत नाही.जगतगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी चालविलेल्या या समाजसुधारणा चळवळीमुळे लग्नकार्यामुळे अनेक परिवार रस्त्यावर येता-येता वाचले आणि सुधारले. तसेच स्त्री भ्रृण हत्या बंदी, नशा मुक्ती, दारु मुक्ती, भ्रष्टाचार मुक्ती, जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद इत्यादी समाज सुधारणा कार्यास मदत करीत आहे. आदर्श समाजाचे प्रतिक बनले आहे.

     यामुळे समाजात खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे व एक सात्विक, अध्यात्मिक समाज तयार झाला आहे. आजपर्यंत संपूर्ण विश्‍वात करोडो कुटूंबांनी जगत्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेऊन आपले कल्याण केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 केंद्र सरकारने केलेले अन्यायकारक कायदे स्थगित नको रद्द करा : कॉ. रमेश नागवडे

वेब टीम नगर : येथील अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने अहमदनगर मधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय असलेल्या किसानभवन येथे आज कॉ. रमेश नागवडे यांच्या नेतृत्वाखाली 'तीन शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांची होळी' आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.

दिल्लीमधे शेतकरी बांधव गेल्या पन्नासपेक्षा जास्त दिवस आंदोलन करत आहेत. सरकारसोबत चर्चेच्या नऊ फे-या होऊनही सरकार या अन्नदात्या बळीराजाच्या मागण्यांकडे आणि आंदोलनाकडे सकारात्मकदृष्ट्या पहायला तयार नाही. केंद्र सरकारवर असा कोणता आंतर्राष्ट्रीय भांडवलदारांचा दबाव आहे. जेणेकरून सरकार आपल्याच भारतमातेच्या पुत्रांवर अन्याय करत आहे. अन्नदात्याच्या मागण्या योग्य असल्याचे देशभरातुन संकेत केंद्र सरकारला गेलेले आहेत. तरीही सरकार सर्वोच्च न्यायालयाल पुढे करून चाल खेळत असल्याची भारतातील शेतक-यांचा वहम आहे. सरकारच्या वर्तनातुन हा वहम खरा असल्याचे दिसत आहे. असे नागवडे म्हणाले.

शेतकरी कामगार संयुक्त कृती समितीच्या मुंबईतील भुपेश गुप्ता भवन येथील व्यापक बैठकित ठरल्याप्रमाणे आज महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी हे आंदोलन झाले आहे. त्याचाच भाग म्हणून आजचे हे आंदोलन होते.

या आंदोलनात लाल बावटा विडीकामगार संघटनेचे कॉ.अंबादास दौंड, अ.भा.किसानसभेचे कॉ.भैरवनाथ वाकळे, कामगार संघटना महासंघ आणि क्रांतिसिंह कामगार संघटनेचे कॉ.दत्ताभाऊ वडवणीकर, अमोल पळसकर, सतीश निमसे तसेच तालुका किसान सभेचे कॉ.संतोष गायकवाड सहभागी झाले होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एका व्यक्तींने किती जागा घ्यावी याला बंधन नसल्याने जागेचा डल्ला डोंगर सुरु असल्याचा आरोप

सुखवस्तू गुंठामंत्री अर्थव्यवस्थेमुळे देशात गोरगरीबांची घरे झाली नाहीत 

अ‍ॅड. कारभारी गवळी  : घरकुल वंचितांचा रविवारी सत्यबोधी उत्तरायण सुर्यनामा

वेब टीम नगर : राजकारणी, नेते, नोकरदार मोठ्या प्रमाणात आपला काळा पैसा शहरी भागातील जागेत गुंतवीत असल्याने जमीनीचे भाव गगनाला भिडून गोर-गरीबांना घर घेणे अवघड झाले आहे. एका व्यक्तींने किती जागा घ्यावी याला बंधन नसल्याने जागेचा डल्ला डोंगर सुरु असून, हा चुकीचा प्रकार थांबविण्यासाठी मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने रविवार दि.१७ जानेवारी रोजी  निंबळक येथील वैष्णवी देवी मंदिर येथे सत्यबोधी उत्तरायण सुर्यनामा करण्यात येणार आहे. तसेच निंबळक येथील घरकुल वंचितांच्या आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेच्या प्रकल्पाच्या ठिकाणी वनश्री बलभीम डोकेनगर फलकाचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

सुखवस्तू गुंठामंत्री अर्थव्यवस्थेमुळे देशात गोरगरीबांची घरे झाली नाहीत. स्वयंरोजगाराला खीळ बसली. देशात अनेक सरकार सत्तेवर आले. मात्र घरकुल वंचित व गोरगरीबांचे प्रश्‍न न सोडवता फक्त समाजवादाचा डांगोरा पिटण्यात आला. देशातील काळ्या पैश्यांचा डल्ला डोंगर शहरी जमीनीत आढळून येतो. देशातील राजकारणी आणि नोकरशाही आपला काळा पैसा मोठ्या प्रमाणात शहरातील जमीनीत गुंतवतात. 80 टक्के राजकारणी नेत्यांचे मुख्य भांडवल जमीनीत गुंतवलेला काळा पैसा असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते विधानसभा व लोकसभा सारख्या निवडणुकांमधे हा पैसा वापरला जातो. मतखरेदी करुन सत्ता मिळवली जाते व सत्तेतून पुन्हा पैसा मिळवण्याचा धंदा सुरु आहे. निवडणुक आल्यानंतर पैश्यांचा पूर येतो. बँकेच्या व्याजदरापेक्षा जमीनीत गुंतवलेल्या पैश्यामुळे कितीतरी पटीने अधिक फायदा होत असतो. जमीनीत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जात असताना शहरात जमीनीचे भाव गगनाला भिडले आहेत. तर सर्वसामान्य घरकुल वंचितांना घरासाठी जागा घेणे अशक्य झाले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

घरकुल वंचितांची घरे होण्यासठी शहरालगत असलेल्या निंबळक गावाच्या हद्दीत संघटनेच्या वतीने आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना असतित्वात आनण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात एक गुंठा जमीन घर बांधण्यासाठी दिली जात आहे. सदर जागा खडकाळ व पडीक असल्याने पायाचा खर्च वाचणार आहे. तर पाणी, वीज व रस्त्यांची हमी घरकुल वंचितांना देण्यात आली आहे. एमआयडीसी जवळ असल्याने रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. या योजनेची घरकुल वंचितांना शहानिशा करण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेवर वनश्री बलभीम डोकेनगर फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. तर प्रकल्पाचे ले आऊट प्लॅन सदर भागात लावण्यात येणार आहे. घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, जालिंदर बोरुडे, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, फरिदा शेख, अंबिका नागुल आदी प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बसपाच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय मिळणार 

उमाशंकर यादव  :  यतिमखाना बोर्डिंग स्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

वेब टीम नगर : बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी व सहयोग दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील यतिमखाना बोर्डिंग स्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, प्रा. अशोक डोंगरे, रमेश सोळसे, बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, पांडुरंग जाधव, अजय कुशवाह, अजित यादव, शैलेश यादव, यतिमखाना ट्रस्टचे विश्‍वस्त शाकिर शेख, गुफरान शेख, हारुन शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

उमाशंकर यादव म्हणाले की, बहुजन समाज पार्टी बहुजन समाज संघटित करुन त्यांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीने आपले असतित्व दाखवून तेथे विकासाला चालना दिली. भाजप व काँग्रेस दोन्ही सरकार सत्तेवर असताना बहुजन समाजावर अन्याय झाला. बसपाच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय मिळणार असून, त्या दृष्टीने मायावतींचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अशोक डोंगरे यांनी बहन मायावतीजींच्या विचार व मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टी वंचित व बहुजन समाजाला न्याय देण्याचे कार्य करीत आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील सर्व कार्यकर्ते उत्तमपणे योगदान देऊन वंचित व गरजूंचे प्रश्‍न सोडवित आहे. मायावतींच्या रुपाने उत्तम व सशक्तपणे एक महिला आपली जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगून, त्यांच्या जीवन चरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला. कोरोना महामारीच्या संकटानंतर सर्वसामान्य व गरजू घटकांपुढे आर्थिक प्रश्‍न उद्भवला असताना, त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. या भावनेने बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपचा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम पाटोळे यांनी केले. आभार अ‍ॅड.विनायक पंडित यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापुढे कामगारांचा ठिय्या

संतप्त कामगारांचा आत्मदहनाचा इशारा : अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्‍वस्त चर्चेसाठी गैरहजर

वेब टीम नगर : अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांचे वेतन वाढीचे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे असताना चर्चेला विश्‍वस्त येत नसल्याने कामगारांना तारखेवर तारीख मिळत आहे. शुक्रवारी (दि.१५ जानेवारी) रोजी सदर प्रकरणाच्या तारखेला विश्‍वस्त दुपारी उशीरा पर्यंत हजर न राहिल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे पदाधिकारी व कामगार सभासदांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापुढे ठिय्या मांडला. तर न्याय मिळत नसेल तर आत्मदहनाचा इशारा देखील दिला. यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, किशोर कांबळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार उपस्थित होते.

अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च २०२० मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सहा ते सात तारखा झाल्या. यापैकी एकाच तारखेला विश्‍वस्तांनी हजेरी लावून कामगारांना दरमहा तीन हजार दोनशे तीन वर्षासाठी वाढ देण्यास सहमती दर्शवली. मात्र कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने ही पगारवाढ परवडणारी नसल्याने त्याला विरोध करण्यात आला. तर दरमहा पाच हजार तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा सहा हजार रुपये पगारवाढ देण्याची मागणी करण्यात आली. एकाच तारखेला हजर राहून आपली आडमुठी भूमिका मांडणार्‍या व चर्चेसाठी तारखेला विश्‍वस्त हजर राहत नसल्याचा कामगारांनी यावेळी निषेध नोंदवला. सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी युनियनला पुढील सदर प्रकरणाची दि.२१ जानेवारीची अंतिम तारीख दिली आहे. यावेळी चर्चेने मार्ग निघेल किंवा सदर प्रकरण नाशिक कामगार आयुक्तांपुढे जाणार आहे.  

युनियनचे अध्यक्ष सतीश पवार म्हणाले की, युनियनच्या कामगारांनी वेतनवाढीची अवाजवी मागणी केली नसून, किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा या पध्दतीने कामगारांना वेतनवाढ मिळाली पाहिजे. ट्रस्टने कोरोना काळात जमीनीचे व्यवहार करुन संरक्षक भितीचे काम देखील सुरु केले. तेंव्हा पैश्यची अडचण निर्माण झाली नाही. फक्त कामगारांनी नियमाप्रमाणे पगारवाढ मागितल्यास त्यांना पैश्याची अडचण दाखवली जात आहे. ट्रस्टचा बॅलन्शीट चांगला असून कोट्यावधीची उलाढाल सुरु असताना कामागारांप्रती सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची गरज आहे. अन्यथा कामगार रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

अ‍ॅड. कॉ.सुधीर टोकेकर म्हणाले की, ट्रस्ट कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी येत नसल्याने तारखेवर तारीख मिळत आहे. ट्रस्टवर कामगार आंदोलनाने दडपण आनत नसून, विश्‍वस्त चर्चेला येत नसल्याने हा वाद चिघळत आहे. कामगार हे ट्रस्टचेच असून, त्यांना न घाबरता विश्‍वस्तांनी चर्चेला आल्यास हा प्रश्‍न सुटणार असल्याचे स्पष्ट केले. तर अवतार मेहेरबाबा यांनी वंचित, दुर्बल घटकांना आधार देण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन कामगारांच्या कल्याणासाठी पगारवाढ दिल्यास ट्रस्टला काही कमी पडणार नसल्याचे सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'शेते कापणीसाठी पांढरी झाली आहेत ' कविता संग्रह आ. संग्राम जगताप यांना भेट

 कवितांचा संग्रह जाणार ना. शरद पवारांच्या भेटीला

वेब टीम नगर : येथील कवी विनोद शिंदे यांचा संवेदना प्रकाशन संस्था, पुणे यांच्या वतीने माजी संमेलनाध्यक्षा डॉ.अरुणाताई ढेरे यांचे हस्ते व गझलकार रमण रणदिवे यांचे प्रमुख उपस्थितीत 'शेते कापणीसाठी पांढरी झाली आहेत' या कविता संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या कविता संग्रह मंत्रीमंडळात जाण्यासाठी कवी शिंदे यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांना या कविता संग्रहाची भेट दिली. यावेळी जॉय लोखंडे, माजी नगरसेवक निखिल वारे, अशोक मोरे आदी उपस्थित होते.

या कवितासंग्रहात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत झंझावाती प्रचारसभा घेतल्या. प्रतिकूल परिस्थितीतही  सातार्‍यात धो-धो कोसळणार्‍या पावसात ऐतिहासिक सभा गाजवून निवडणुकीची दिशा बदलवून विजय खेचून आनला. महाविकास आघाडीचे तीन पक्षांची बांधणी करून भुतो न भविष्यती असे सरकार स्थापन केले. सर्वसामान्य लोकांना त्यांचे हे कष्ट भावले. त्यांच्या संवेदना जागृत झाल्या. या सभेचे वृत्तपत्रांनी केलेले लाईव्ह प्रक्षेपण पाहून या घटनेवर कवी विनोद शिंदे यांनी ते लढताहेत लढतच राहणार अविश्रांतपणे ही कविता लिहून ती उपरोक्त संग्रहात छापली. राष्ट्रवादीचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून संग्राम जगताप यांना या संग्रहाची ही प्रत देण्यात आली. तसेच करोनाच्या या जीवघेण्या परिस्थितीतही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी व त्यांच्या मंत्री मंडळाने ज्या संयमाने व धीराने ही परिस्थिती हाताळली त्यासाठी अग्रदूत या नावाची मुख्यमंत्री यांच्यावर कविता लिहून तिचा समावेशही वरील पुस्तकात करण्यात आला आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी या कविता संग्राहाचे कौतुक करुन, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मंत्रिमंडळाची दखल एक सर्वसामान्य अहमदनगरचा कवी घेतो, ही आमच्या कामाची पावतीच आहे. अहमदनगर जिल्ह्याला मोठी साहित्याची परंपरा लाभली आहे. ती परंपरा कवी व लेखक विनोद शिंदे हे समर्थपणे पुढे घेऊन जात आहे. कवी सृजनशील व्यक्तीमत्व असून, समाजातील घटनांवर आपल्या कवीतेतून भाष्य करीत असतात. हा कवीता संग्रहाचा अमुल्य ठेवा शरद पवार यांना भेटून प्रत्यक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

   राजमाता जिजाऊ न्याय प्रगल्भ आदर्शवत माता होत्या

न्यायाधीश नेत्रा कंक : राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत कौटुंबिक न्यायालयात स्वच्छता अभियान व महिला सक्षमीकरणाचा उपक्रम

वेब टीम नगर : राजमाता जिजाऊ अतिशय शिस्तप्रिय, न्याय प्रगल्भ आदर्शवत माता होत्या. आजच्या स्त्रियांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. राजमातांनी छत्रपती शिवरायांना अन्यायाचा बिमोड करून रयतेसाठी स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. धाडसी, पराक्रमी व संस्काराचे बाळकडू शिवाजी महाराजांना दिले. राजमाता जिजाऊ महत्वकांशी व दूरदृष्टी असल्याने स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. स्त्री या कर्तृत्ववान असून, त्यांनी स्वत:ला ओळखण्याची गरज आहे. तर युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार अंगीकारुन बदल घडविण्याचे आवाहन कौटुंबिक न्यायालयाचा न्यायाधीश नेत्रा कंक यांनी केले.

अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालय येथे अहमदनगर शहर बार असोसिएशन, माहेर फाउंडेशन, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, महानगरपालिका, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत स्वच्छता अभियान राबवून महिला सक्षमीकरणावर व्याख्यान घेण्यात आले. यावेळी न्यायाधीश कंक बोलत होत्या. कार्यक्रमास बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, माहेर फाऊंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताठे, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. श्याम आसावा, अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, अ‍ॅड. शिवाजी कराळे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, शाहीर कान्हू सुंबे, सागर अलचेट्टी, अ‍ॅड. अनिता दिघे आदी उपस्थित होते.

न्यायाधीश कंक पुढे म्हणाल्या की, महिला मुळातच सक्षम आहेत. महिलांनी खंबीरपणे स्वत:च्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात भरारी घेतली आहे. कोरोना महामारीने स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. निरोगी आरोग्यासाठी अंतरिक व बाह्य स्वच्छता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळी अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालयात सर्व उपस्थित हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात उतरले होते. मनपाच्या घंटागाडीत परिसरातील कचरा भरून परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता अभियानानंतर नियोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे म्हणाले की, युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या उठा जागे व्हा या वाक्यातून जागृक होण्याची गरज आहे. ध्येय साधण्यासाठी अगोदर ध्येय निश्‍चित करण्याची गरज आहे. स्वामीजींचे विचार आजच्या युवकांना दीपस्तंभाप्रमाणे आहे. आपले कर्मच आपली ओळख निर्माण करीत असतात. यासाठी चांगले कर्म करुन नांव लौकिक मिळवण्याचा संदेश त्यांनी दिला. यावेळी स्वच्छता दूत डॉ. अमोल बागुल, मनपाचे कर्मचारी नाना झरेकर, अक्षय निकम, बाळासाहेब विधाते, ऋषिकेश वाल्मिक, शाहीर कान्हू सुंबे यांचा न्यायाधीश कंक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची पुस्तके भेट देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. भानुदास होले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. अनिता दिघे यांनी केले. आभार  ह.भ.प. सुनिल तोडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, पोपट बनकर, आरती शिंदे, डॉ. संजय गिर्‍हे, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, अ‍ॅड. गौरी सामलेटी, अ‍ॅड. अमोल जाधव, समुपदेशक बिडवे मॅडम, एन.एम. शेख आदींसह मनपा कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधींनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

करंदीकर : राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

वेब टीम नगर :  नव्याने पारीत करण्यात आलेल्या तीन नवीन कृषी कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, हे कायदे शेतकरी विरोधी असल्याने ते त्वरीत रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या प्रदीर्घ आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नसल्याच्या निषेधार्थ सोमवार दि.११जानेवारी पासून शहरातील मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरु करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाची सांगता सातव्या दिवशी रविवार दि.१७ जानेवारी रोजी जोरदार शक्तीप्रदर्शनाने करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र करंदीकर यांनी दिली.

केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जाणीवपूर्वक सातत्याने सर्व सामान्य जनतेच्या मुलभूत अधिकारांच्या विरोधात आणि संविधानाच्या विरोधात नवनवीन कायदे पारित करीत आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचा फायदा घेऊन व शेतकर्‍यांच्या विरोधात अत्यंत घातक कायदे मंजूर करण्यात आले. हे काळे कायदे केवळ भांडवलदारांच्या फायद्याचे असून, शेतकर्‍यांना भांडवलदारांचे गुलाम बनविणारे आहे. सदर शेतकरी विरोधी काळे कायदे त्वरित पुर्णपणे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी संपूर्ण देशात तीव्र आंदोलन करीत आहेत. राष्ट्रीय किसान मोर्चाने शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रीय स्तरावर व्यापक जनआंदोलन सुरु केले आहे. त्या अंतर्गत संपूर्ण देशात ३१ राज्यात, ५५० जिल्ह्यात, जिल्हा मुख्यालय येथे दि. ११ ते १७ जानेवारी दरम्यान धरणे व प्रदर्शन आंदोलन सुरु आहे. अहमदनगर मध्ये सुरु असलेले आंदोलनाची सांगता सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटना, शेतकरी, कामगार व महिला, युवक तथा सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बाळासाहेब मिसाळ, राजेंद्र करंदीकर, शांताराम उपाध्ये, संजय सावंत, हरजितसिंग वधवा, भगवानशास्त्री घुगे महाराज, राजाभाऊ दिवेकर, अविनाश देशमुख, शिवाजी भोसले, रामदास धनवडे, गणपत मोरे, संजय संसारे, नामदेव राळेभात, बापुसाहेब बोराटे, शहाजी डोके, इम्रानभाई जहागीरदार, मनोहर वाघ, सारंग घोडेस्वार, जैद शेख आदींनी केले आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 जिजाऊ ब्रिगेड तर्फे जिजाऊ दीपोत्सव साजरा

वेब टीम नगर : राष्ट्रमाता जिजाऊ माँ  साहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड अहमदनगर शाखेतर्फे येथील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्राच्या प्रांगणात जिजाऊ दीपोत्सव उत्साहात पार पडला.  या चैतन्यही प्रेरणादायी आगळ्यावेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण अशा दीपोत्सवाद्वारे  राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वराज्य संकल्पक शहाजी यांना अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष व विभागीय संघटक शिवमती अनिता ताई काळे ,शिवमती  मीनाक्षीताई जाधव ,आशाताई गायकवाड, जयश्री ताई कुटे , शिवश्री अमोल लहारे, शिवश्री बाबासाहेब नवले तसेच प्रशांत गायकवाड निष्ठा सुपेकर, आशिष सुपेकर आदींची उपस्थिती होती. 


Post a Comment

0 Comments