नगर मधून व्ही.आर.डी.ई संस्थाचे स्थलांतर होणार नाही
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे आश्वासन : दिलीप गांधी यांची माहिती
वेब टीम नगर : व्ही.आर.डी.ई ही संरक्षण संस्था नगरचे वैभव आहे. १९८० पासून माझे या संस्थेशी ऋणानुबंध आहे. या महत्वपूर्ण संस्थाचे नगर मधून स्थलांतरित होवू नये यासाठी मी शांत न बसता पुढाकार घेणार असल्याचे आधीच घोषित केले होते. त्यानुसार मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण खात्याच्या समितीचे सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच डी.आर.डी.ई.चे चेअरमन सतीश रेड्डी, पुण्याचे जनरल डायरेक्टर पी.के.मेहता यांना तातडीने वैय्यक्तिक इमेल करून पत्र व्यवहार केला आहे. सोमवारी दुपारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. रात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी इमेल वाचल्यावर त्यांचा दिल्लीहून मला फोन आला, त्यावेळी त्यांना नगरमध्ये व्ही.आर.डी.ई राहणे किती महत्वाचे आहे याची माहिती देवून संस्थाचे नगर मधून स्थलांतरित होवू नये अशी विनंती केली. यावेळी मंत्री राजनाथ सिंग यांनी नगर मधून व्ही.आर.डी.ई संस्थाचे स्थलांतर होणार नाहीये, असे स्पष्टपणे आश्वासन दिले आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी व्ही.आर.डी.ई संस्थेच्या कर्मचारी असोशिएशनच्या शिष्ठमंडळास दिली.
दिलीप गांधी यांनी पुढे सांगितले, मागच्या आठवड्यात व्ही.आर.डी.ई संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने मला निवेदन दिल्यावर मी सविस्तर माहिती घेवून तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा.सुजय विखे तसेच डी.आर.डी.ई.चे चेअरमन सतीश रेड्डी, पुण्याचे जनरल डायरेक्टर पी.के.मेहता यांच्या कडे तातडीने पत्र व्यवहार करत वैय्यक्तिक इमेलवर निवेदन पाठवले. सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
संपूर्ण देशात सध्या राशष्ट्रीयकृत बँकांचे जसे विलीनीकरण केले जात आहे, त्याच धर्तीवर डी.आर.डी.ओ.संस्थेच्या काही प्रकल्पांचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव आहे अशी माहिती डी.आर.डी.ई.चे चेअरमन सतीश रेड्डी यांनी मला दिली. त्यानुसार नगरच्या व्ही.आर.डी.ई संस्थेत मोठी जागा उपलब्ध आहे, सर्व सुविधा आहेत, तसेच ड वर्ग महापालिका असल्याने स्वस्ताई आहे. त्यामुळे नगरच्या व्ही.आर.डी.ई मध्ये इतर प्रकल्पांचे विलीनीकरण करावे अशी विनंती मी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या कडे केली आहे. स्थानिक पातळीवर चर्चा करून पुढील निर्णय घेवू असेही मंत्री सिंग यांनी सांगितल्याचे दिलीप गांधी यांनी सांगितले.
यावेळी व्ही.आर.डी.ई कर्मचारी कार्यसमितीचे उपाध्यक्ष विठ्ठल वायकर, सहसचिव आर.बी.खरमाळे, व्ही.आर.डी.ई एम्प्लॉय युनियनचे अध्यक्ष शंकर पगारे, सचिव सलीम अहमद व सदस्य उपस्थित होते.
दिलीप गांधी यांनी वरिष्ठ पातळीवर केलेला पाठपुरावा व केलेल्या सहकार्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी दिलीप गांधी यांचे आभार मानून सत्कार केला.(फोटो-एसआरडी -२१४०)
0 Comments